(दीनदु:खितांचे सेवक म्हणून न्या. विनोद यांचा लौकिक अखिल भरतखंडात आहे. गेल्या वीस वर्षात सुमारे चाळीस हजार व्यक्तींची निरपेक्ष सेवा त्यांचेकडून झाली आहे. एवढा प्रखर व अखंड सेवाधर्म पत्करणारे सत्पुरूष आज महाराष्ट्रांत अथवा अखिल भारतांत किती आढळतील? श्रेष्ठतम जिज्ञासूंशी तत्वचर्चा करताना महर्षींचे जे विचार प्रकट होतात त्यांचा संग्रह करण्याची रोहिणीने व्यवस्था केली आहे. - रोहिणी जुलै १९४९)
सुखानुभूतीत वृत्ती अस्थिर असते. संवेदना आंदोलित होत रहाते, प्राणशक्तींचे प्रकटन सकम्प होत असते.
सुखाच्या अनुभवांत पूर्णत्व नसते. तत्सम वृत्तींच्या पुन:प्रत्ययांचा शोध सुरू राहतो, अतृप्तीची जाणीव अखंड असते.
विषयाशी होणार्या तादात्म्याचा अनुभव हे सुखाचे स्वरूप असल्यामुळे, विषय हे इंद्रियांना सदैव बहिर्वृत्त, बाहेरचे राहिल्यामुळे सुखाचा शोधही सदैव अपरिपूर्तच राहतो.
इंद्रियांना सदैव बहिर्वृत्त असणे, इंद्रियांच्या पकडीत पूर्णत: न जाणे, हे विषयत्वाचे मुख्य लक्षण होय.
इंद्रियांची ग्राहक शक्ती, आकर्षण शक्ती, उपभोजक व उपयोजक शक्ती ज्या तत्वामुळे उत्तेजित होते पण ज्या तत्वाला ती पूर्णत: ग्रासू शकत नाही, नष्टवू शकत नाही, ते तत्व म्हणजे विषय. म्हणून विषय इंद्रियांना सदैव अतृप्त, असंतुष्ट पण उत्तेजित अवस्थेत ठेवतात.
विषयांच्या उपभोगांत, सन्निकर्षांत चेतवणी, प्रचोदना, अनुभविली जाते. पण विषयांची संपूर्ण उपलब्धी स्वभावत: असंभवनीय असल्यामुळे अखेरीस निराशा, असंतोष, दु:ख, विसंवाद हेच पर्यवसान साहजिकच ठरते.
शांती हा अनुभव सुखोत्तर आहे. शांतीमध्ये सुखाचा अंतर्भाव होतोच. पण ती सुखानुभवाप्रमाणे केवळ विषयनिष्ठ नसते.
विषयांचे रसग्रहण करून, शिवाय विषयांच्या अंत:स्वरूपाची, विषयत्वाची जाणीव ‘शांती’ या अनुभवांत जागृत असते.
या जागृत जाणीवेमुळे शांती संवेदनेमध्ये सुखाचा शोध नसतो, पाठलाग नसतो.
विषयसंनिकर्षामुळे स्वभावत: जी सुखोत्पत्ती होईल तिचा संग्रह करून, विषयांच्या इंद्रियातीतत्वाचे ज्ञान ठेवून अंत:करणाच्या चतुर्विध वृत्तींचे (अहंकार, बुद्धी, मन, चित्त) सम-आधान ठेवणे ही शांती-प्रत्ययाची प्रक्रिया. (समाधान)
शांती या अवस्थेच्या अनुभवांत वृत्ती व विषय यांच्या संबंधापासून उत्पन्न होणार्या प्रचोदनात्मक सुखाचा अंतर्भाव होतो व पुन: वृत्ती व विषय यांच्या अंत:स्वरूपाचे ज्ञानही जागृत असते.
अतएव, ज्ञाननिर्विशिष्ट सुख म्हणजे शांती. सुखसंवेदनेत, विषयांच्या अग्राह्यतेमुळे, इंद्रियातीतत्वामुळे अल्पाधिक प्रमाणांत दु:खाची उपस्थिती असतेच. ‘शांती’ या अनुभूतींत दु:खाचा लेशही नसतो. कारण, सुखाचे व सुखोत्पादक विषयांचे स्वरूपज्ञान उपलब्ध झालेले असते.
दु:ख म्हणजे वृत्ती व विषय यांमध्ये स्वभावत:च असंभवनीय असणारा पूर्ण तादात्म्याचा अभाव.
दु:ख आणि सुख हे एकाच अनुभवाचे दोन नामविशेष आहेत.
विषयांची इंद्रियांना असणारी स्वभावसिद्ध अग्राह्यता दु:खाचे निष्पादन करीत राहते. अंत:करणाची वृत्ती उत्तेजनक्षम असते. वृत्तीची ही उत्तेजनक्षमता सुखाचा आभास निर्माण करते. अनुत्तेजित इंद्रिय स्थिती, अंत:करणवृत्ती विषयांशी अंशत: होणार्या तादात्म्यामुळे संचलित, आंदोलित होत व त्या संचालनाला, आंदोलनाला ‘सुख’ ही संज्ञा दिली जाते. वस्तुत:, सुख व दु:ख हे अनुभव दोन नव्हेत, निरनिराळे नव्हेत. दृष्टिभेदामुळे निष्पन्न होणारी एकाच वस्तूची ती दोन दर्शने होत.
सुख आणि शांती यांच्या पलीकडे असणार्या, सर्वथैव स्वयंसंपूर्ण अनुभवाला ‘सं-प्रसाद’ अशी श्रुती-प्रणित संज्ञा आहे. “ॐ भूमा संप्रसादात् अध्युपदेशात् ॐ” (ब्रम्हसूत्रे १।३।८)
‘सं-प्रसाद’ या पदाचा अर्थ श्री मध्वाचार्यांनी पूर्ण सूख असा दिला आहे. “भूम्न: पूर्ण सुखरूपत्व अभिधानात् संप्रसाद: पूर्णसूखम्।” (मध्व भाष्य टीका १-३-८) ब्रम्हसूत्रे लिहिणारे वेदव्यास यांनी आत्म-तत्वाचा पर्याय शब्द म्हणून संप्रसाद शब्द उपयोजिला आहे.
आद्य श्री शंकराचार्यांनी वेदव्यासांचा अनुकार करून परमोच्च् अनुभूती व परमश्रेष्ठ सुषुप्तिगम्य जे आत्मतत्व त्याचे वाचक म्हणून ‘सं-प्रसाद’ पदाची नियुक्ती केली आहे.
‘शांती’ या अवस्थेत जसा सुखाचा अंतर्भाव होतो, तसा सं-प्रसाद या निरवस्थ अनुभूतींत ‘शांती’ स्थितीचाही संग्रह होतो.
अतएव, ‘सं-प्रसाद’ म्हणजे निरवस्थ, सर्व अवस्थांच्या पलीकडील सच्चिदानंद ही अनुभूती होय.
‘य: एष: संप्रसाद: अस्मात् शरीरात् समुत्थाय परं ज्योति: उपसंपद्य स्वेन रूपेण अभिनिष्पद्यते एष: आत्मा इति होवाच।’ (छांदोग्य उपनिषद् ६।३।४)
ॐ ॐ ॐ