विचार करणे म्हणजे विशिष्ट तर्हेने बुद्धीची पावले टाकणे.
‘चर’ म्हणजे चालणे, वि+चर म्हणजे विशिष्ट तर्हेने चालणे. ‘चर’ चे ‘चार’ हे प्रयोजक रूप आहे. चार म्हणजे चालविणे. बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार ‘चालविणे’ म्हणजे विचार करणे.
मन हे सदैव गतिमान असते. ते ‘चंचल’ किंवा ‘नेहमी चलित’ असे असते.
“चंचलं हि मन: कृष्ण, प्रमाथि बलवत् दृढम्।”
विचार करताना मनाच्या गतीला विशिष्ट वळण द्यावयाचे असते. काही नियम ध्यानांत घेऊन मनाच्या प्रवाहाला विशिष्ट पात्रांतून नेणे म्हणजे विचार करणे. नियम आणि मनाची स्वाभाविक गती, यांच्यामध्ये अर्थातच संघर्ष व विरोध, प्रतिक्रिया व प्रतिकार निर्माण होत असतात.
या संदर्भात प्रकृती, विकृती आणि संस्कृती हे तीन भाव लक्षात घेणे आवश्यक आहे. मनाची प्रकृती गतिरूप आहे. या गतीची स्वैरता ही विकृती आहे व तालबद्धता ही संस्कृती आहे. ताल म्हणजे नियम. ताल किंवा नियम खरोखर गतीची अर्थवत्ता व संपन्नता वाढवितात.
नियम हे गतीचे, मनाचे, जीवनाचे विरोधक व विध्वंसक शत्रू नव्हेत.
विचार करण्याचे, मनाच्या गतीचे, जीवनाचे नियम हे विचाराने, मनाने, जीवनानेच तयार केलेले असतात.
हे नियम मनाच्या किंवा जीवनाच्या कक्षेबाहेरून येत नाहीत. ते त्रयस्थ, परके किंवा घातक असण्याचा संभवच नाही. उच्चतर अर्थाचे, ध्येयांचे, उद्दिष्टांचे कवडसे मन, बुद्धीला यांना प्रथम अंधुकपणे दिसतात व त्या ध्येयांचा शोध आणि वेध अधिक यथार्थतेने, यशस्वितेने व्हावा म्हणून या नियमांची घटना व सिदधी आपोआप होत राहते.
‘गति’ हा जसा मनाचा स्वभाव, तसा नियम देखील मनबुद्धीचा स्वभावच आहे. गती साहजिक आहे, तसे नियम देखील सहजसिद्धच आहेत. आणि म्हणून अ-नियम, स्वैरता हीच खरी विकृती आहे.
स्फूर्ती आणि शास्त्र यांमध्ये तत्वत: विरोध नाही. शास्त्र हे थिजलेली स्फूर्ती आहे. शास्त्र देखील पेटलेल्या मनबुद्धीनेच शिकावयाचे असते. पेटलेले मन भेटल्याबरोबर, थिजलेले शास्त्र प्रथम प्रवाही, जलरूप घेते व नंतर लवकरच वायुमय, प्राणमय म्हणजे स्फूर्तीमय होऊन जाते.
जड बुदधीलाच शास्त्राभ्यास हा जड वाटतो. स्फूर्तीने धगधगलेल्या बुद्धीला, प्रज्ञेला कूट व जटिल शास्त्राचा अभ्यासदेखील काव्यचिन्तनासारखा रोचक व तोषक असतो.
काव्य रचनेइतकाच शास्त्र-विचार, प्रभातरल प्रतिभेचा आविष्कार आहे.
जडता, निष्पन्दता, निष्क्रियता नष्ट करून जीवनांतल्या प्रत्येक क्षणाक्षणाला स्फूर्तीचा उजाळा देत असणे हेच मानवी जीवनाचे आध्यात्मिक ध्येय होय.
आजच्या यन्त्र-युगांत जीवनाला काहीशी जडता, स्फूर्ती-हीनता येण्याचा संभव आहे. आधुनिक शास्त्रे आणि विज्ञान यांच्यामुळे ती आलेली नाही, हे आपण ओळखले पाहिजे.
विज्ञानजन्य यंत्रे, या थिजलेल्या स्फूर्तीच आहेत. ती काव्ये आहेत, संगीतिका आहेत व नृत्य-शारदेचे ललित मधूर पद-न्यास आहेत.
आधुनिक विज्ञानाने मानवी संस्कृती अधिक उंचावली आहे. विज्ञानाने माणसाला पतित केले नाही. विज्ञानाच्या प्रगतीने सूचित होणारी बुद्धीची सूक्ष्मता व विशालता नि:संशय मानार्ह व अभिनंदनीय आहे. विज्ञानाचा उपयोग कुठे व कसा करावा, याचे आकलन होण्यासाठी मानवाची विचारशक्ती विशुद्ध, नियमबद्ध व्हावयास हवी. विचारशक्ती प्रखर असली तर वासना केव्हाही अनिर्बंध होऊ शकत नाही. विचार शास्त्राला ‘आन्वीक्षिकी’ अशी एक प्राचीन संज्ञा आहे. या शास्त्रालाच न्याय-दर्शन असे म्हणतात.
न्याय-दर्शनांत ‘अनुमान’ या प्रमाणाला मौलिक महत्त्व आहे. योग्य अनुमान व्हावे म्हणून अनेक प्रकारच्या शक्यता, काल्पनिक संभव उभे करावे लागतात. या क्रियेला ‘तर्क’ असे म्हणतात. खरोखर, तर्क-शास्त्र हा न्याय दर्शनाचा अत्यंत महत्वाचा, पण एक विभाग आहे.
‘आन्वीक्षिकी’ या प्राचीनतम शब्दात विचार-शास्त्राचे आंतर-रहस्य प्रकट झाले आहे.
‘अन्वेक्षा’ म्हणजे शोध, ‘आन्वीक्षिकी’ म्हणजे शोध करण्याचे शास्त्र. शोध करण्याच्या प्रवृत्तींत एखादा विशिष्ट परिणाम किंवा फलित याची अपेक्षा असते. काहीतरी उद्धिष्ट धरून मन-बुद्धी यांना गतिमान ठेवावे, तेव्हाच उद्दिष्ट साध्य होते. याचाच अर्थ विशिष्ट नियमांनी एका तालबद्दतेत मन-बुद्धी यांची पावले टाकणे म्हणजे शोध करणे किंवा विचार करणे.
आन्वीक्षिकी, न्याय-दर्शन, विचार-शास्त्र यांचा प्रत्यक्ष अभ्यास करता आला तर उत्तमच. पण तशी संधी न मिळाली तरी स्वत:ची विचार-क्रिया सहेतुक ठेवण्याचा अभ्यास ठेवला तर महान विचानवंत होता येईल.
केवळ स्फूर्ती-निष्ठेने विचारवन्त झालेली अनेकानेक माणसे तत्व-शास्त्राच्या इतिहासाला अलंकारभूत झाली आहेत, अधिक प्रभावी विचारक व प्रतिभासंपन्न झाली आहेत.
न्याय-दर्शनाचे, विचार-शास्त्राचे आद्य प्रणेते श्रीगौतम यांनी स्फूर्ती-निष्ठेनेच विचार शास्त्र निर्माण केले. अगोदर न्याय-दर्शनाचा जड अभ्यास करून नंतर ते न्यायदर्शनकार झाले असे नव्हे, कारण त्यांचेपूर्वी न्याय-दर्शन होतेच कोठे? काही थोडे स्थूल विचार निश्चितपणे त्यांचेपूर्वीही होतेच. पण त्यांनी निर्माण केलेला विचार-शास्त्राचा भव्य-सुंदर ताजमहाल स्वयं स्फूर्तीच्या आधारानेच साकारला आहे.
एवंच, न्याय-दर्शनाचा अभ्यास नसला तरी मन-बुद्धीची स्वैरता आवरून नियमनिष्ठ चिंतनाने जीवनसाफल्य साधता येईल.
ॐ ॐ ॐ