मोक्ष व्हावयाचा, मुक्तता व्हावयाची ती अज्ञानाच्या पाशातून.
अज्ञान हेच खरे बंधन.
वासनादेखील अज्ञानाचाच एक अवतार आहे. वासना शुद्ध अज्ञानापेक्षा अधिक प्रभावी असतात.
अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे.
अज्ञान ही एक स्वतंत्र शक्ती मानणे अधिक संयुक्तिक आहे.
अज्ञान हे वासनेच्या दुर्गावतारांत प्रकट होते तेव्हा त्याची शक्ती सहस्त्रगुणित होते.
वासनेच्या चंड-शक्तीवर विजय मिळविण्याचे सामर्थ्य एकट्या ज्ञानतत्त्वालाच आहे.
एका वासनेने दुसर्या वासनेला जिंकता येत नाही.
सत्वासना विजयी व्हावयास ज्ञानाचा हस्तावलंब घ्यावा लागतो.
असत्वासनेची ऊर्मी नुसत्या सत् वासनेने पराभूत होत नाही.
किंबहुना, प्रत्येक विलोभनाचे वेळी, प्रत्येक असत् वासनेच्या उर्मीबरोबर सद्भावनेचे साहचर्य असतेच. म्हणजे दुसर्या शब्दांत सत् व असत् नेहमी असते. मात्र सत्-असत् ‘विवेक’ नसतो. ज्ञानाच्या दीपकलिकेचा अभाव असतो.
सत्वासनेला देखील स्वयंप्रभशक्ती नसते. केवळ ज्ञान हेच एक स्वयंप्रकाश, स्वयंसिद्ध व स्वत:प्रमाण असे तत्त्व आहे.
ज्ञान हेच विमोचक किंबहुना साक्षात मुक्तीस्वरूपच आहे.
ज्ञानाने वासनावस्तूचे विश्लेषण होताच वासनेची आक्रमक शक्ती लुळी पडते.
ज्ञानबिंबांच्या कोटिसूर्य प्रकाशांत कोठलेही विलोभन निश्चेष्ट होऊन त्याच्या शवच्छेदनाची क्रिया सहजासहजी घडून जाते.
पर-वैराग्य ते हेच, मोक्ष म्हणतात तो हाच.
सर्व साकार वासनांचे म्हणजेच सर्व कर्मांचे भस्म करणारा ज्ञानाग्नी प्रज्वलित केल्याशिवाय वासनांच्या विश्वपाशांतून कोणीही आणि केव्हाही मुक्त होऊ शकत नाही.
ॐ ॐ ॐ