पार्श्वभूमी:
१२ जानेवारी १९६३ रोजी महर्षी न्यायरत्न विनोद यांचा ६१ वा जन्मदिवस आहे. स्वामी विवेकानंदांची जन्मतारीख १२ जानेवारी हीच आहे, हा योगायोग अर्थपूर्ण व महत्त्वपूर्ण आहे. महर्षी विनोद यांनी स्वामी विवेकानंद यांचे कार्य अमेरिकेत सुमारे तीन वर्ष राहून पुनरूज्जीवित् केले. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र यांचा प्रभावी प्रचार केला.
‘रोहिणी’ महर्षी विनोदांची एक मानसकन्या आहे. त्यांच्या आशीर्वादाने, ‘रोहिणी’ चांगली नावारूपाला आली आहे.
त्यांच्या ६१ व्या जयंती निमित्त रोहिणीचा हा जानेवारीचा अंक त्यांना सादर समर्पण करीत आहो. महर्षींबद्दलच्या केवळ प्रेमादराचे प्रतीक म्हणून शनिवार दि. १२ जानेवारी १९६३ रोजी, एक लहानसे ‘शांति मंदिर’ (२१०० विजयानगर कॉलनी, टिळक रोड, एस. पी. कॉलेजचे मागे, पुणे ३०) त्यांना समर्पण करण्यांत येणार आहे.)</p>
- संपादक, रोहिणी, जाने. १९६३
जागे राहिले पाहिजे - जीवनाचा अर्थ (उत्तरार्ध)
प्रवाचक - न्या. विनोद
जीवनाचा अर्थ काय? जीवनाचे साफल्य कशांत आहे, याबद्दल आपण जागे राहिले पाहिजे.
स्वाभिमानाने, आत्मीय तेजाने आपण आज जगत आहोत काय? उद्या जगू शकू काय? या प्रश्नाबद्दल स्वत:ला जागृत करण्याचा हा दिवस आहे. महाराष्ट्राचे, भारताचे, अखिल मानवतेचे नेतृत्व परिवर्तित झाले पाहिजे. भीती, अविश्वास, संशय या कनिष्ठ भावनांनी आजचे जागतिक नेतृत्व निष्पन्न केले आहे. धैर्य, प्रेम, श्रद्धा या त्रैगुण्याने अलंकृत असे नेतृत्व आज मनुष्यजातीला आवश्यक आहे.
असे नेतृत्व निर्माण करणे हे आपणां सर्वांचे कर्तव्य आहे.
संन्यास म्हणजे सम्यक् न्यास. जीवनांतल्या मूल्यांचा अनुक्रम लावणे याचा अर्थ धर्म.
अग्रपूजेचा मान, अग्र तत्त्वाला, अग्र कर्तव्याला, अग्र व्यक्तीला देणे हेच जीवनाचे तत्त्वशास्त्र.
आपली चूक होते, प्रमाद होतो, तो येथेच पहिले स्थान, आपण द्वितीय, तृतीय, पंचम मूल्यांना आपण देत रहातो.
अनासक्त, अग्रेसर, त्यागी, सत्यनिष्ठ, धीर, वीर, कर्मयोगी, नेते हीच मानवतेची आशा.
संन्यस्त श्रमण हेच जगदुद्धार करू शकतील. एच. जी. वेल्स्, शॉ, ड्युई, गेराल्ड हर्ड, यांच्यासारखे पाश्चिमात्य तत्त्वज्ञ हेच सांगून राहिले आहेत. संन्यास म्हणजे जीवनाशी भ्याड विन्मुखता नव्हे.
संन्यास म्हणजे जीवनाचा यथामूल्य स्वीकार व सत्कार. आद्य शंकराचार्यांनी या विधायक संन्यासाचा विचार, आचार व प्रचार केला.
कर्मयोगाचे अधिष्ठान व आन्तररहस्य, संन्यस्त वृत्तीत आहे.
धैर्य हा सर्व योगांचा आत्मा होय.
धैर्य हा शब्द धी शब्दावरून सिद्ध झाला आहे.
धैर्य हा भावनेचा परिणाम नसून अचल बुद्धिनिष्ठेचा परिपाक आहे.
महाराष्ट्रीय प्रज्ञा म्हणजेच महाराष्ट्राची धीरगंभीर मनस्विता; मराठ्यांचा मानदंड असणारी बुद्धिनिष्ठा.
जो पुरुष विचार करू शकत नाही, त्याला मूर्ख म्हणतात. जो विचार करू इच्छित नाही, त्याला - हेकट, हटवादी म्हणतात. जो विचार करू धजत नाही - त्याला गुलाम म्हणतात.
प्रत्येक महाराष्ट्रीय विचार करू शकतो, विचार करू धजतो, पण पुष्कळ वेळा विचार करू इच्छित नाही.
आपल्या महाराष्ट्रीयांत हा एवढाच पण केवढा प्रचंड दोष आहे!
उदासीनता, उपेक्षा, ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती, हा महान् दुर्गुण आपल्या विकासाच्या व वैभवाच्या आड येत आहे.
आपली स्वयंप्रज्ञा, आपले मनोधैर्य, याबद्दल श्रद्धा ठेवू या.
पण आपल्या दोषांबद्दल व दुर्गुणांबद्दल अधिक जागृत राहू या.
यजुर्वेद म्हणतो - ‘भूत्यै जागरणम्।’
‘भूती’ म्हणजे विकास व वैभव पाहिजे असेल तर जागे झाले पाहिजे. - जागे राहिले पाहिजे.
ॐ ॐ ॐ