पृथ्वीपर्यटनाची फ़लश्रुती
(१)
पृथ्वी स्वत:भोवती फ़िरते, पण तसे करताना ती सूर्यनारायणालाही प्रदक्षिणा घालते. मानवाने देखील स्वत:चे अर्थ, स्वार्थ साधता साधता एखाद्या महान, श्रेष्ठतम, परम-अर्थाभोवती प्रदक्षिणा घालीत राहिले पाहिजे. स्वत:भोवती फ़िरणे हे पाप नव्हे. पण एकाच ठिकाणी, स्वत:भोवती फ़िरत राहिल्यास थोड्या वेळानंतर मूर्छा, अध:पतन व कदाचित मरणही क्रमप्राप्त होते. पण स्थानबद्ध न रहाता, केवळ स्वत:च्याच स्वार्थला थोडे गतीमान ठेवणे, स्वत:भोवतीच्या गिरकीबरोबर फ़िरत्या पावलांनी दुसरे एखादे गतीचक्र किंवा चक्रगती निष्पन्न करणे, हे शक्य झाल्यास, नव्हे झाले तरच अध:पात व अपघात टळू शकेल. स्वार्थ आणि परम-अर्थ; स्व-इष्टी, समेष्टी व परम-इष्टी या त्रयीमध्ये परस्पर विरोध नाही. किंबहुना, हे त्रि-विक्रम नृत्य, त्रिविध पदक्षेप, प्रस्थान-त्रयी व प्रगमन-त्रयी, स्वभावत: एकमात्र व एकस्वरूपच आहे. परमार्थ दृष्टीशिवाय ईश्वरनिष्ठा व ईश्वरनिष्ठेशिवाय समाजसेवा किंवा मानव्यसेवा, सुघटित व सुव्यवस्थित होत नाही. प्रथम स्वार्थ, नंतर समाज व शेवटी परमार्थ हा अनुक्रम चुकीचा होय. ही तीनही उद्दीष्टे, हेतू एकतालातच साधता येतात व आली पाहिजेत. तीनही एकदम न साधली तर एकही साधत नाही व जीवनात अनंत विकृती निर्माण होतात. मी, समाज व देव; व्यष्टी, समष्टी व परमेष्टी ही तत्वत: एकस्वरूप आहेत. ती एक त्रिपदा गायत्री आहे. या सत्याची ओळख ही माझ्या जागतिक प्रवासाची व अभ्यासाची मुख्य फ़लश्रुती होय.
(२)
युरोप दोन युद्धजन्य आघातांनी मृतप्राय झाला आहे. रशिया मात्र गेल्या युद्धाने विशेष प्रमाणात शक्तिसंपन्न झाला आहे. त्याचे कारण तेथील समत्त्वनिष्ठ, प्रगमनशील व सहानुभावप्रधान तत्त्वज्ञान. मात्र या तत्त्वज्ञानाच्या प्रयोजनपद्धतीत काही हिंसाप्रधान आगंतुक दोष आले आहेत. ऑस्ट्रेलियाला युद्धजन्य परिस्थितीची झळ तितकीशी लागली नाही. अमेरिकेला दुसर्या महायुद्धाने सर्वसंपन्न व सर्वश्रेष्ठ करून ठेवले आहे. आफ़्रिका खंडात साम्राज्यशाही व लोकशाही, श्वेतवर्णीय व कृष्णवर्णीय, यंत्रयुग व कृषियुग या द्वंद्वांचा संघर्ष अधिकाधिक गंभीर व तीव्र स्वरूपाचा होत आहे. आशिया खंडात भारत, ब्रह्मदेश, सयाम, चीन, अतिपूर्वेकडील जपान, फिलिपिना इत्यादी प्रदेश, या सर्व राष्ट्रांत, दुसर्या महायुद्धाने लोकशाहीच्या तत्त्वांचा बीजारोप केला आहे. आशिया खंडात एका नव्या उष:कालाची किरणे दिसू लागली आहेत. पश्चिमेकडे मावळत जात असलेला सूर्य जणू काय पूर्व क्षितिजावर पुन्हा उदित होत आहे.
(३)
आजच्या मानवमात्राने काही सत्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. (१) आपण राष्ट्रवादाच्या व वर्गवादाच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. (२) आंतर-राष्ट्रीय जीवन व जीवनात अध्याहृत असलेली मूल्ये व मन:स्थिती या गोष्टी आता कल्पनासृष्टीत राहिल्या नसून वास्तवतेत उतरल्या आहेत व अधिकाधिक प्रमाणात उतरत रहाणार. (३) अणुविज्ञानाच्या प्रगतीने मानवी संस्कृतीचा सर्वस्वनाश प्रत्यक्ष कधीही होणार नाही; याबद्दल अनेक प्रमाणे व गमके आज उपलब्ध आहेत. अणुशक्तीचा उपयोग विधायक पद्धतीने व सर्वोदयाला पोषक असाच यापुढे केला जाईल. (४) अतिमानसशास्त्र (Para-Psychology) मनुष्यमात्राच्या ठिकाणी प्रसुप्त, अ-विकसित व अ-स्फ़ुटित असलेल्या अनेक शक्तींना प्रकट करून, मनुष्यमात्राच्या आंतरसिद्धी शतगुणित करणार आहे. (५) वर्गवाद व राष्ट्रवाद या मानव कुटुंबाच्या अविभाज्य एकतेकडे नेणार्या सांस्कृतिक अवस्था आहेत. विशिष्ट मर्यादेपलिकडे त्यांची अतिव्याप्ती व अतिचार झाल्यास मानवकुलाचा आत्मसंहार होऊ शकेल. (६) युद्धनिर्मूलन हे शक्यतेच्या कक्षेत आहे. (७) जगत्-शांतीचा उदय मानवमात्राने स्वत:चा हृदयपालट व क्रियापालट केल्याशिवाय होणार नाही. हा हृदयपालट प्रत्यक्ष प्रतीके व साक्षात उदाहरणे निर्माण झाल्याने होऊ शकेल. शाब्दिक प्रचार व वाक्यवार्तिके हा परिणाम घडावून आणण्यास असमर्थ ठरतील. (८) विशुद्ध विचार करता आल्याशिवाय उदात्त उदाहरणांची, प्रत्यक्ष प्रतीकांची ओळख व अनुकार होत नाही. मूल्यदर्शन व महत्त्वमापन, विशुद्ध वि-चिकित्सेशिवाय संभवनीय नसते. (९) प्रज्ञा, प्रतिभा व प्रतीक यांच्या समन्विन उपाययोजनेत मानवी संस्कृतीच्या शांतीनिष्ठ पुनर्रचनेची बीजशक्ती आहे.
(४)
अमेरिकेची कर्तृत्त्वशक्ती, रशियाची समत्त्वनिष्ठा व भारताचा प्रज्ञानप्रखर शांतीपाठ या तिहींच्या समन्वयात मानवतेच्या भविष्य कालाचे भाग्यविधान आहे. जगाला मानव्याच्या अंत:स्वरूपाचे ज्ञान एक भारतच देऊ शकेल. विश्वशांतीची संहिता व संविधान भारतातच पुन:पुन: अवतीर्ण झाली आहेत. आजच्या जगातील सर्व मानवांच्या अडीचशे कोटी कंठांतून शांतीपाठाचे सामसंगीत भारतीय नेतृत्त्वानेच प्रकट होणार आहे. स्पेन, पोर्तुगाल व इटालियाच्या गूढ व गाढ धर्मश्रद्धेत, स्वित्झर्लंडच्या तटस्थतेत, इंग्लंडच्या राजकीय प्रतिष्ठेत, फ़्रान्सच्या स्वातंत्र्यप्रीतीत, जर्मनीच्या यंत्रविधानात जगत्शांतीची काही बीजे आढळली. अमेरिकेच्या ओजस्वी आवेगात, हवाई बेटांच्या भव्य सौंदर्यात, जपानी लोकांच्या आत्माहुतीत, हाराकिरीत व राष्ट्रनिष्ठेत भावी जगत्शांतीची प्रसादचिह्नेच मला आढळून आली. ब्रह्मदेशमधले शांतीब्रह्म, सयाममधला प्रशांत संयम व फ़िलिपिनाच्या सप्तसहस्र द्वीपांमधले शांतीदीप, प्रत्येक राष्ट्रात, लोकसमूहात, अद्यतन व पुरातन संस्कृतीदर्पणातून, भावी विश्वशांतीचे किरण बागडताना मला दिसले. सर्वसामान्य जनतेला युद्धे नको आहेत. काही महत्त्वाकांक्षी राक्षसांना, उन्मत्त अहं-विशिष्टांना युद्ध हवे असते. लोकशाहीला, सर्वसामान्य जनता-जनार्दनाला विश्वशांती, युद्धनिर्मूलन व सर्वोदय हीच सर्वदा व सर्वथैव इष्ट असतात.
(५)
उत्तर ध्रुवाच्या उच्चतम बिंदूवर आरूढल्यावर क्षुद्रवृत्ती, मर्यादित क्षितिजे आपोआप नाहीशी होतात. प्रथमत: तेथेच, आज उपलब्ध असलेल्या श्रुतीतले शांतीपाठ अवतीर्ण झाले. त्या शांतीपाठाचे प्रतिध्वनी युगायुगांतून झिरपत येऊन माझ्या श्रुतीपथावर प्रकट झाल्यासारखे मला वाटले. शांतीपाठाच्या स्वरांत उद्याचे अर्थकारण, राजकारण व समाजकारण प्रगट झाले पाहिजे व होईलच. मात्र आज प्रत्येकाने व सर्वांनी सर्वोदयाचा शांतीदीप स्वत:चे अंत:करणात उजळला पाहिजे. या दीपांची दीपावली वैदिक द्रष्ट्यांच्या शांतीपाठांनी प्रथमत: सुरू केली. त्या तेज:स्वरूपात व शांतीस्वरांत यंदाची व भविष्यकालची प्रत्येक दिवाळी मानवसमाजाने साजरी करणे युक्त ठरेल.
ॐ ॐ ॐ