वैराग्य म्हटले की, आपल्या मनांत जटा, कफनी, संन्याशी, भिक्षा, लोटा वगैरे गोष्टी उभ्या राहतात. तिरस्कार, त्याग, पलायन असल्या वृत्ती व कृती मनांत येतात.
वैराग्याचा खरा अर्थ मनांत घेतला की, ही चित्रे डोळयांपुढे येणार नाहीत. वैराग्य ही सर्वथैव विधायक वृत्ती आहे.
वैराग्य-वृत्तीचे अंतरंग आस्वादमय व आनंदमय आहे. श्रेष्ठतम विरागाला एक धुन्दी, नशा किंवा उन्मत्तता देखील म्हणता येईल.
वैराग्यात स्वतंत्र वृत्तीची प्रफुल्लता आहे. इंद्रियसन्निकर्षाने प्राप्त् होणार्या सर्व आस्वादांनी अधिक रूचिकर असा आस्वाद विरागी वृत्ति देऊ शकते. वैराग्य वृत्तीला एवढेसेदेखील परावलंबन सहन होत नाही. इंद्रियांना तृप्ती देणारे पदार्थ उपस्थित नसले, इंद्रिये निर्दोष नसली की, इंद्रियनिष्ठ आस्वाद अशक्य होणे.
वैराग्याचे तसे नाही. वैराग्याचा आनंद इंद्रियतृप्तीवर अवलंबून नाही. इंद्रियसन्निकर्षाशिवाय आनंद उत्पन्न होऊच शकत नाही. अशी आपली दृढ श्रद्धा असते. पण ती अंधश्रद्धा आहे. विचारी मनुष्याने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये.
आस्वादांत एकदा जाती व श्रेणी मान्य केली की, थेट वैराग्यापर्यंत, वैराग्यजनित आनंदापर्यंत जाणे क्रमप्राप्त होते.
सुखाचे, आस्वादाचे प्रमाण सहज लक्षांत येते पण सुखाची जाती, श्रेणी ओळखणे तितके सोपे नाही. बौद्धिक सुखाची श्रेणी किंवा जाती इंद्रियसुखाहून अगदी निराळी आहे.
इंद्रियसुखांत देखील जाती असू शकतात. स्पर्शसुखानेक्षा नेत्रसुख, नेत्रसुखापेक्षा श्रुतिसौख्य अधिक सूक्ष्म व अधिक संग्राहक असल्याचे न्यायवृत्तिकारांनी सांगितले आहे. मानसिक सुखांत देखील श्रेणी आहेत.
तर्कसुख व कल्पनासुख यांच्यापेक्षा सिद्धान्त शोधण्याचे व सिद्धविण्याचे प्रज्ञासुख अधिक तीव्र व अधिक व्यापक आहे.
बाह्य वस्तूंवर प्रज्ञेचा प्रकाशकिरण जसा पडतो. तसाच इंद्रिय-सन्निकर्षाने उत्पन्न होणार्या व तर्ककल्पनांनी उद्भवणार्या सुखावरही तो प्रज्ञेचा किरण विदारक प्रकाश टाकू शकतो.
वैराग्य हे प्रज्ञाकिरणांचे फलित आहे.
विषादाने उत्पन्न होणारे वैराग्य वासनाजन्य आहे. ती केवळ दु:खाची प्रतिक्रिया आहे. त्याने आनंद निर्माण होत नाही. ते एक पलायन आहे. प्रज्ञाजन्य वैराग्य व वासनाजन्य वैराग्य यांतला भेद लक्षांत ठेवला पाहिजे. वासनाजन्य वैराग्य हे एक बंधन आहे. वासनेपेक्षाही ते बलवत्तर असू शकते. प्रज्ञाजन्य वैराग्याने खर्या स्वातंत्र्याची अनुभूती येते.
स्वातंत्र्याची अनुभूती म्हणजेच आत्म-ज्ञान किंवा आत्मदर्शन! वैराग्य, स्वातंत्र्य व आत्म-ज्ञान ही एकाच अनुभवाची तीन दर्शने आहेत.
‘त्र्यंबक-प्रतीक, शिव-दर्शन ते हेच!’
-२-
वैराग्याचे विधायक अंग - उत्तरांग किंवा उत्तमांग हे आत्मतत्त्वच होय. त्याचा आढळ हाच ‘स्व’ चा आढळ होय. त्याच्या तंत्राने चालणे, म्हणजे स्वातंत्र्य.
स्वातंत्र्याची कोठलीही कक्षा आनंददायक असते. म्हणूनच संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे संपूर्ण आनंद!
इंद्रियनिष्ठ व वासना जन्य सौख्यांतला आनंद हा ‘संपूर्ण’ आनंद असण्याची शक्यताच नाही. इंद्रिये ही आत्मतत्त्वाला ‘पर’ आहेत, व म्हणून इंद्रियसौख्यांत परावलम्बन येते आणि स्वतंत्रता नष्ट होते. येथे मनांत संशय येतो, ते आत्मतत्त्व आहे कोठे? इंद्रियांच्या पलिकडे म्हणजे कोठे? या संशयाचा निरास प्रज्ञेचा किरण पडल्यावर अपोआप होऊन जातो.
नेत्र पाहतात, कान ऐकतात, पण नेत्रांना पाहणारी व श्रवणाला ऐकणारी अशी जी शक्ति ते आत्मतत्त्व आहे. हा नुसता शब्दच्छल नव्हे.
नेत्र पाहतात खरे, पण ते पाहणे केवळ नेत्रांसाठी नसते. पाहिला गेलेला पदार्थ व पाहण्याची क्रियादेखील ज्या तत्त्वासाठी व ज्या तत्त्वामुळे अर्थवती होते, ते तत्त्व म्हणजे आत्मा.
‘आत्मा’ हा शब्द गढूळ झाला आहे. त्याच्याऐवजी ‘शक्ति-केंद्र’ हा शब्द आपण क्षणभर वापरू या. तरीही एवढे लक्षांत राहिले पाहिजे की, हे ‘शक्तिकेंद्र’ किंवा ‘केंद्रशक्ती’ ज्ञानस्वरूप आहे. विद्युतशक्ती किंवा चुंबकशक्ती यांच्या प्रमाणे ती जडशक्ती नाही. आणखी ही ज्ञान-शक्ती इंद्रियांनी होणार्या वस्तूंच्या ज्ञानाहून निराळी आहे. जाणीवेची जाणीव, ज्ञान झाल्याचे ज्ञान होणे किंवा ज्ञाता व ज्ञेय या त्रिपुटीला पुन्हा चतुर्थ ज्ञानाचा विषय करणे.
तुरीय अवस्था ती हीच. या अवस्थेत ज्ञानक्रिया ही दुसर्या एका ज्ञानाचा विषय झालेली असते.
ज्ञानाला जाणणारे ज्ञान म्हणजे आत्मा हे आत्मतत्त्व किंवा साक्षीतत्त्व सिद्ध असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे ज्ञान शक्यच नाही.
हे ‘ज्ञान-ज्ञान’ म्हणजे ज्ञानाच्या स्वरूपाचे ज्ञान झाले की वैराग्य सहजच अवतरते.
वैराग्याचा अर्थ ज्ञानाचे साक्षित्व.
केवळ वासनाच काय, ज्ञानदेखील जेव्हा साक्षि-भास्य होते, तेव्हा सर्व प्रकारची संसर्गता, संबद्धता संपूर्णपणे नष्ट होते.
सर्व संबंध नष्ट झाले की, स्वातंत्र्याशिवाय शिल्लक काय उरणार? केवलत्व किंवा सर्व संबंधराहित्य हेच आत्मतत्त्वाचे निरंजन स्वरूप.
आत्मतत्त्व ही शून्य स्थिती नव्हे. एकादा कपोलकल्पित तर्कही नव्हे. प्रत्यक्षतेच्या सर्व अनुभूतींना अर्थवत्ता देणारे प्रत्यक्षांचे प्रत्यक्ष असे हे स्वयंसिद्ध, स्वयंप्रकाश व स्वयंपूर्ण तत्त्व आहे.
विशुद्ध विचाराने त्या सत्याची प्रतीति येते. वैराग्यदेखील या प्रतीतीला कारक आहे. याचा अर्थ साक्षित्त्व-भूमिका किंवा ज्ञान-त्रिपुटींचे ज्ञान घडविणारी शक्ती, हेच वैराग्याचे खरे स्वरूप आहे.
श्री केवल अवधूत, ऋषभ-देव, जड-भरत यांचे आदर्श वैराग्य ही ज्ञानत्रिपुटीला साक्षि-भास्य करणारी निरवस्थ अनुभूती, तुरीय स्थिती होय.
ॐ ॐ ॐ