(१२)
आपण सामान्य माणसे, ज्ञानाचे ईश्वर - ज्ञानेश्वर - नसतो. धवलगिरीवरून परतण्याची निवृत्ती-गती साधल्यावर, म्हणजे निवृत्तीच्या नंतर, ज्ञानैश्वर्याचा - ज्ञानेश्वरांचा उदय होतो. निवृत्तीनाथांशिवाय ज्ञानेश्वरांचा संभवच नाही. किंबहुना, निवृत्ती-अवस्था हेच ज्ञानेश्वरत्वाचे पूर्वांग. सेवानिवृत्त म्हणजे ‘सेवेसाठी’ निवृत्त झाले, तरच खरे ज्ञान उदित होते.
स्वभावत:, आपण ज्ञानरूप आहोत. पण ज्ञानाला देखील परिपूर्ण स्वातंत्र्य असावे. ज्ञान, आपल्या म्हणजे ज्ञानस्वरूप असणार्या आपल्या, स्व-भावी स्थिर असावे. याचा अर्थ, ज्ञानाव्यतिरिक्त दुसर्या वासनादी शक्तींच्या आहारी, आपल्या ज्ञानशक्तीने जाऊ नये, हा होय. ज्ञानानेच सर्व वासना कह्यात येऊ शकतील. केवळ सद्भावनांनी, सदिच्छांनी, आंधळया मंत्रतंत्रादी उपासनांनी आणि उदार पण भाबड्या वृत्तींनी मानवाचे खरे व स्थायी कल्याण होणार नाही. अंधश्रद्धेने मानवाचे जेवढे नुकसान झाले आहे, तेवढे, लक्षावधी महायुद्धे झाली, तरी होणार नाही. किंबहुना, सर्व महायुद्धे अंधश्रद्धेमुळेच उद्भवली आहेत. अंधश्रद्धा ही आधुनिक प्रेमापेक्षाही अधिक स्वैर व लहरी आहे. ती कुठे ‘बसेल’ त्याचा नेम नाही. थेट विज्ञानावरतीही ती जाऊन बसते. ‘आधुनिक’ झाले व ‘विज्ञान’ झाले, म्हणून तो ज्ञानाचा ‘अन्त’ नव्हे. ते नेहमी अपूर्णच व म्हणून विकास-क्षम असणार.
परीक्षेतील मार्क, नाणी व नोटा, अधिकार-पदे या व दुसर्या अनेक गोष्टी खरोखर बोध-चिन्हे आहेत. पण त्यांची वास्तवता सांकेतिक राहिली नसून, त्या गोष्टी जड वस्तूंप्रमाणे स्वयंसिद्ध होऊन बसल्या आहेत.
शब्दवस्तूंची बोध-चिन्हे राहत नाहीत. ते वस्तूंचे ‘गुणधर्म’ होऊन बसतात. शब्द व नाम ही वस्तूंच्या स्वरूपाची अंगोपांगे होतात. नाम व नामी एकच होऊन नाम हेच देव होते.
‘धवल-गिरी’ हा शब्द, हे प्रतीक अत्युच्च मानवी ध्येयाची प्रतिमा आहे. ती एक स्वयंसिद्ध वस्तू व्हावी, चैतन्यपूर्ण, सच्चिदानन्द रूप अशी विभूती व्हावी; शब्द, रूपक, प्रतीक किंवा प्रतिमा न रहाता सचेतन व सेन्द्रिय अशी व्यक्ती व शक्ती व्हावी, अशी आकांक्षा आहे.
निवृत्ती-नाथ व ज्ञानेश्वर, सर्व काळी व सर्व स्थळी, क्षणाक्षणाला अवतार घेतच आहेत. त्यांचा अखंड चिद्विलास आपण डोळवू या.
श्रीरामकृष्ण परमहंस, श्रीरमणमहर्षी, श्रीअरविन्द हे धवल-गिरीवरून अल्प-ज्ञ जनतेच्या जागृतीसाठी ‘निवृत्त’ झालेले ‘ज्ञानेश्वर’ होते.
जे. कृष्णमूर्ती हे तर स्वत:चा, म्हणजेच श्रीज्ञानेश्वरांचा उच्चोत्तम अमृतानुभव जगावर सिंचीत असून, निर्गुण, निराकार व अन्तिम सत्याचे दर्शन घडवीत आहेत.
निवृत्तीनन्तरचे ज्ञान, निवृत्तीनाथांचे धाकटे बन्धू ज्ञानेश्वर - हेच अखंडतेने अवतार घेत आहेत. तेच अनन्तकालापासून, मानवजातीचे विमोचक आहेत. ‘निवृत्ती-ज्ञानानेच’ सर्व प्रकारच्या वृत्ती-ज्ञानांचे व ज्ञान-वृत्तीचे कैवल्यात स्वरूपांतर करणे शक्य आहे.
‘निवृत्ती-ज्ञान’ हीच आपली स्फूर्ती, गती व शक्ती आहे.
- धुं.गो. विनोद