(११)
बुद्ध व जीझस, सॉक्रेटिस व प्लेटो, तसेच लायब्नीज, इमर्सन्, एरिक फ्राम्म इत्यादी धर्म-ज्ञ व तत्त्व-ज्ञ, वासना-विजय हे मोक्षाचे, अल्पाधिक प्रमाणात मुख्यांग समजतात. भारतीय दर्शनकारांची मोक्षविषयक भूमिका अत्यंत सु-स्पष्ट, प्रज्ञाप्रधान व पूर्णत: विधायक स्वरूपाची आहे.
सांख्यदर्शनकार कपिल मुनि ‘नि:श्रेयस् म्हणजे मोक्ष’ असे म्हणतात.‘आत्यंतिक-कर्ममोक्षणं मोक्ष:।’ असे जैनांचे ‘अर्हत दर्शन’ म्हणते.
शांकरवेदान्तात, ‘अविद्या अस्त-मयो मोक्ष:।’ असा मोक्षाचा अर्थ दिलेला आहे.
पायांना डोळे असणारे अक्षपाद अर्थात न्यायदर्शनाचे प्रणेते गौतम यांनी मोक्षाचा सर्वोत्कृष्ट अर्थ सांगितला आहे. ते म्हणतात, ‘स्वातन्त्र्यं मोक्ष:।’ सर्वांगीण व आत्यंतिक स्वातंत्र्य हाच मोक्ष होय.
भगवान पतंजलींनी कैवल्यावस्थेचा अर्थ दोन प्रकारांनी सांगितला आहे. पुरुषार्थशून्य झालेल्या सत्त्व, रज, तम या तीन गुणांचे प्रयोजन संपल्यामुळे ते त्यांच्या उत्पादन-कारणात विलीन होतात, म्हणजे प्रकृतीत विलीन होतात व त्यांच्या अभावी प्रकृतीही पुरुष-तत्त्वात, मूळ चैतन्यात समरस होते. ‘पुरूषार्थ शून्यानाम् गुणानाम् प्रतिप्रसव:।’
दुसर्या प्रकारात, कैवल्य म्हणजे वृत्ती-राहित्य. अज्ञानबंध नाहीसा झाल्यामुळे किंवा अविद्येचा अस्त झाल्यामुळे चितिशक्ती, अथवा मूळ चैतन्य, स्वत:च्या मूल-स्थितीत, अविकृत अशा नित्य स्थितीत असणे, म्हणजे कैवल्य! स्वरूप-प्रतिष्ठा व चितिशक्ती:
मला स्वत:ला, पतंजलींचे व अक्षपाद गौतमांचे विवेचन अतिशय स्पष्ट, उद्बोधक व विमोचक वाटले.
ही अवस्था, किंवा खरोखर अवस्था-राहित्य, एकदा प्राप्त झाल्यावर स्थिरत्वाने ते तसेच राहत असेल, असे मला वाटत नाही. पण तो अनुभव एकदाही आला, तरी नंतर उद्भवणार्या सर्व वृत्ती मात्र, आगळया स्वरूपाच्या व वेगळया सुगंधाच्या असतात.
‘धवल-गिरी’च्या अन्त्य शैलावरून परतल्याचा अनुभव तो हाच. निवृत्तीनाथांची अनुभूती ती हीच. अनुभवामृत तेही हेच. या अवस्थेत ज्ञान असते. पण त्या ज्ञानाच्या स्थलकालादी मर्यादा व बन्धने लुप्त् झालेली असतात.