(१०)
मोक्षाच्या साधनेला या चारी तत्त्वांचा स्वतंत्रपणे व संयुक्त उपयोग करावा लागतो.
‘धवलगिरी’ या ग्रंथात ही चारी उपकरणे इतस्तत: उपयोगात आणलेली आहेत. येथे खुणेचे शब्द आहेत, रूपके आहेत, प्रतीके व प्रतिमा तर या ग्रंथातील विवेचनाची घटक-द्रव्ये आहेत.
हा सर्व ग्रंथ म्हणजे आध्यात्मिक विकासावरील एक रूपक आहे. श्वान, हिरण्य-पुरूष ही प्रतीके आहेत. श्रीगुरुदेव व धवलगिरी या प्रतिमा आहेत.
या सर्व अनुभवांतून जाणारी व्यक्ती - तिलाही बुद्धीचे प्रतीक समजावयाचे आहे. ही व्यक्ती मानवमात्राच्या बुद्धीची प्रतिनिधी आहे. या ग्रंथातला अनुभव हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा नाही. कोणत्याही व प्रत्येक मानवालाही या अनुभव-मालिकेतून जावयाचे असते.
हा ग्रंथ केवळ वाचावयाचा नसून या ग्रंथाचे ‘अव’ लोकन करावयाचे आहे, त्यात ‘खोल दृष्टी’ टाकावयाची आहे. त्यात उपयोजिलेली प्रतिमा व प्रतीके हळुवारपणे डोळवावयाची आहेत. या ग्रंथाचे अवलोकन करावयाचे, म्हणजे स्वत:च्या ठिकाणी द्रष्टेपण जागे करणे होय.
हा ग्रंथ माझा नाही. प्रत्येक व्यक्तीचा आहे. या ग्रंथात केवळ माझ्याच नव्हे, प्रत्येक मानवाच्या अवश्यंभावी अनुभवांचा संग्रह आहे.