(९)
शब्द, रूपक, प्रतीक आणि प्रतिमा यांच्या चतुष्कोणात अर्थप्राप्तीच्या सर्व साधना सामावल्या जातात. हे चारी प्रकार, वस्तूंचे ज्ञान स्पष्टतर करतात. निरुक्तिदृष्ट्या बहुतेक सर्व शब्द ही रूपके, प्रतीके अथवा प्रतिमा असतात.
‘सरित्’ हा शब्द, सरणार्या, वाहणार्या पाण्याचे रूपक, प्रतीक व प्रतिमा या तीनही तत्त्वांना सुचविणारा आहे, हे खरे. पण नुसते, त्या एका शब्दाने होणारे ज्ञान तितकेसे परिणामकारक नाही.
रूपके, प्रतीके व प्रतिमा ही तीन साधने ज्ञानाला चित्रमय स्वरूप देतात. रूपक हे कथात्मक पद्धतीने ज्ञान देते. रूपकाचे लक्षण मम्मटाने पुढील शब्दांत दिले आहे. ‘तद्रूपकमभेदो य उपमानोपमेययो:।’ मुख आणि चंद्र यांच्यामधला अभेद दर्शविणारे रूपक, ‘मुखचंद्र’ या शब्दाने सिद्ध होते. येथे ‘मुखचंद्र’ हा शब्द, हेच रूपक आहे. चंद्र हे उपमान, मुख हे उपमेय, यांच्यातील अद्वैत येथे दर्शविले गेले आहे.
प्रतीक म्हणजे प्रतिनिधित्व करणारे सूचक चिन्ह. मूलवस्तूचे प्रतीक, हे सर्वांगीण सूचना करते. मात्र ते रहस्य-दर्शक असल्यामुळे मूळ वस्तूसारखे आकाराने विशाल व स्थूल नसते, ते सूक्ष्म व सूचक असते.
‘मंगल-मूर्ती’ हा शब्द किंवा ‘सन्त-चरण-रज’, ‘धवल-गिरी’ हे शब्द, प्रतिमेची उदाहरणे आहेत. प्रतिमा ही पूर्णपणे मानस-प्रत्यक्षात येऊ शकतात. प्रतिमा म्हणजे संपूर्ण शब्द-चित्र. प्रतीक हे पूर्णतया, वस्तूला मानस-प्रत्यक्षात आणीत नाही.
प्रतीक हे मूलवस्तूचे निर्देशक असते. पण शब्दापेक्षा ते अधिक अर्थसंग्राहक असते. प्रतीक हे संकलित स्वरूपाचे, संपूर्ण स्वरूपाचे बोधक असते. प्रतिमा ही संकलित स्वरूपाची साक्षात मूर्ती होय. प्रतिमेच्या ठिकाणी वस्तूचे संपूर्ण प्रात्यक्षिक व प्रतिनिधित्व असते.