(८)
आधुनिक विज्ञानाने श्रद्धा कमी झाली आहे, अशी एक तक्रार आहे. पण श्रद्धा कमी झाली असली, तरी जिज्ञासा वाढली आहे, हे नाकबूल करता येणार नाही. पण श्रद्धा कमी झाली म्हणजे काय? किंवा अगोदर श्रद्धा म्हणजेच काय? आंधळा व भाबडा विश्वास, म्हणजे का श्रद्धा म्हणावयाची?
श्रद्धेचे मूल स्वरूप, निरुक्तार्थ हुडकण्याची येथे आवश्यकता उद्भवली. कोशकार वाचस्पतीने श्रद्धेचा अर्थ, ‘सत्य धारण करण्याची शक्ती’, असा केला आहे. तो लक्षात घेतला म्हणजे, श्रद्धा व बुद्विवाद यांतले अंतर स्पष्ट झाले. जिज्ञासा आज वाढली आहे, म्हणजे श्रद्धाच वाढली आहे, असे म्हणण्यासारखे आहे. जिज्ञासेने जागृत झालेली बुद्धी, ज्ञानाचे ‘आकलन’ करते व श्रद्धा ते ज्ञान ‘दृढ’ करते. जेथे जिज्ञासा व ज्ञान आहे, तेथे श्रद्धा उद्भवणारच.
जिज्ञासा व मुमुक्षा हे दोन्ही शब्द सर्वथैव परस्पर-पूरक आहेत. ज्ञानाची इच्छा म्हणजे ‘जिज्ञासा’ व मोक्षाची इच्छा म्हणजे ‘मुमुक्षा’. ज्ञान म्हणजे अज्ञान-बंधापासून मुक्तता. तसे पाहिले, तर अज्ञान हा एकमात्र बंध आहे. मुक्त होण्याची इच्छा ही तत्त्वत: अज्ञानातून मुक्त होण्याची इच्छा आहे.
अतएव, जिज्ञासा व मुमुक्षा ही पदे समानार्थक आहेत. त्यात थोडा भेद आहे, तो लहान मुलाला भरविताना एका घासाचे दोन घास बनवितात, तशा स्वरूपाचा आहे. काऊचा, चिऊचा, मोराचा आणि मामाचा हे लहान-मोठे घास एकाच भाताचे, एकाच बाळासाठी व एकच माऊली तयार करीत असते. अगदी तसाच प्रकार अध्यात्म-माऊलीचा आहे. साधक एकच असतो. अध्यात्म-शास्त्राची माऊली तीच असते. साधनेची स्वरूपे व आकार मात्र भिन्न-भिन्न असतात. माऊली सर्व-ज्ञ आहे. सर्व साधकांना व सर्व साधनांना ती पूर्णपणे जाणते.