(७)
‘धर्म’, ‘आत्मा’, ‘मोक्ष’ व ‘निवृत्ती’ या शब्दांचे मूळ स्वरूप, निरुक्ती, सहज-संदेश हुडकून काढणे, त्या शब्दांचे वास्तविक अर्थ प्रकटविणे व प्रतीत करून घेणे, हे जिज्ञासूंचे व मुमुक्षूंचे आवश्यक किंबहुना, अपरिहार्य कर्तव्य आहे.
स्वत:च्या आध्यात्मिक विकासासाठी हे शब्द अनुभवात उतरविल्यावर, ते त्यांच्या अन्तस्तेजाने चमकू लागतात. त्यांच्यावर आलेली बुरशी व कोळिष्टके आपोआप दूर होतात. ती थोडी राहिली, तरी अडचण करीत नाहीत. शिवाय तीव्र जिज्ञासेच्या आणि उत्कट मुमुक्षेच्या ठिकाणी शब्दमालिन्य पचविण्याची एक सहज-शक्ती आहे.
प्रज्ञा-प्रधान महाराष्ट्रीय तरुणांना खरी अडचण भासते ती या जळमटलेल्या शब्दांची. ‘धर्म’, ‘आत्मा’, ‘मोक्ष’, ‘निवृत्ती’ हे शब्द लाल कंदिलासारखे, त्यांना अगतिक करतात. त्यांच्या ठिकाणी तीव्रतम जिज्ञासा असते. पण हे शब्द अर्थवन्त राहिलेले नसल्यामुळे त्यांचा तिरस्कार केला जातो. चाकांतील हवा गेल्यावर सायकलवर बसण्याचा आनन्द कसा शिल्लक उरणार?
स्वत:साठी व स्वत:च्या प्रयत्नाने या चार शब्दांना आपण पुन्हा उजाळा दिला पाहिजे. त्यांचे अन्तस्तेज प्रकटविले पाहिजे. त्यांना नवे नेपथ्य चढविले पाहिजे.
युगायुगांनी, शतकाशतकांनी किंवा दशकादशकांनीदेखील शब्दांचा उपयोग आणि अर्थ बदलत असतो. त्या शब्दांचे मूल धातू, स्वरूपार्थ मात्र, सहसा बदलत नाहीत. त्यांना ऋतुमानाप्रमाणे कपडे बदलून घालणे आवश्यक होते.
शब्दांच्या वेषभूषेबद्दल परिवर्तनवाद स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. अर्थावर शब्द अवलंबून असतात, हा सामान्य सिद्धान्त झाला. पण शब्दावर अर्थ अवलंबून असतात, हे सत्यही लक्षात राहिले पाहिजे. सामाजिक अवस्था व स्थित्यंतरे त्याच शब्दांतून निरनिराळे अर्थ व्यक्तवू शकतात. उदाहरणार्थ, ‘लाल झेंडा’ या शब्दांतील, ‘लाल’ या शब्दाने आज जो अर्थ व्यक्त होतो, तो १९१८ सालापूर्वी व्यक्त होऊ शकला असता काय?
एवंच, शब्द स्थिर असतो. ‘शब्दो नित्य:।’ त्याचे ‘अर्थ’ बदलत राहतात; हे सत्य आपण ध्यानात ठेवले, तर जुन्या शब्दांना स्वत:ला व आजच्या युगाला उपयुक्त व समुचित असे अर्थ देणे, क्रमप्राप्त आहे. मात्र शब्दांच्या मूल धातूशी, स्वरूपार्थाशी हे अर्थ विसंगत असता कामा नयेत.
‘धर्म’ म्हणजे त्रिकालाबाधित नियम किंवा तत्त्व, ‘मोक्ष’ म्हणजे सर्वांगीण स्वातंत्र्य, ‘आत्मा’ म्हणजे अनुभवांना अर्थवत्ता देणारे केंद्र, ‘निवृत्ती’ म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञानदानासाठी होणारी प्रवृत्ती, हे स्थूल पण रहस्य-ज्ञापक अर्थ लक्षात ठेवले, तर प्रज्ञाप्रधान महाराष्ट्रीय तरुणांचे मन अध्यात्म विषयापासून परावृत्त होणार नाही, किंबहुना तो तिकडे अधिकाधिक आकृष्ट होत राहील.