प्रकाशित साहित्य

‘शब्द’ या शब्दाचा अर्थ, ‘नाद’ असाही आहे.

(६)

शब्द-शास्त्र हे केवळ व्याकरणाने मर्यादित नाही. ‘शब्द’ या शब्दाचा अर्थ, ‘नाद’ असाही आहे. शब्दशास्त्रांत नाद-शास्त्र, संगीत-शास्त्र, मंत्र-शास्त्र, तंत्र-शास्त्र, सृष्टयुत्पत्ती-शास्त्र, विकास-शास्त्र, अध्यात्म-विद्या या सर्वांचा अंतर्भाव होतो.

निरुक्ति-शास्त्र हे तर शब्दाचे मूलांग-भूतदर्शन आहे. शब्द-शास्त्रातला अर्धांग-भूत असे शब्दार्थशास्त्र आहे. अलीकडे पाश्चात्य देशांत Semantics, म्हणजे सामान्यत: शब्दार्थ-शास्त्र हे विशेषत्वाने विकास पावत आहे. रशिया, जर्मनी व अमेरिका या देशांत गेल्या पस्तीस वर्षांमध्ये या शास्त्रात विलक्षण प्रगती झाली आहे.

रशियामध्ये शब्दशक्तीवर विशेष विचारणा सुरू आहे. ब्रॉनिस्लाव्ह मालिनावस्की या भाषाशास्त्रज्ञाने शब्दांच्या ‘शक्तीचे’ उगमस्थान कोणते, या प्रश्नाचे मूलगामी संशोधन केले आहे. ‘मानवाचे सृष्टीशी जे संबंध, क्षणाक्षणाला उत्पन्न होत असतात, त्या संबंधांच्या घटना-वैशिष्ट्यामुळे शब्दांना निरनिराळया शक्ती प्राप्त होत असतात.’ असा सिद्धान्त त्याने प्रस्थापिला आहे. कॉफका याचे मत असेच आहे.

पाणिनी, पतञ्जली, भर्तृहरी, दुर्गस्वामी, विश्वनाथ, जगदीश इत्यादी शब्दशास्त्राचे रथी, महारथी व अतिरथी यांनी शब्दार्थ-शास्त्राच्या अतिसीमा गाठल्या आहेत. त्यांच्यापुढे आल्फ्रेड टार्स्की, सी.आय.लुइस, पॉल मारहेन्के, रुडॉल्फ़ कारनॅप, स्टीफ़न उल्मन्‌ इत्यादी आधुनिक पाश्चात्त्य भाषाशास्त्री हे, अंगुष्ठमात्र उंची असलेल्या ‘वालखिल्ल्य’ प्रजेसारखे वाटतात. मी हे स्वदेशाभिमानाने म्हणत नाही. शिकॅगोचे रुडॉल्फ कारनॅप यांची व माझी न्यूयॉर्कमधील एका व्यासपीठावरून या विषयावर चर्चा झाली होती. पतञ्जली, ‘वाक्यपदीय’ कर्ता भर्तृहरी, दुर्गस्वामी यांच्या काही शब्दशास्त्रविषयक भूमिका, निवेश व दृष्टिकोन मी नम्रपणे विशद केल्यावर डॉ. कारनॅप आश्चर्य-स्तिमित झाले. त्यावेळी मोठ्या मोकळेपणाने व लीनतेने त्यांनी भर्तृहरीला वंदन केले.

आता भारतीय शब्दशास्त्राच्या अंतरंगाकडे वळू. शब्दांच्या अर्थाचा विकास तीन धारांनी होत असतो. विस्तार, संकोच आणि आदेश. संकोचानेही अर्थाचा ‘विकास’ साधतो, हा नियम विशेष महत्त्वाचा आहे. भर्तृहरीने ‘वाक्यपदीय’ या ग्रंथात, अर्थापेक्षा शब्दाला प्राधान्य दिले आहे.

अनादिनिधनं ब्रह्म शब्दतत्त्वं यदक्षरम्।

विवर्तते अर्थभावेन प्रक्रिया जगतो यत:।।

भर्तृहरीच्या मते, शब्दतत्त्व मुख्य, अक्षय व सनातन आहे; अर्थ हा त्यावरील विर्वत होय. ब्रह्म व जगत् यांच्यामधील विवर्त संबंध, हाच शब्द आणि अर्थ यांमधील संबंध आहे. दोरीच्या जागी साप दिसणे हा विवर्त. मीमांसा-दर्शनाचे प्रणेते जैमिनी हीच भूमिका ग्राह्य समजतात. तंत्रवार्त्तिककार व दुर्गस्वामी, शब्दापेक्षा अर्थाला अधिक महत्त्व देतात. वैशेषिक दर्शनकारांची भूमिका काहीशी मनोरंजक आहे. शब्द आणि अर्थ यात काही संबंधच नाही, असे ते मानतात. ‘शब्दार्थी असंबद्धौ।’ (अ. २.१८) मग शब्द व अर्थ एकत्र का येतात?

‘समय म्हणजे ईश्वरी संकेत, हे शब्द व अर्थ यांच्या संबंधाचे कारकतत्त्व आहे’, अशी त्यांची विलक्षण भूमिका आहे. हे तिन्ही दृष्टीकोन, ‘शब्द’ व ‘अर्थ’ या दोन शब्दांच्या त्रिविध अर्थामुळे उत्पन्न झाले आहेत! त्यांचा येथे अधिक विस्तार करीत नाही.

मला वाटते, ‘शब्द’ हेच नित्य तत्त्व आहे, ‘अर्थ’ परिवर्तनशील आहे. कोणत्याही शब्दाचा अर्थ निश्चित करताना, ‘औचित्य’ हा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘शब्दशक्तीप्रकाश’ कर्ते विश्वनाथ, यांनीही ‘औचित्य’ या गुणाचा निर्देश सापेक्षाने केला आहे.

सामान्यत: मी म्हणेन की, ‘औचित्य’ हा गुण मुख्य व मध्यवर्ती समजून शब्दांचे निरुक्तार्थ म्हणजे मूल धातूंचे अर्थ प्रथम पहावेत. नंतर त्या शब्दांच्या अर्थांची झालेली परिवर्तने लक्षात घ्यावीत. कोणत्याही शब्दाचा आज उपलब्ध असलेला अर्थ, ही पार्श्वभूमी दिल्यावर, मोठा प्रकाशक व प्रत्ययकारी होईल. कोणत्याही एक शब्दाचा पूर्ण अभ्यास केला, तर तो शब्द मोक्ष-प्रदाता होतो, इच्छातृप्ती करणारा, ‘कामधुक्’ होतो. हा पतंजलींचा सिद्धान्त ध्यानात ठेवला, तर भारतातल्या शब्दविवेचकांनी शब्दशास्त्राबद्दल एवढी उरस्फोड का केली असावी, या समस्येचा उलगडा होतो.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search