(४)
बद्ध जीवांसाठी, मोक्षमार्गावरील प्रवासात त्यांना धीर देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी परत फिरणारे निवृत्ती-नाथ हे मानवी प्रकृतीला संस्कृतीचे स्वरूप देणारे आहेत. संस्कर्ते गुरुदेव आहेत....‘संस्कर्ता गुरुरुच्यते।’
‘संस्कार’ हा शब्द भारतीय मनाला नेहमीच पवित्र, स्फूर्तीदायक व उद्बोधक असा वाटत आला आहे.
सम्यक् कृती, सम्यक् कार म्हणजे संस्कार. तंत्रवार्त्तिकांत ‘संस्कार’ या शब्दाचे स्पष्टीकरण करताना, गुणांची निर्मिती व दोषांचे निराकरण, हे संस्काराचे दोन विशेष निर्देशिले आहेत.
धार्मिक संस्कार आज निरर्थक, गढूळ व निष्फल वाटत असले, तरी त्यांचे कारक-हेतू व अभिप्रेत परिणाम अत्यंत आवश्यक, समर्पक, उच्च व उदात्त आहेत, यात संशय नाही.
तत्त्वत:, संस्कार या शब्दाची व्याप्ती केवळ धार्मिक संदर्भापुरती मर्यादित नाही. मानवी जीवन हा संस्कारांचा एक विशाल चित्रपट आहे.
संस्कार ही एक प्रकारची चित्रे आहेत. जड सृष्टी व सचेतन स्वरूपाची जीव-सृष्टी यांच्या अ-खंड सन्निधींत, संपर्कात व सन्निकर्षात संस्कारांचे महावस्त्र सारखे विणले जात असते. जड वस्तूवर देखील संस्कार होत असतात. जड वस्तूंच्या ठिकाणी ही संस्कार-क्षमता असल्यामुळे, खरोखर त्यांच्या ठिकाणी परिपूर्ण जडत्व नसतेच, असे पदार्थ अनुमान न्यायदर्शन-कारांनी केले आहे.
‘जड-त्व’ या शब्दाचा अर्थ असंस्कार्यता. पण सर्वथा असंस्कार्य अशी वस्तू आहेच कोठे? जड व सचेतन हा भेद पूर्णत: सापेक्ष व संदर्भनिष्ठ आहे.
‘सर्वं खल्विदं ब्रह्म।’ हे वेदपुरुषाचे महावाक्य, त्याची यथार्थता, त्यातले सत्य वस्तुत: स्वयंस्पष्टच आहे. सर्वथा अ-जड असे काहीच नाही. ज्याचे अस्ति-वाचन होऊ शकते, ते सर्व चैतन्यमय, म्हणूनच ज्ञानमय व आनन्दमय आहे, हा सिद्धांत, सहजसिद्ध व स्वयंप्रकाश आहे. अर्थात या स्वयंप्रकाश सत्याविषयी दृढ प्रतीती, दृढ भावना निर्माण होणे, ही गोष्ट सोपी नव्हे. आणि ही परिस्थिती आध्यात्मिकच काय, कोणत्याही शास्त्रांतली, अगदी पदार्थ-विज्ञान-शास्त्रातील सत्यांबद्दल व सिद्धांताबद्दलसुद्धा खरी नव्हे का?
स्वयंप्रकाश सत्यही स्वत:चे बिंब सामान्य माणसाच्या मनात एकदम निर्माण करू शकत नाही. किंबहुना, स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाश सत्ये प्रतीत होणे, विशेष अवघड असते. To see the obvious हे प्रतिभेचे एक लक्षण आहे. ठळक सत्य आकलन होण्यास सुसूक्ष्म बुद्धी लागते. ‘सर्वं खलु इदं ब्रह्म।’ हे असेच स्वयंसिद्ध, स्वयंस्पष्ट व स्वयंप्रकाश सत्य आहे. इतके ठसठशीत व ठळक असल्यामुळेच आपल्या ते लक्षात येत नाही.
प्राणधारणेला, श्वाससिद्धीला आवश्यक असणार्या हवेचे अस्तित्व आपल्या ध्यानात व ज्ञानात असते काय? ऋषींचे द्रष्टेपण साधी व सहजसिद्ध अशी सत्ये डोळविण्यात आहे.
सर्वात्मभाव, धवलगिरीचे दर्शन, जीवन्मुक्तांची सेवानिवृत्ती म्हणजे बद्धांच्या सेवेसाठी परत येणे, या तीनही गोष्टी वस्तुत: एकच आहेत. हे एक बिल्वदल आहे, हे एक त्रि-सुपर्ण आहे. हा श्रीशंकरांचा सर्वकल्याणकारी सर्व-मंगल असा त्रिशूल आहे. त्रिविध भासणारे असे एक मूल-सत्य आहे व म्हणून ते स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाश आहे.