(३)
इतरांच्या स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी जी ओढ असते, तिला ‘करुणा’ असे म्हणतात. येथे करुणा म्हणजे कीव नव्हे. करुणेला दोन कारक बीजे आहेत. तादात्म्यभाव व सर्वात्मभाव. तादात्म्यभाव या शब्दाचा अर्थ, तत् म्हणजे त्या वस्तूशी एकात्मता अनुभवणे. सर्वात्म-भाव म्हणजे सर्व वस्तूंशी, जातमात्राशी त्यांचे ऐकात्म्य सिद्ध झालेले असते.
सर्व जीवांची बद्धता ही त्यांचीच बद्धता असते. ते बद्धतेची वेदना व स्वतंत्रतेची ओढ प्रत्यक्ष अनुभवीत असतात. वर जो अनुक्रम सांगितला, तो ऐलतीरावर, अलीकडे असलेल्या जिज्ञासू जीवांसाठी आहे. वास्तविक, प्रत्यक्ष अनुभवांत सर्वात्म-भाव प्रथम आणि त्याच्यानंतर तादात्म्यभाव अशी परिस्थिती नाही. त्या दोहोंची उपयोजना समकालीन असते.
‘करुणा’ हा शब्द, प्रवाहित झालेल्या सर्वात्म-भावाचा वाचक आहे. भगवान व्यासांनी, करुणा व कारुणिक हे शब्द, सर्वात्म-भावाचे वाचक म्हणूनच योजले आहेत. परमेश्वर करुणामय आहे, याचा अर्थ देखील, त्याचा भूतमात्राशी सर्वात्मभाव व तादात्म्यभाव आहे, हाच होय.
‘दया’ या शब्दाचा मूलार्थही प्रेम असा आहे. दयिता, दयित हे संस्कृत शब्द हा अर्थ स्पष्टपणे दर्शवितात. उदाहरणार्थ: ‘दयिता जीवितालम्बनार्थी’ - (मेघदूत). येथे दयिता म्हणजे प्रिया. कीव करावी अशी व्यक्ती नव्हे.
शब्दांचे निरुक्तार्थ, मूल अर्थ व त्यांची सम्यक् उपयोजना ही अध्यात्मशास्त्राच्या ज्ञानयोगातील अत्यंत उपयुक्त अशी साधना आहे.
सूत्रकार पाणिनी व व्याकरणाचे महाभाष्यकार पतंजली व्याकरणाला एक दर्शनशास्त्र मानतात; ते यासाठी. भाष्यकार पतंजली स्पष्टच सांगतात, ‘एक: शब्द: सम्यक् अधीत: सम्यक् प्रयुक्त: स्वर्गे लोके कामधुक् भवति।’
चुकीचा शब्द हेच मायेचे, भ्रमाचे, सन्देहाचे, किंबहुना मानवी महायुद्धांचेही मुख्य कारण आहे. मानवी व्यवहारात यथार्थ शब्द-प्रयोग झाले, तर कुटुंबकलह, वर्गकलह व महायुद्धे देखील सहज टाळता येतील.
आद्य कवी वाल्मीकी यांच्या काव्यप्रतिभेला पहिली जागृती मिळाली, ते सर्वात्म-भावाचे, करुणेचे फलित होय. क्रौंच-मिथुनातील एकाची हत्या झालेली पाहून त्यांचा सर्वात्मभाव, तादात्म्य-भाव एकदम जागा झाला.
दया व करुणा ही प्रेमाचीच स्वरूपे आहेत. हे तीनही शब्द एकाच अर्थाचे द्योतक आहेत. भक्ती, परा म्हणजे अति उत्कट अशी अनुरक्ती (नारद-भक्तिसूत्रे) हिचे लक्ष्य देखील सर्वात्म-भाव हेच आहे.