(२)
‘धवलगिरी’ हे प्रतीक मुक्तीचा आस्वाद व मुक्तीचा स्वरूपार्थ प्रकटविणारे आहे. अनुभवाच्या सर्वोच्च श्रेणीचे दर्शन घडविणे, हा या प्रतीकाचा हेतू आहे. अनुभवांतील विशुद्ध ज्ञान कशा स्वरूपाचे असते, हेही या प्रतीकाने विशद होईल.
‘धवल’ हे पद ज्ञानाचे वाचक आहे व गिरी हे पद सर्वश्रेष्ठ, उत्तुंग अशा अनुभवाचे आहे.
हे दोनही बिंदू - ज्ञान व अनुभव - धवलगिरी-पदावर पोहोचल्यानंतर निराळे राहत नाहीत.
ज्ञान आणि अनुभव तेथे एकतेत विलीन होतात. तेथे पोहोचल्यानंतर पुनश्च परतणारे जीव हे खर्या अर्थाने ‘निवृत्त’ झालेले जीव होत. ‘निवृत्ती-नाथ’ हे पद त्यांनाच लागू शकते. मोक्षद्वारापासून ते निवृत्त झालेले असतात. इतरांच्या मुक्तीसाठी ते परत फिरलेले असतात. ही निवृत्तीची यात्रा ते स्वेच्छेने निवडतात, असा अध्यात्मशास्त्रातला एक संकेत आहे. पण ही मुक्ती - ‘नंतरची’ ‘स्व’ - इच्छा असल्यामुळे, सामान्य अर्थाने ती ‘त्यांची’ इच्छा म्हणणे, तितकेसे युक्त नाही. खरोखर ती यदच्छा किंवा ईश्वरी इच्छा असते. ते जीव ईश्वर-तत्त्वाशी समरस देखील नव्हे, एकरस झालेले असतात. शिवाय वर आपण पाहिलेलेच आहे की, एकेकल्या जीवाच्या मुक्तीची शक्यताच नसते. त्यांची बद्धता व इतरांची बद्धता, ही दोन पदे आहेत. दोन निरनिराळया वस्तू आहेत अशी प्रतीती त्या मुक्त जीवांना येणार कशी?
जोपर्यंत व जेथे बद्धता असेल, तोपर्यंत व तेथे ते मुक्त, बद्धतेला दूर करण्यासाठी उपस्थित असणारच.