मराठी १० वी (इंग्रजी ५ वी) मध्ये असताना न्यायरत्नांनी ‘Oh, Flash of Lightening’ ही कविता शाळेच्या नियतकालिकाकरीता लिहिली. आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुखांनी त्यांची ती कविता मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना रसग्रहणाकरिता दिली होती. १९२१ ते २५ ही कॉलेजमधील ४ वर्षं म्हणजे महर्षिंच्या बुद्धीमत्तेचे अपूर्व विलास व प्रतिभेचे नवनवोन्मेष प्रकटण्याचा काळ होता. वयाच्या अठराव्या वर्षापासूनच त्यांना अनंततेची विलक्षण ओढ लाभली होती.
अनंततेचा शोध घेत गायलेली अनंततेची स्फुरणे त्यांच्या अनुभूतीची विशालता, सूक्ष्मता, उत्कटता आणि दिव्यता प्रकट करतात. सतत चाललेले विचारमंथन, श्रेष्ठ वाङ्मय कृतींचे अखंड परिशीलन आणि सत्यशोधनाची त्यांची आंतरिक तळमळ यांची भर पडून त्यांच्या अंत:करणातील उर्मी ओसंडून प्रवाहित होत असे.
अशा वेळी जो कागद दिसेल त्यावर ते त्या त्या वेळेला लिहित असत. `अभंग' हा काव्यप्रकार त्यांना विशेष प्रिय होता.
‘विविध ज्ञान विस्तार’ ह्या मासिकाच्या अंकात त्यापैकी काही अभंग प्रसिद्ध होत असत. त्यातील प्रसाद माधुर्य, देवी अनंतता, देवी शुद्रता अशा अनेक अभिनव कल्पना यामुळे त्याकाळचे मोठे मोठे साहित्यिक या अभंगांवर लुब्ध होत असत.
एलफिस्टन कॉलेजच्या नियतकालिकाच्या अंकात मुखपृष्ठावर किंवा आतल्या पहिल्या पानावर विनोदांची एकतरी कविता असायचीच.
सरोजिनी नायडूंच्या भगिनी श्रीमती मृणालिनी चट्टोपाध्याय यांच्या ‘श्यामा’ या दर्जेदार आंतरराष्ट्रीय इंग्रजी नियतकालिकात त्यावेळी विनोदांच्या अनेक चिंतनपर कविता व अभंगांचे इंग्रजी रूपांतर प्रसिद्ध होत असे. (Please visit http://maharshivinod.blogspot.com to read more than 60 beautiful English poems.)
प्रोफेसर प्र. रा. दामले यांनी १९६८ साली अभंगांचे संपादन करून `अभंगसंहिता' या नावाने ते प्रसिद्ध केले.
अभंग वाचल्याबरोबर प्रसिद्ध साहित्यिक श्री. पु.ल. देशपांडे यांचा अभिप्राय - “या काव्यसंग्रहाने मला विलक्षण आनंदाचा अनुभव दिला. न्यायरत्नांची अनंतता म्हणजेच ईश्वर ही कल्पना तर वेदान्त सोपा करून सांगणार्या संतपरंपरेतीलच आहे. ‘अवधी भूते साम्या आली’ अशी स्थिती झाल्याखेरीज उच्च दर्जाच्या कलेची उत्पत्तीच होत नाही. गुरूदेव टागोर आणि मराठी संतवाणी यांच्या प्रतिभेच्या संगमतीर्थावर निर्माण झालेला हा झरा आहे.”
आचार्य अत्र्यांनी तर या पुस्तकावर स्तुतीरूप अग्रलेखच लिहिला. त्यात ते म्हणतात, “अव्वल दर्जाची प्रतिभा, उच्च शब्दप्रभुत्व, सखोल सहृदयता आणि श्रेष्ठ प्रतीचे तत्त्वचिंतन या सर्व गुणांचा मधुर मिलाफ न्यायरत्न विनोद यांच्या ठिकाणी झालेला असल्यामुळे त्यांची अभंगरचना सत्य, सौंदर्य, सहानुभूती व सूक्ष्म संवेदना यांनी ओळीओळीत रसरसलेली आहे.”
महर्षींचे हजारो अभंग अप्रकाशित होते, ते या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत.
१९३७ व १९३८ मध्ये न्यायरत्नांच्या जीवनात एक अद्भूत पर्व सुरू झाले. सरदार बॅरिस्टर मेहेंदळे यांच्याकडे न्यायरत्न विनोदांचेही त्यांच्याकडे अधूनमधून जाणे येणे असताना काव्यमय व गूढ पंक्ती त्यांच्या तोंडून बाहेर पडत. त्यावेळी बॅरिस्टर मेहेंदळे अत्यंत आस्थेने व दक्षतेने त्यांचे शब्द टिपून घेत. अशाप्रकारे हजारो ओव्यांचा संग्रह बॅरिस्टर मेहेंदळयांनी जतन करून तो पुढे न्यायरत्नांच्या स्वाधीन केला.
त्यापैकी, श्री गुरूपादुकोदय हे छोटे स्तोत्र आणि त्यावरील न्यायरत्नांचे भाष्य प्रसिद्ध झाले आहे.
उरलेले सर्व गूढ काव्य अजूनही अप्रकाशित आहे. या वेबसाईटवर ते उन्मनी साहित्य प्रकाशित करीत आहोत.