१९२५ सालानंतर विनोदांनी श्री. आर. के. प्रभू व Mr. Braitrey यांच्या संपादकात्वाखाली चालणाऱ्या बॉम्बे क्रॉनिकल व मि. हारन्यूमन यांच्या National Herald मध्ये नियमित वृत्तपत्रीय लेखन केले.
अंमळनेर येथे संशोधन करत असताना त्यांनी अनेक तात्विक प्रबंध लिहिले जे अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेमध्ये वाचण्यात आले.
आर्यन पाथ या `न्यू थिऑसॉफी' या पंथाच्या नियतकालिकाचे संपादकीय काम न्यायरत्नांनी केले.
तत्त्वज्ञान, मंत्रशास्त्र, आयुर्वेद, संतवाङ्मय, सामाजिक, चरित्रपर अशा अनेक विषयांच्या पुस्तकांच्या लेखकांच्या विनंतीवरून विनोदांनी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. त्या त्या ग्रंथाच्या विषयाला, आशयाला धरून, परंतु फार मूलभूत व व्यापक दृष्टीकोनातून ते लिहित व विषयाचे अपरिचित पैलू लेखक व वाचकांच्या दृष्टीपुढे आणीत. भारतीय व प्रसंगी पाश्चात्य विचारवंतांनी त्या त्या विषयाचा परामर्श कसा घेतला आहे हे वेचक आणि मर्मग्राही शब्दांत ते मांडीत. त्यामुळे न्यायरत्नांची प्रस्तावना त्या विषयाबद्दल काही नवीन ज्ञान देणारी आहे, आपल्या ग्रंथाचे मूल्य वाढविणारी आहे अशी लेखकांची भावना असे.
सुमारे १०० लहानमोठ्या पुस्तकांना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्या एकत्र करून या वेबसाईटवर प्रसिद्ध करीत आहोत.
१९४९ सालापासून चालू झालेल्या रोहिणी नावाच्या मासिकात `साधनासूत्रे' या सूत्रमय लिखाणांत न्यायरत्नांनी आध्यात्मिक जीवनाचे अनेक पैलू मांडले आहेत.
`माऊली' या संतवाङ्मयास वाहिलेल्या मासिकातही विनोद नियमित लिहित असत.
मुंबईच्या ज्ञानदूत या वार्षिकाच्या प्रत्येक अंकात विनोदांचा पहिला लेख असे.
पाश्चात्य विचारवंतांच्या, सिद्धांतांचा परामर्श व भारतीय तत्त्वज्ञान व जीवनपद्धती यांच्या तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने 'ज्ञानेश्वर व आधुनिक पाश्चात्य तत्त्वविचार' हा त्यांचा लेख फार वरच्या दर्जाच्या आहे. नगरच्या डॉ. धनेश्वर, सरदार मिरीकर इ. अभ्यासकांनी प्रसिद्ध केलेल्या `ज्ञानेश्वर दर्शन' या दोन खंडात प्रकाशित झालेल्या ग्रंथामध्ये तो समाविष्ट केलेला आहे.
`धवलगिरी' या त्यांच्या प्रसिद्ध अध्यात्मिक ग्रंथ १९६०च्या सुमारास लिहिला गेला.
अमेरिकेतील त्यांच्या वैचारिक सहप्रवासी जॉयसी बालकोव्हिच यांनी लिहिलेल्या Towards The Centre या ग्रंथाच्या रूपरेषेमध्ये धवलगिरीचे मूळ आहे. या दोन्हीचे बीज एकच असले तरी `धवलगिरी' हा स्वतंत्र ग्रंथ म्हणून फारच प्रेरणादायी व मनोवेधक आहे. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन सिक्कीम येथे श्री. आप्पासाहेब पंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीमती बालकोव्हिच यांच्या उपस्थितीत झाले.
१९२५ नंतर खोल आणि व्यापक अशा प्रकारचं तत्त्वचिंतनपर लेखन न्यायरत्नांनी पुढे १९३० सालापर्यंत केलं. हे लेखन तात्विक संवादाचं होतं ज्याला त्यांनी 'आधुनिक आरण्यके' असं नाव दिलं. मानवी मनाचा आणि निर्सगाचा संबंध, प्रेम की द्वेष, विभूती पूजेची प्रवृत्ती, जड आणि चेतन, स्थल-काल यांचे स्वरूप, कलेचे स्वरूप अशा अनेक विषयांवरची मूलगामी चर्चा त्यात होती.
हे लेख प्रथम `विविध ज्ञानविस्तार' मध्ये प्रसिद्ध झाले. कै. तात्यासाहेब केळकर, श्री. कृ. कोल्हटकर, वा. म. जोशी यासारख्या विचारवंतांनी या लिखाणाची प्रशंसा केली होती.
यातले काही निवडक लेख प्रोफेसर प्र. रा. दामले यांनी १९८० साली `आधुनिक आरण्यके व एका मूर्तिभंजकाचे तत्त्वविचार' या नावाने प्रसिद्ध केले.