अमेरिकेतील MAINE या राज्यात रॉकलँड जवळच्या ग्लेन कोव्ह येथे Round Table Foundation या नावाची एक अतींंद्रिय संशोधनाची भव्य संस्था आहे. डॉ. पुहारीच हे युगोस्लाव्ह शास्त्रज्ञ संस्थेचे डायरेक्टर होते. या संस्थेने महर्षि विनोदांना सात महिने रिसर्च कन्सल्टंट म्हणून नेमले होते. त्या काळात त्यांनी तेथील प्रयोगशाळेमध्ये अनेक केले. या संस्थेशी संबंधित अनेक व्यक्तींच्या ठिकाणी काही अतिंद्रिय शक्ती प्रगल्भ अवस्थेत प्रकट असल्याचे त्यांनी पाहिले.
डॉ. रसेल व त्यांची पत्नी लाओ यांचं फाऊंडेशनही त्यांनी पाहिले.
न्यूयॉर्कपासून ४० मैलांवर Spring Valley मध्ये अनेक प्रयोग करणाऱ्या डॉ. फायफर नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाशी ते अनेक वर्षे संबंधित होते.
आयलिन गॅरेट या महिलेने परलोकविद्येविषयी अनेक प्रयोग केले होते. १९५३ मध्ये त्यांनी स्विर्त्झलंडमध्ये अतिमानसशास्त्रज्ञांची एक भव्य जागतिक परिषद भरविली होती. त्यांची व विनोदांची चांगलीच ओळख झाली होती.
अल्बर्ट आईनस्टाईन व डॉ. मिलीकन या गणितज्ज्ञ व पदार्थविज्ञान शास्त्रज्ञांबरोबर डॉ. विनोदांची प्रदीर्घ चर्चा झाली. हे दोघेही शास्त्रज्ञ अतिंद्रिय ज्ञानाच्या शक्यतेबद्दल व प्रायोगिक उपक्रमांच्या आवश्यकतेबद्दल मोठ्या तळमळीने व आस्थेने न्यायरत्नांशी बोलले आणि भारतात या शास्त्राची प्रगती झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आल्टस् हक्सले, जेरार्ड र्ड हे करत असलेले अतींद्रय ज्ञानाचे प्रयोगही त्यांनी पाहिले.
वॉशिंग्टन, कोलंबिया, क्रॅलिफोर्निया येथील विश्वविद्यालयात मानसशास्त्रांच्या प्रयोगांबरोबर अतिमानसशास्त्रीय संशोधन पद्धतीचा अभ्यास सुरू असलेला त्यांनी पाहिला.
पॅरिस, म्युनिक, लंडन येतील विश्वविद्यालये, स्वित्झर्लंड येथील झुरीच येथील डॉ. युंग यांची प्रयोगशाळश, हवाई विश्वविद्यालय, टोकियो येथील चार विश्वविद्यालये या संस्थांमध्ये अतींद्रिय शास्त्रामध्ये चाललेले प्रयोग त्यांनी पाहिले.
एवढा प्रचंड संचार व संशोधन केल्यानंतर न्यायरत्नांनी अतींद्रिय ज्ञान या विषयावर एकूण नऊ सिद्धांत मांडले. त्याचा एकत्रित परामर्श घेतल्यावर असं म्हणता येईल की....
प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ईश्वरतत्त्व असल्यामुळे त्याच्या अतींद्रिय शक्तींना कुठेही मर्यादा नाही.
या शक्तींचा विकास योगशास्त्राच्या अभ्यासाने शक्य होतो.
त्यामध्ये अंतर्भूत यम-नियम याप्रमाणे आचरण व इतर साधने याचा अभ्यास गुरूंच्या मार्नदर्शनाप्रमाणे करावा.
त्याचबरोबर वैदिक मंत्रशास्त्र आणि आधुनिक अतिमानसशास्त्र यांची जोड देऊन प्रयोग कोणीही करण्यास हरकत नाही.