एलफिस्टन कॉलेजमध्ये असतानाच रविंद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू, बॅरिस्टर जीना, युसुफ मेहेरअल्ली यांच्याशी न्यायरत्नांचा दृढ परिचय झाला होता.
मद्रासचे प्रसिद्ध अॅडव्होकेट श्री. दोरायस्वामी यांच्याबरोबर पाँडिचेरीला जाऊन श्री. अरविंदांची भेट घेऊन आले. अरविंदांनी Life Divine चे दोन ग्रंथ प्रेमाने विनोदांना भेट दिले.
याच काळात भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांशी न्यायरत्नांचा जवळून परंतु गुप्तपणे संबंध आला.
त्या काळामध्ये उत्कट देशप्रीतीने ते भारून गेले होते. देशासाठी वाट्टेल ते करण्याची प्रतिज्ञा त्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहून दिली होती. लोखंडाच्या तापलेल्या सळईने मांडीचे कातडे जाळताना हूं की चू न करणं ह्या क्रांतिकारकांसाठी ठेवलेल्या कसोटीमध्ये न्यायरत्न यशस्वी झाले होते. परंतु एकुलता एक मुलगा असल्याने प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांचा सहभाग घेतला गेला नव्हता.
कुलाबा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते बाबासाहेब ठोसर हे न्यायरत्नांचे शाळेतील सहाध्यायी. `कसेल त्याची जमीन' या कुलाबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये न्यायरत्नांच्या बरोबर ठोसरांनी भाग घेतला होता.