मॆत्रेयी विनोदांचे माहेरचे नाव वेणू अभ्यंकर. त्यांचे घर अप्पा बळवंत चॊकात होते.
त्यांची आई रमा कनवाळू-मायाळू-कष्टाळू होती. त्यांचे माहॆरचे नाव द्वारका. द्वारकेच्या आईचे नाव येसूताई. द्वारका दीड महिन्य़ाची असताना तिचे वडिल प्लेगच्या साथीत गेले. येसूताईचे दूरचे बंधू महर्षी अण्णासाहेब पटवर्धन. पुण्यात सन्मानानं जगण्यासाठी येसूताईंना अण्णासाहेबांची मोठी मदत झाली. येसूताई व नंतर रमाबाई यांना महर्षींचे घर हक्काचे माहेर होते.
त्यांच्य़ा रमाबाईंचे लग्न महादेवराव अभ्यंकरांशी वयाच्या १० व्या वर्षी झाले. त्य़ा काळच्य़ा मानानं ४ वर्षे उशीराच.
त्या काळातील मध्यम वर्गीय गृहिणीप्रमाणे त्यांनीही घरात खूप कष्ट केले. रमाबाईंना महादेवरावांची खूप ताबेदारी होती. जेवणा-खाण्याच्या वेळेबद्दल ते खूप काटॆकोर होते. तरीही घरात भांडण-तंटणाचे प्रसंग फारसे झाले नाहीत.
त्यांना घरात काम करणाय्रा मंडळींविषयी सहानुभूती वाटायची. त्यांचे कष्ट कमी कसे होतील असे त्या पहात असत. शिवाय जमेल तशी मदतही त्या करीत असत.
वेणू आपल्या आईला वहिनी म्हणत असे. त्या भावंडात सर्वात लहान होत्या. त्या अतिशय हुषार व सरळ स्वभावाच्या असल्यानं आईच्या विशेष मर्जीतल्या होत्या. वेणू शाळेत कायम पहिली येत असे. "मी तुझ्या लग्नाची घाई करणर नाही" असे त्यांची आई त्यांना म्हणत असे. वेणूबाईंच्या इतर भावंडांची लग्न दहाव्या वर्षी झाली होती.
रमाबाई अतिशय स्वाभिमानी होत्या. मृत्युनंतर करण्यात येणाय्रा विधींसाठी लागणारी रक्कम, त्यांनी आजन्म काटकसर करून स्वतःच्या मृत्युपूर्वीच बाजूला काढून ठेवली होती. वेणू १० वर्षांची असताना त्या स्वर्गवासी झाल्या. त्यांचा विरह लहान वेणूला खूपच जाणवला.
त्यांनी लहानपणी केलेले संस्कार, मॆत्रेयी विनोदांना आजन्म उपयोगी पडले...
- प्रगाढ ईश्वरनिष्ठा
- सचोटीचं वागणं-बोलणं
- नित्यनियमानं कुळ्धर्म-कुळाचाराचं पालन
- अडल्या-पडल्याला मदत
- निरलसता
- जे जेवढं असेल त्यात समाधान
- व्यावहारिक सूज्ञपणा