त्या काळामध्ये उत्कट देशप्रीतीने ते भारून गेले होते. देशासाठी वाट्टेल ते करण्याची प्रतिज्ञा त्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहून दिली होती. लोखंडाच्या तापलेल्या सळईने मांडीचे कातडे जाळताना हूं की चू न करणं ह्या क्रांतिकारकांसाठी ठेवलेल्या कसोटीमध्ये न्यायरत्न यशस्वी झाले होते. परंतु एकुलता एक मुलगा असल्याने प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांचा सहभाग घेतला गेला नव्हता.
कुलाबा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते बाबासाहेब ठोसर हे न्यायरत्नांचे शाळेतील सहाध्यायी. `कसेल त्याची जमीन' या कुलाबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये न्यायरत्नांच्या बरोबर ठोसरांनी भाग घेतला होता.
१९३१ ते १९३८ या काळात मुंबईतील बहुतेक सर्व सार्वजनिक संस्थांशी त्यांचा संबंध आला होता. गीताजयंती, लो.टिळक पुण्यतिथी, याज्ञवल्क्य जयंती, शांकरजयंती, व्यासपूजा, गणपती उत्सव इ. सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणण्यात न्यायरत्नांचा पुढाकार होता.
गोवर्धन संस्था, संस्कृत पाठशाळा, ब्राह्मण सभा, गीता पाठशाळा, गीताधर्ममंडळ अशा संस्थांशी त्यांचा संबंध होता.
१९३७ नंतर गोवधबंदीच्या चळवळीत ते सक्रीय सहभागी झाले होते. श्री. चौंडेमहाराज आणि न्यायरत्न यांनी लॉर्ड लिनलिथगो, महात्मा गांधी, पंडित मालवीयजी, बापूजी अणे इ. च्या गाठीभेटी घेतल्या आणि लाहोरला नव्याने होणाऱ्या कत्तलखान्याचे काम बंद पाडले.
याच काळात धर्म, तत्त्वज्ञान यांची चर्चा करण्यासाठी विनोदांचे अनेकवेळा गांधीजींच्याकडे जाणे झाले हेाते.
अस्पृश्यता, सामाजिक विषमता, अन्याय व स्त्रियांचे प्रश्न याबद्दल विधायक दृष्टीने सुधारणा कशी करता येईल या संदर्भात गांधीजी न्यायरत्नांचा सल्ला घेत व विचारविनिमय करीत.