गृहजीवन:
घरच्या लोकांना त्यांनी कितीतरी मोलाचे धडे जाताजाता दिले. नेहमी बोलताना मंद सप्तकात (हळू आवाजात) बोलणे, दरवाजा उघडताना, लावताना, चालताना, भांडी हाताळताना आवाज न करणे, अशा कितीतरी बारीक-सारीक गोष्टींचं महत्त्व त्यांनी बिंबवलं होतं. त्यांचं स्वत:चं त्याप्रमाणे असणारं आचरण हाच इतरांसाठी प्रत्यक्ष वस्तुपाठ असे. धाक आणि प्रेम या दोन्हींचं गमतीदार मिश्रण त्यांच्या स्वभावात होतं. घरच्यांना त्यांच्या ठिकाणी असलेल्या ऋजुतेचा, अनुरागाचा आणि वात्सल्याचा प्रत्यय येत असे. कुटुंबियांच्या आठवणीप्रमाणे ते कधी कुणावर रागावले नाहीत. जर एखाद्या वेळेला राग आलाच तर त्याचे लगेच अनुकंपेमध्ये रूपांतर व्हायचे. `ते जे करत आहेत ते त्यांना समजत नाही` असा विचार करून पूर्वीप्रमाणे गंभीर होत असत. मनाची शांतता आणि समता या दोन गुणांमुळे इतरांच्या हृदयात त्यांच्यासाठी विशेष स्थान असे.
त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींना त्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रेममय अंत:करणाची, व्यक्तिमत्त्वाच्या भव्यतेची आणि उत्तुंगतेची जाणीव होत असे.
महर्षींच्या कुटुंबियांविषयी माहिती
न्यायरत्नांचे वडील गोविंद विनोद हे साधुपुरूष होते. त्यांच्या स्नेहमय दृष्टीत आपपर भाव नव्हता. त्यांची आमराई गावच्या मुलांची हक्काची असे. त्यांच्या दारातून याचक कधीही विन्मुख जात नसे. गरीबांच्या दु:खाने ते व्याकूळ होत.
न्यायरत्नांच्या मातु:श्री लक्ष्मी यांचे वडील नागावचे केळकर दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यांना वेद मुखोद्गत होते. त्या श्रृतिश्रवणाने लक्ष्मीबाइंर्चे कित्येक वेदमंत्र पाठ झाले होते. १९०२ साली उतारवयात त्यांना सिद्धकृपेनं मुलगा झाला- ते न्यायरत्न. आपल्या एकुलत्या एका मुलाची बुद्धिमत्ता पाहून मनाचा निग्रह करुन त्यांनी लहानपणापासून शिक्षणासाठी स्वत:पासून दूर ठेवलं. ज्यावेळी न्यायरत्नांचा सत्कार डॉ. कुर्तकोटींच्या हस्ते झाला तेव्हा त्यांना अतिशय समाधान झाले.
त्यांच्या वडील बहिणीचे नाव यमुनाबाई आठवले. दोघा बहीणभावांमध्ये अतिशय माया होती. वृद्धापकाळामध्ये त्या न्यायरत्नांकडेच वास्तव्याला होत्या. थोरली बहीण म्हणून न्यायरत्न त्यांच्या पायाला वंदन करून आशीर्वाद घेत असत, तर दिगंत कीर्तीच्या प्रेममय अंत:करण असलेला विद्वान म्हणून यमुनाबाई न्यायरत्नांना वंदन करत असत.
त्या काळच्या रीतीप्रमाणे त्यांचा विवाह विद्यार्थीदशेत झाला होता. त्यांची प्रथम पत्नी ही बहिरोळे गावातील आठवल्यांची मुलगी. काही वर्षांतच अल्पशा आजारानंतर त्यांचे देहावसान झाले. पुढे कालांतरानं आई-वडिलांच्या आग्रहाखातर न्यायरत्नांचा दुसरा विवाह मुंबईच्या द्रौपदी फाटक यांच्याशी झाला. परंतु, १९३५ मध्ये त्यांचेही देहावसान झाले. त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव प्रभाकर. विषमज्वरात मेंदूवर परिणाम झाल्यामुळे तो मतिमंद झाला. सध्या त्यांचे वय वर्षे ७२ आहे.
१९३३ साली न्यायरत्नांना मधुमेहाची व्याधी जडली. त्या धक्क्याने त्यांच्या मातुश्रींचा मृत्यू झाला. लागोपाठ १९३६ साली न्यायरत्नांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. मात्र मृत्यूपूर्वी तिस-या विवाहाची अट त्यांनी न्यायरत्नांना घातली होती.
१९३७ मध्ये डॉ. कुर्तकोटींच्या आशीर्वादाने त्यांचा तिसरा विवाह वेणू अभ्यंकर यांच्याशी नोंदणी पद्धतीने झाला. वेणू अभ्यंकरांचे वडील कट्टर टिळकभक्त होते. लोकमान्य त्यांना म.गो. म्हणून संबोधित. वेणू अभ्यंकर १९२६ साली मॅट्रिकच्या परीक्षेत अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्या आल्या होत्या. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपही त्यांना मिळाली होती. पुढे त्या एम्.ए. झाल्या आणि B.T. झाल्या.
दोघांचं वैवाहिक जीवन हे अतिशय आनंददायी, परस्पर विश्वासाचं आणि भरभराटीचं गेलं. वेणू अभ्यंकरांचं नाव न्यायरत्नांनी `मैत्रेयी' असं ठेवलं होतं. मैत्रेयी विनोदांची आई त्यांच्या बालपणीच स्वर्गवासी झाली होती. तिच्या मृत्यूनंतर एक पोकळी मैत्रेयी विनोदांना वाटत राहिली होती. ती पोकळी न्यायरत्नांनी आपल्या वात्सल्याने आणि सहसंवेदनेने भरून काढली.
माता, पिता, गुरूजन आणि न्यायरत्न यांनी केलेल्या संस्कारांमुळे आपलं जीवन इतरांनी हेवा करावा इतकं परिपूर्ण आणि अर्थपूर्ण झालं.. असं `अहो सौभाग्यम्' या पुस्तकात मैत्रयी विनोदांनी अतिशय साध्या आणि प्रवाही भाषेत लिहिलं आहे. म. विनोदांच्या निधनानंतर काही काळ त्यांनी महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ या संस्थेची जबाबदारी घेतली. शेवटचा काळ मात्र त्या अमेरिकेत मुलांकडे राहिल्या होत्या. १९८१ साली पुण्याला आल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे निधन झाले. निधनापूर्वीच्या काळामध्ये त्या अतिशय शांत, अविचल आणि समाधानी स्थितीमध्ये होत्या.
या दोघांना पाच मुले झाली.
पहिले डॉ. ऋषिकेश हे इकॉनॉमॅट्रिक्स् या विषयात हॉवर्ड विद्यापीठाचे पी.एच्.डी असून सध्या Fordham University मध्ये Professor आहेत. त्यांची पत्नी अरूंधती स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ असून New Jersy येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. त्यांची मुलगी ऋता हिचा विवाह होऊन तिला २ मुले आहेत. ती वैद्यकीय व्यवसाय करीत आहे.
त्यानंतर अॅड. अदिती वैद्य ही न्यायरत्नांची कन्या. पुण्यामध्ये त्यांचा व त्यांचे यजमान अॅड. मधुकर वैद्य यांचा वकिलाचा व्यवसाय आहे. अदिती वैद्य या अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय योगदान देत असतात. महर्षि विनोद यांच्या पश्चात त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी १९७१ साली स्थापन झालेल्या महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ या संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत. त्यांचा मोठा मुलगा पद्मनाभ याचा स्वतंत्र व्यवसाय आहे, तर चिन्मय या धाकट्या मुलाचा वकिलीचा व्यवसाय आहे. दोघेही विवाहित आहेत.
तिसरे उदयन विनोद हे New Jersy येथे AT & T या कंपनीमध्ये व्यवस्थापनाचे काम पाहत असत. सध्या ते महाराष्ट्र फाऊंडेशनचे कमिटी मेंबर आहेत. त्यांची पत्नी शीला या Pathologist आहेत. त्यांचा मुलगा शचींद्र हा वकिलीचा व्यवसाय करीत आहे तर मुलगी केतकी वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
न्यायरत्नांची दुसरी कन्या संहिता शाह यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यांचे यजमान श्री. जगदीश शाह हे दोघे वास्तुविशारदतज्ज्ञ आहेत. त्यांचा मोठा मुलगा चैतन्य व्यवसाय करतो आहे. त्यांना जुळया मुली आहेत शुभा व विभा. शुभा आय.टी.क्षेत्रात काम करीत आहे. ती विवाहित आहे, तर विभाने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
न्यायरत्नांचे कनिष्ठ चिरंजीव डॉ. संप्रसाद विनोद हे वैद्यकीय पदवीधर असून ते न्यायरत्नांचा अध्यात्मशास्त्राचा वारसा पुढे चालवित आहेत. ते व त्यांच्या पत्नी डॉ. ऋजुता विनोद (बधिरीकरणशास्त्रतज्ज्ञ) या दोघांनी मिळून महर्षिंच्या स्मृतीप्रीत्यर्थ महर्षि विनोद रिसर्च फौंडेशन ही संस्था १९८३ साली स्थापन केली. पातंजलयोग शास्त्रावर आधारित संशोधन, प्रशिक्षण व उपचार असे या संस्थेचे काम चालते. परमपूज्य परिव्राजकाचार्य श्रीमत अनिरूद्धाचार्य महाराजजी, चक्रोदय मठ, बडोदा यांना महर्षिंकडून श्री बीजाक्षर मंत्रविद्या प्राप्त झाली आहे. हे महर्षिंचे एकमेव शिष्य आहेत ज्यांना ही अशी आगळी उपलब्धी झाली. १९८४ साली डॉ. संप्रसाद विनोद यांना श्रीक्षेत्र सिद्धाश्रम येथे महाराजजींकडून विधीपूर्वक श्री बीजाक्षर विद्या प्राप्त झाली. तेव्हापासून व्यासपूजा महोत्सवाच्या मध्यरात्री, महर्षि जो सामुदायिक संकल्प समाधी व निर्विकल्प समाधीचा तांत्रिक प्रयोग करीत असत, तो प्रयोग डॉ. संप्रसाद विनोद करीत आहेत. डॉ. संप्रसाद व डॉ. ऋजुता विनोदांना दोन मुलं आहेत.. समन्वय व सनातन. समन्वय तबला शिकतो आहे व सनातन कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत आहे.
महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ व महर्षि विनोद रिसर्च फौंडेशन या दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते व हितचिंतक देशात व परदेशात पसरले आहेत.
फारसं नाव न ऐकलेल्या व न पाहिलेल्या या विलक्षण महात्म्याचे लेखन मनापासून वाचणाऱ्या आणि त्यापासून स्फूर्ती घेणाऱ्या तरूण पिढीतल्या साधकांची संख्या शेकड्यांमध्ये आहे. ही छोटी परिचय पुस्तिका येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा व स्फूर्ती देणारी ठरो ही प्रार्थना.