अभंग

मायभूमि माझी दास्यांत रुतलेली, दशा दीन झाली बान्धवाची

मनांत लाविली तेजे तारकांची ।

निशा कायमची प्राप्त झाली ॥

चन्द्रिकेची शोभा धरावया गेला ।

घेउनीयां आलों मेघमाला ॥

विद्युल्लतेमागें स्वैर धावतांना ।

वादळें ती नाना पुढे येतीं ॥

त्याच वादळात, मेघांत निशेंत ।

गेलें हें जीवित सरूनीया ॥९१॥

 

उरावी कां स्मृति सरतांच अनुभव ।

भुले कां हा जीव भूतकालीं ॥

प्रेम-मीलनांत श्वास हा थांबावा

नेत्र अन्ध व्हावा स्वप्न सरतां ॥

पाण्यांत बुडाले अग्नीत जळालें ।

वाऱ्यांत पळाले आत्मतत्त्व ॥

ताऱ्यांत लकाके डोंगरांत ठाके ।

लतेसंगें वाके आत्मतत्त्व ॥

हास्यांत ते फुलें पिकांत तें डुले ।

प्रेमांत तें खुले आत्मतत्त्व ॥९२॥

 

वर्तमान केव्हा कसा हा संपेल ।

उत्क्रान्ति होईल कधी पूर्ण ॥

भावि कालामध्ये आतांच जाऊन ।

पूर्णत: पाहून सत्य घ्यावे ॥

धीर आतां नुरे संभ्रमीं वागाया ।

स्वप्नांत खेळाया अज्ञतेने ॥९३॥

 

पाहिलेस तेज परि तो तारक ।

तुला न ठाऊक व्हावयाचा ॥

मनीं ठेविलीस सौरभाची भूल ।

फुले कोठें फूल परी सांग ॥

ऐकलेस माझें जरी प्रेमगीत ।

हृदय हें अज्ञात असे तुला ॥९४॥

 

आकाशगंगा ही आली भूमीवरी ।

तुझ्याच आचारीं आटलो जी ॥

तिची ती धवलता तुझे हें जीवित ।

स्मरो माझें चित्त सर्वदाच ॥

तुझ्या पायापाशी ही एक प्रार्थना ।

देवाच्या दर्शना जाऊ दोघे ॥

भगिनी तूं माय,वा कीं पूज्य देवता ।

माझिया जीविता करी सार्थ ॥

एका सायंकाळी देवळासी जाऊं ।

आत्मगीत गाऊं अन्तरीचें ॥९४॥

 

मायभूमि माझी दास्यांत रुतलेली ।

दशा दीन झाली बान्धवाची ॥

मायबहिणी माझ्या अज्ञानगर्तेंत ।

कां न शून्यभक्त असावें मी? ॥९५॥

 

निघे जेथें जेथें मन्द करूण श्वास ।

तिथे माझा वास असो देवा ॥

उसासे दु:खाचे जिथे वातावरणी ।

तिथे गी-वाणी स्फुरो माझी ॥९६॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search