अनिवार्य इच्छा जी जी येते मनीं ।
तियेला वर्तनी बिंबवावी ॥
अज्ञेय सत्याचा अदृष्ट जो किरण ।
तोच इच्छाजनन करी आंत ॥
इच्छा आणि ज्ञान वन्द्य तीं दोन्हींही ।
सिद्ध त्यांत होई व्यष्टितत्त्व ॥८१॥
(निकट?) लगत जें भासलें तेंच झाले दूर ।
अवर्षणी पूर पावसाचा ॥
काळिमाच झाली दीप्ती एकाएकीं ।
अदृश्ये विलोकीं नेत्र आज ॥
विश्व झाले इवले जणूं गळला आंसू ।
असें येतां हंसूं मला आज ॥८२॥
शब्द हे सत्याला सौन्दर्य प्रेमाला ।
व्यक्तित्व देवाला नसेना का ॥
हेतुसिद्धीसाठी जयांचें अस्तित्व ।
तयांनी न तत्त्व बद्ध होई ॥
सान्ततेच्या साठीं व्यक्तित्व बन्धन ।
वरितां तें, सत्य न अनन्ततेचें ॥८३॥
सारीं ही अस्तित्वें असतात बापुडीं ।
कुणासाठीं खडी कोण जाणे ॥
एकमेकांचा त्यां लागतो आधार ।
असा हा विस्तार किती भव्य ॥
व्हावयाचे काय आपुले शेवटी ।
ही न शंका पोटी कुणाच्याही ॥८४॥
विकाराचा वास चित्तांत असतांना ।
सत्याच्या दर्शना कसा घेऊ? ॥
खळबळाट चाले जलाच्या या पृष्ठीं ।
पाहू कैशी दृष्टि चन्द्रबिंब ॥८५॥
तूंच केलास ना असा माझा घात ।
तुला दैवे हात कसा द्यावा ॥
नभास भूमीस नगास, सरितेस ।
विलोकीत बैस सर्व काव ॥
परी मजला जेव्हां पाहशील प्रेमानें ।
तेव्हांच ती नयनें तोषतील ॥८६॥
हिरवळींत तसल्या अंग ते टाकुनी ।
नेत्र ही लावुनी नभाकडे ॥
कुणासाठी काय मागसी तें सांग ।
होई आशाभंग तुझाची ना ॥८७॥
पहिल्याच पासून मला होती ठावी ।
तुझी वृत्ति भावी अशी होणें ॥
बोललीस तेव्हा शपथ ती घेऊन ।
हातांत देऊन तुझा हात ॥
परी नव्हतें तुझें तुझ्या हाती हृदय ।
तुला कसा काय दोष देणें ॥
दया तरी तुजला अभाग्याची आली ।
तयानें ही आली मना शान्ति ॥
जा-सखे, कुठेही तुझे पुण्यस्मरण ।
सुखवील जीवन सदा माझें ॥८८॥
हाच अश्रू तुझ्या नयनांत जाऊनी ।
पुन्हा कीं तेथूनी गळावाच ॥
तरी तुला कळे माझी ही वेदना ।
त्रास देते मना किती कैसा ॥८९॥
मोजणारे थकले मोजुनी मोजुनी ।
कितीदां जन्मुनी पाहिले मी ॥
तोच तोच स्वर सदा आळवोनी ।
तान तीच गाती खेळवीली ॥
कधीं संपावयाचे असे हे गायन ।
कधी जन्ममरण चुकायाचे ॥९०॥