अभंग

विशेषणांचे हें वागवूनी ओझें, गीत दमलें माझें अनन्तते।।

केतकीच्या पोटीं विषारी नागिण ।

कमलिनी कर्तन करी भृंग ॥

किडा उंबरांत प्रेमात वासना ।

सदा असावी ना मर्त्यलोकी? ॥७१॥

 

कुणी केली सांगा जायबन्दी लता ।

जिला येत होता बहर आज ॥

माझ्या मनांतली तुझीच ती भक्ति ।

सांग तुवां कां तूं छेदियेली ॥७२॥

 

स्मृतीच्या आसवांनी चित्त माझें झालें ।

डवरलेले डोके तुझे जैसे ॥

अश्रू नेत्रीं तुझ्या माझ्या मनीं गीतें ।

असे कां चालतें सांग ताई ॥७३॥

 

चक्रनेमिक्र विराट विश्वाचा ।

असा चालायाचा चिरन्तन ॥

जन्ममृत्यूच्या या पावलांनी दोन ।

काळाचे हें वन फिरे आत्मा ॥७४॥

 

राहूं दे ना मान माझ्या अंकावरी ।

कां अशी बावरी भासतेस ॥

पायांनी लाजावे जगाच्या नेत्रांना ।

निर्दोष आत्म्यांना हंसे कोण? ॥७५॥

 

तुझ्या श्वासांतुनी सुगन्ध साण्डिला ।

गुलाब हा झाला तयाचाच ॥

तुझ्या नेत्रांतुनी उडाला हा किरण ।

तारका होऊन नभी बैसे ॥७६॥

 

समुद्रांत नाचे लाटांची ही रांग ।

पीठ हे अथांग जलपृष्ठ ॥

टांगलें हे छत वरी आभाळाचें

वाजतें काळाचे शान्तिवाद्य ॥

अशी या गोपींची रासकिडा चाले ।

हे सर्व तारे पाहण्यास जी ॥७७॥

 

‘स्मृती’च्या सौख्यानें सन्तोष हो अधिक ।

‘प्रत्यक्षता’ धाक दावि कांही ॥

मनोमयी मूर्ति कशी केव्हां वन्दा ।

जीव हा सर्वदा असे स्वस्थ ॥

ऊन प्रत्यक्षाचे जाळिते नेत्राला ।

स्मरण-सावलीला भुले जीव ॥७८॥

 

विशेषणांचे हें वागवूनी ओझें ।

गीत दमलें माझें अनन्तते ॥

घालितां एकेक तुझ्या अंगावरी ।

गळें ते सावरी पुन्हां खाली ॥

पुन्हा ते उचलोनी वरी नेला कर ।

तूंच नि:शरीर भासलीस ॥७९॥

 

धूप जळतां क्षणीं सुवास बागडे ।

तुझ्या भंवती गडे कशासाठीं ॥

ज्ञानाग्नितेज तें तुझ्या त्या अन्तरीं ।

लोभला त्यावरी तो-नि मीही ॥

किंवा अग्नींत त्या अनुभवाचा धूप ।

पेटतो अ-पाप दिव्य दुसरा ॥८०॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search