अभंग

आत्मनिवेदन हीच माझी भक्ति आणि आत्मगीति हीच अर्चा।।

वार्‍याचे कर्ज जें श्वासांनी घेतलें ।

सव्याज तें दिलें उसाश्यांनी ॥

संख्येंत वागलो जीवनाच्या कालीं ।

शून्यता वरियेली मृत्युलोभें ॥५१॥

 

निसर्गाचा नाद जेथे जेथे नाचे।

त्यांत ह्या वाचेचे मिळो सूर ॥

अन्तरात्मा माझा न राहो गीतांत।

विरूनी शून्यांत तया जाणें ॥५२॥

 

मागुनीया अश्रु पावसाळयाजवळीं ।

तयांना मी गाळी सदा ऐसे ॥

उन्हाळयाचा ताप घेऊनीया उसना ।

दिला या जीवना सदा ऐसा ॥५३॥

 

काळोख भोवती एकला हा सूर ।

चित्तांत काहूर उठे ऐसें ॥

नभाच्या पोटांत होतसे तो लुप्त ।

परी अंतरात दुणावतो ॥५४॥

 

खांद्या या वृक्षाच्या मला आलिंगाया ।

सिद्ध का झाल्या या सर्व आज ॥

होउनीया उंच डोंगराचे कडे ।

माझ्या मूर्तीकडे पाहती का? ॥५५॥

 

शेकडो हे दगड तयामध्ये हिरा ।

शोभतो हा खरा एक येथें ॥

तया पाहण्यास नेत्र ऐसे व्हावे ।

जयांना दिसावे हिरे सर्व ॥५६॥

 

तुझी ती अंगुली जाई ओठापाशी ।

सांगते गुजाशी कोठल्याशा ॥

अंगुली ताईने तुला माझे हृदय ।

उघड केले काय मला सांग ॥५७॥

 

किनारे हे दोन स्थलाचे-कालाचे ।

अस्तित्व उदधीचे भासतात ॥

आत्मचक्षू पाही कांठावरूनी त्या ।

जलाच्या हालत्या जशा लाटा ॥

बन्ध अस्तित्वाचे आत्म्यास अज्ञात ।

दृश्य जो देखत साक्षिदृष्ट्या ॥५८॥

 

निशामेघ गळला शुभचंन्द्रिकेंत ।

अन्तरिक्ष-क्षेत्र पिका आलें ॥

अनन्त साम्ये ही तारकांच्या रुपें ।

कोणत्या मी मापे मोजणार ॥५९॥

 

आत्मनिवेदन हीच माझी भक्ति ।

आणि आत्मगीति हीच अर्चा ॥

शब्दा शब्दासवें श्वासाश्वासासवें ।

भक्तिगीत गावें हीच इच्छा ॥

भक्तिने पूर्णात्मा गीतिने अंशात्मा ।

पावतो आरामा चिरन्तन ॥६०॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search