अभंग

एकादें वेड जें वाढवावे चित्तीं। तयानेंच शान्ति मिळे जगतीं।।

मनीं माझ्या होते - तेंच आले घडुनी।

कळी आली फुलुनी - इच्छिलेली ॥

मनींची तारका - नभांगणी नाचे।

सूर अन्तरीचे - आले ऐकूं ॥

देवता चिन्तिली - अवतरे तीचही।

जीव जन्म घेई - इष्ट देहीं ॥२१॥

 

नभांत सांडती - चन्द्रिकेचीं किरणे।

मनांत चांदणे - तसे माझ्या ॥

सहज झाली तुझी - इतक्यात आठवण।

चित्त हे लक्कन - उजाळले ॥

प्रताप तेजाळ - स्मृतीचाही इतका।

प्रत्यक्ष कौतुका - नुरे उपमा ॥२२॥

 

चित्त माझें हेंच तुझे क्रीडाशैल।

येथ तूं फिरशील चिरन्तन ॥

नको टाकूं दृष्टि स्वैर इकडे तिकडे।

पाऊल वांकडे पसरावे ॥२३॥

 

उगाच फिरतांना दमले माझे पाय।

वनी फिरे गाय एकली ती ॥

हंबरडा फोडिते कुणासाठी सांगा।

नाहींतरी लागा पुढे चालूं ॥२४॥

 

जन्मोजन्मीच्या त्या नात्यांचा आठव।

होतांच, हा जीव आनन्दतो ॥

तुझा माझा आहे शेजार जो आज।

आणि हे निर्व्याज तुझे प्रेम ॥

अनन्तेला ठावी तयाचीं कारणे।

तूं नि मी राहणें सदा ऐसे॥२५॥

 

पहिला रुकार तो - ओठिं या ठेवोनी।

सखी गेली वनीं - निघोनीया ॥

स्मृती माझी उरली - नाहिं तिच्या मनीं।

वनवास या जनी - मीच कंठी ॥२६॥

 

आळवावा देह खेळवावे मन।

हेच तत्त्वज्ञान जगा ऐक ॥

रुचीला, नेत्राला, त्वचेला , कर्णाला।

कधींही न झाला पुरा तोष ॥

एकादें वेड जें वाढवावे चित्तीं।

तयानेंच शान्ति मिळे जगतीं ॥

अनन्ततेमला तुझें लागे खूळ।

शरीर देऊळ झालें तुझें ॥२७॥

 

पुजार्‍याला देव सजवितां येईना।

गवयाच्या गायना नसे तान ॥

फिक्कट झालें हें चान्दणे पुनवेचे।

कंटकांनी वाट आच्छादिली ॥२८॥

 

तृषितात्म हा मी का अशी जवळी नदी।

भोवती ही गर्दी एकला मी ॥

सखी ही शेजारी (भेटता) बोलता कां नये।

जीव कां न राहे शरीरीं या ॥२९॥

 

वादळांत असल्या कुठे सांपडून।

आलीस कोठून इथे सांग ॥

केंस हे विखुरले स्कन्ध-देशी, भाली।

आणि कांही गाली खेळतात ॥

थरारे हे अंग भीति मूर्तिमन्त।

जणूं सिद्ध होत शरीरिणी ॥

चिंब ओला पदर ढगांनी - नयनांनीं।

अश्रूंस (नी) गाळूनी असा केला ॥

शून्य दृष्टीनें या धरेस पाहसी।

वाटेंत प्रार्थिसी दुभंगण्या ॥

धरेच्या पोटांत नको ऐशी जाऊं।

अन्तरी या ठेवूं तुला कां मी ॥

जेथ होती माझी तत्त्वगीते स्फूर्त।

तयांना ऐकत रहा सुखें ॥३०॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search