अभंग

इन्द्रियांचा संघ - पंचतत्त्वे सारीं। परत मी माघारी - तुला दिधलीं।।

अधीर औत्सुक्य - चित्तीं धावें पळें।

चिमुरडें कळवळे - निराशेनें ॥

गीताच्या गच्चीतं - पाहि येऊनीया।

अनन्तता सया - आली कीं न ॥११॥

 

चिमण्या माझ्या मना - तुझ्या राज्यांत या।

कशाला यावया - पाहिजे ती ॥

गुणगुणावी सदा - असली सद्गीते।

तिच्या जी न चित्ते - जाणियेली ॥१२॥

 

अखेर भेट ही - तुझी माझी विश्वा।

घेतल्या सर्वस्वा - दिले तुज ना? ॥

इन्द्रियांचा संघ - पंचतत्त्वे सारीं।

परत मी माघारी - तुला दिधलीं ॥

विश्वबाळा, तुझ्या - निटिलाला चुंबुनी।

मी शून्यनिर्वाणी - जाई निघुनी ॥१३॥

 

पिंडीला लागला - अजाणतां पाय।

प्रायश्चित्त काय - घेऊ सांग? ॥

प्राप्त् तूं होशील - वाटले हें मला।

सान्तता विसरला - जीव माझा ॥१४॥

 

माझ्याच देहानें - जरी येते जातां।

तुलाही सर्वथा - जेथे तेथें ॥

कड्यावरी ऐशा - कशाला येऊनी।

तोल संभाळूनी - चालणे हे ॥

तरळत्या दृष्टीला - नको टाकूं दूर।

(२) निर्घृण सृष्टिला - (१) नको पाहूं ॥

भयाण दृश्याने - चुकवुनी पाऊल।

सृष्टि ही फसवील - सये तुजला ॥१५॥

 

फिरकसी कां सांग - वनांत या दाट।

करी, शिरीं थाट - फुलांचा हा ॥

जाऊं चल ना गडे - भीती वाटे चित्ता।

होउनी तूं लता - राहशील ॥१६॥

 

सान्त दृश्ये सारीं गुंफिली दोर्‍यांत।

शोभतीं गजर्‍यांत अनन्तेच्या ॥

चिरंवास तेथे तयांचा असणार।

स्खलित ना होणार एक सुद्धां ॥

लहान-मोठे गेन्द होउनी एकत्र।

नान्दतील तत्र चिरन्तन ॥१७॥

 

होईना कां माझा देह भस्मीभूत।

जरी आत्मज्योत चिरंस्थायी ॥

पाकळयांचे ओझे कशाला हे व्हावे।

सौरभे हिंडावे स्वयंसिद्ध ॥१८॥

 

भेटतांना आज कित्येक दिवसांनी।

नेत्र हे अश्रूंनीं अन्ध झाले ॥

लक्षावधी अर्थ मनांत सांठले।

ओठ हे कोन्दले शब्दयोगें ॥१९॥

 

बोबड्या बोलांनी तुलाच वाहिले।

कां न येणे केले तरी तेव्हां ॥

यौवनी वाहिले प्रेम तुज्या पायी।

वार्धक्यात देई तुला भक्ति ॥

कितीकदां केले जन्मोजन्मीं असें ।

करूणा न येतसे कशी तुजला? ॥२०॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search