जमिनीच्या पोटी उद्भवली आस।
आकाश राजास - चुंबिण्याची ॥
अशक्यता याची आली कळूनिया।
ऊर भरुनिया सवे आला ॥
मानवांचे शोक निमिषजीवी ।
सृष्टीच्या दु:खांना आयु दीर्घ ॥
तसाच राहिला ऊर पृथ्वीचा या।
हिमालय जया दिले नांव ॥
तिच्याच शोकाच्या ह्या ही गंगा यमुना।
अश्रु कां म्हणा ना पृथ्विचे ते ॥२१॥
तुझ्या माझ्या जीवां कां वेड लागावे।
काय मी सांगावे - मला, तूं हीं ॥
तुझ्या सुद्दा चित्तीं असणार ते काय।
(माझेच ना हृदय तुझ्या देही) ॥
आणि तैसे तुझे धडपडे हें येथे ।
जया आत्मगीतें - साथ देती ॥२२॥
विनाशांत रंग चढे विकसना।
पूर्णता ये त्याला तत्क्षणींच ॥
मावळता ज्योत ती होई तेजोत्कर्ष।
दीर्घ दु:खी हर्ष - अत्युत्कट ॥
मरण येतां येतां - जीवनाची प्रभा।
लकाके सर्वथा - अधिक मात्र ॥२३॥
माझ्याच देही तें जरी येतें जातां।
तुलाही सर्वथा -- जेथ तेथे ॥
कड्यावरी ऐशा कशाला येउनी।
तोल सांभाळूनी चालणे हे ॥
नको टाकूं दूर तरळला दृष्टीला।
निर्घृण सृष्टीला - नको पाहूं ॥
भयाण दृश्याने चुकवूनि पाऊल।
सृष्टि ती फसवील - सये तुजला ॥२४॥
राग येता क्षणी दिसे तोंडावरी।
लोभही आचारी स्पष्ट होई ॥
मदाने बोलणे मत्सरे वागणे।
मोहाने पाहणे - बदलतेंच ॥
जे, जे परी प्रेम हा विकार - चोरट्या पाउलीं।
बंधनांत घाली खुळे जीव ॥
प्रेमाचे अस्तित्व निराशेनंतर।
कळूनी अंतर दु:खावें तें ॥२५॥
मनांत लागावे तुला पूजावया।
ओठांत गावया - प्रेम गीत ॥
तोंच वाटे भीति - आठवे क्षुद्रता।
लाजते नीचता - उच्चतेला॥२६॥
जरी पहाता येतें मनाच्या गाभ्यांत।
जीवनाचा अंत क्षणी होता ॥
पापांच्या राशीनें, येउनी वैताग।
किती आत्मत्याग - व्हावयाचे ॥
बरे देवाजीने - नाकावरी डोळे।
ठेवुनी लाविले - जगाकडे ॥२७॥
स्मृतीच्या सौख्याने संतोष हो अधिक।
प्रत्यक्षता, धाक दावि कांही ॥
मनोमनी मूर्ति - कशी केव्हा वंदा।
जीव हा सर्वदा - असे स्वस्थ ॥
ऊन प्रत्यक्षाचे जाळितें तें नेत्राला।
स्मरण सावलीला - भुले जीव ॥२८॥
मनीं मुखी नसतां घडूनीं हे आले।
(हृदय) चित्त की सांडले - कटाक्षांत ॥
कित्येक युगींची कळी फुलूनीया।
सुगंध नाचा या लागला हा ॥
सहज मिळाली - तुझी माझी दृष्टि।
व्यक्त झाली ही सृष्टि अंतरीची ॥२९॥
भेटतांना आजा कित्येक जन्मांनी।
नेत्र हे अश्रूंनी - अंध झाले ॥
लक्षावधि अर्थ मनांत सांठले।
ऒंठ हें कोंदले - शब्द योगें ॥३०॥
इतक्यांत ही लता कुणाला लाजली।
लाज ही राहिली पुष्प रुपें ॥
वाहतांना वारा थबकला जो येथे।
तयाला का लते - लाजलीस ॥३१॥
४-११-५८