अभंग

तुझ्या चिंतनांत घालवूनी आयु। वायु मध्ये वायु विरू द्यावा।

सत्यांचे (गीतांचे) कारंजे उडूं हे लागले।

जगास सिंचिलें - तयानेच। (विश्वास?) ॥

आत्म्यामध्ये माझ्या - तत्वांची ही झरी।

वाहुनीया करी - जगा शुद्ध ॥७०॥ (उद्भवूनी करी - विश्व शुद्ध)

 

वाहत्या सुगंधा धरुं न शके कोणी।

स्वैर तो वाहुनी - पुढें जाई ॥

मनीं आल्या वृत्ति रोधणें तयासना।

शक्य ना कोणास - असे येथें ॥

आजा किंवा उद्या आचार दर्पणी।

तया घ्या पाहुनी नकळताच ॥

नाचत्या विजेला कोण थांबवील।

कोण राबवील - प्रीति ॥७१॥

 

स्वातंत्र्य दुसर्‍याचें घेताच आपुले।

लागतें त्या द्यावे - तत्क्षणीं ही ॥

गुलामाचा धनी - स्वत: ही गुलाम।

गुलामाचा होई - आपुल्याच ॥

वाळूला दाबता - आपुला पायही।

सहज खाली जाई - नकळताच ॥

इतरां शिरी देता जुलमाची पावलें।

स्वशिर जाणा झालें पायमाल ॥७२॥

 

संसाराची गाडी तोंडाच्या वाफेनें।

चालवावी स्त्रीने नियम हाच ॥

स्त्रियांची बडबड जितकी निरर्थक।

तितकीच ती अधिक मजेदार ॥७३॥

 

शक्यतेची सीमा कोठेतरी दूर।

जेथ भेटणार - सखी मजला ॥

अशी होती आस आज वेरी जीवा।

आतं न हृदयाशी तिचे नाते ॥७४॥

 

दिलेले इतरांनी जणूं उच्छिष्टांन्न।

कशाला हे ज्ञान मला व्हावे ॥

नको ज्ञानाची ती अंध पूजा करणे।

अजाणतपणे - करू भक्ति ॥

आळसावला जीव अनुभवाया सत्य।

तयाचें अपत्य - तत्त्व ग्रंथ ॥७५॥

 

बुद्धि वाढतां वाढतां।

आली ज्ञानाला क्षीणता ॥

दृष्टि झारली सूक्ष्म फार।

दृश्य विश्व गेलें दूर ॥

देह माझा गले लठ्ठ।

त्यांत आत्मा झाला नष्ट ॥७६॥

 

तळयाच्या कांठी या पंखाची फडफड।

अंतरीं तडफड निराशांची ॥

किलबिलाट तेथे - मनी अस्वस्थता।

छळी जीवन्मृता - अनंतते सये मजला ॥७७॥

 

वारुळाचा रस्ता मुंगीला ठाऊक।

हळू हळू एक-माय टाकी ॥

मी ही कधीतरी - वारुळा माझिया।

जाईन राऊळा - अनंततेच्या ॥७८॥

 

कालवूं द्या हृदयीं जहर काळे कुट्ट।

रान कांटे माथीं रुतूं द्याना ॥

फुटक्यांच नशीबाचे करंटे कमाल।

हे रक्त बंबाळ होउ द्याना ॥

दगड धोंडे मारा माथ्यावरी माझ्या।

कंठावरी सुरा - फिरु द्याना ॥७९॥

 

आकाश कंदिली झाडावरी एका।

मिण मिणा दिवा कां लावियेला ॥

प्रकाशांची संख्या असंख्य आधीच।

वाढवूनी उगिच - नसे लाभ ॥

कशाला गांवे मी - गीत दरिद्री हें।

व्यर्थ कां मिरवावे तेज क्षुद्र ॥८०॥

 

जीवांत ना जोम मनांत ना भक्ति।

आशेंत ना शक्ति - असे माझ्या ॥

सैतानी आचार - विचार हे खुनी।

जीवन स्मशानीं - नाचतात ॥

अभाव बुद्धिचा - स्वभाव दुष्टाचा।

प्रभाव पापाचा अंतरांत ॥८१॥

 

दुखविणे दुसर्‍यास आवडे हें चित्ता।

असें मी क्षुद्रता - मूर्तीमंत ॥

आत्मश्लाघा सदा - मनाने वाचेनें।

चिंतणे गुंगणे असे चालू ॥

अशक्य ते मला मिळणे मोठेपण।

अकिंचना धन - कुबेराचे ॥८२॥

 

माझ्या अंकावरी राहुं दे ना मान।

कां अशी बावरी - भासतेस ॥

लाजावे पापांनी जगाच्या नेत्रांना।

निर्दोष जीवांना - हसे कोण ॥८३॥

 

तुझ्या श्वासांतूनी सुगंध सांडला।

गुलाब जन्मला तयाचा हा ॥

तुझ्या नेत्रांतूनीं उडाला हा किरण।

तारका होऊन - नभी बैसे ॥८४॥

 

विचाराची व्यथा जीवला जाहली।

तया मात्रा भली मृत्यूचीच ॥

मृत्यू हाची मोक्ष - विचारवंतांना।

मानवी पशूंना / किड्यांना जगीं मोद ॥८५॥

 

दंगा मनीं आशांची इच्छांची।

चालतो अजूनी - माझिया का? ॥

एकदांचा नाही पुरा तो निश्चय।

ठरुनी (करूनी?) हें हृदय स्तब्ध होत ॥

तुझ्या चिंतनांत घालवूनी आयु।

वायु मध्ये वायु विरू द्यावा ॥

अनंतते - तुझे, तरी पुरे वेड।

लागुनी, ओरड स्थिरो मनिची ॥८६॥

३१-१०-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search