ऋणानुबंधाचे - सारे लागे बांधे।
तेथ नसायाचें खरें प्रेम ॥
दिल्या घेतल्याची - दुनिया सारी असे।
तागडीचे वसे - राज्य येथे ॥
निष्काम भक्तीचे पुष्प माझें तुला।
सये - अर्पायाला येथ आलो ॥३६॥
केतकीच्या पोटी विषारी नागिण।
कमलिनी कर्तन करी भृंग ॥
किडा उंबरात - प्रेमात वासना।
सदा असावी ना मृत्यू लोकीं ॥
परी अनंतते जी माझी ही भक्ति।
बहु मोल संपत्ति दिव्य तीच ॥
वासनेचा वास तिला न येईल।
त्रिकाल राहील निष्कलंक ॥३७॥
तुटली ही चांदणी दिवस असता काय।
निशा ती न होय - जरी अजुनी ॥
नुक्ताच दिनमाणे - मावळूनी गेला।
असे संधिकाला वेळ अजूनी ॥
तोंच काय आले घडूनी अनिष्ट।
होउ लागे कष्ट मनाला या ॥३८॥
जायबंदी लता कुणी केली सांगा।
जिला येत होता बहर आज ॥
माझ्या मनांतली तुझीत ती भक्ती।
अनंतते तुवा छेदियेली कां ती ॥
कडव्या कटाक्षाची तुझ्या ती करवत।
चरचरा कापींत जाई चित्ता ॥३९॥
चिमण्या माझ्या मना ।
तुझ्या राज्यांत या ॥
कशाला यावया ।
पाहिजे ती ॥
गुणगुणावी सदा आपुली सद्गीतें ।
तिच्या जीं न चित्ते जाणियेली ॥४०॥
दृष्टीच्या/ते त्या किरण चित्तास बोचती।
येई अश्रूतती सारखी ही ॥४१॥
स्मृतीमध्ये येता तशीच तो कोपना।
मिटूनीच नयना घेतले मीं ॥४२॥
जणूं आंतली ही मूर्ति ती अदृश्य ।
वाटते रहावी नेत्र मिटता ॥४३॥
नाचे चित्तापुढे सौंदर्य जे दिव्य।
सेव्य मला वाटे - तेंच विश्व ॥
सत्याची सुंदर हिरे नी माणिके।
भांडार लकाके अंतरांत ॥
हळूच जाऊनी तेथे ही कल्पना।
द्याया आणि जना तत्त्व द्रव्ये ॥४४॥
करू शकलों पाप या विना शासन।
दुजे असणार न - मला कांही ॥
इच्छा दुष्टाळली विटाळलें चित्त।
झालो मीं शासित तत्क्षणीच ॥
अनाचार घडला तोची अध:पात।
शिक्षा न लागत - अन्य कांहीं ॥४५॥
दिलाच्या दरियांत मारुनीया बुडी।
सदाची कां दडी दिली येथ ॥
नीघ कांठावरी - पुरे झाले स्नान।
कंटाळले मन - सये तुजला ॥४६॥
आशीर्वाद शाप - अन्नाचा कोळसा।
सहज झाला कसा घात माझा ॥
दुधामध्ये खडा - दुपारी अपरात्र।
वैधव्य वा येत लग्न घटिला ॥
जवळी अनंतता आलीशी वाटली।
तोंच नष्ट झाली - क्षणामध्यें ॥४७॥
पहिला रुकार तो ओंठिं या ठेवुनी।
सखी गेली वनीं निघूनीयां ॥
नुरे माझी स्मृति तिच्या आता मनी।
वनवास या जनीं मींच कंठी ॥४८॥
अधीर औत्सुक्य - चित्तीं धावेपळे।
चिमुरडें कळवळे निराशेनें ॥
गीताच्या गच्चीत - पाही येऊनिया।
अनंतता सया आली की न ॥४९॥
सूज येता जैसें रुंदावे गर्दन।
तसें तत्वज्ञान - तर्क दोषें ॥
निराळेंची असे - शरीर स्वास्थ्य जें।
अनुभवानें सजे खरे ज्ञान ॥५०॥
उद्याच्या जगाची काळजी कां मला।
चित्त जाळायाला - सदा सिद्ध ॥
अरुणास दिवसाची -फुलाला फळाची।
कल्पना ही कशी व्हावयाची ॥
आज उद्या मध्ये आहे अंतरपाट।
धरिलेला अफाट - अदृष्टाचा ॥
अद्य उदइकांत उभा तो अफाट।
असे अंतरपाट अदृष्टाचा ॥५१॥
स्मृतींच्या आसवांनी चित्त माझें झालें।
डंवरलेले डोळे तुझे जैसे ॥
अश्रू नेत्रीं तुझ्या गीते माझ्या मनी।
असें का चालते सये सांग ॥५२॥
निराश जीवाची मौज ही भेसूर।
तुला सांगणार - कोण कैशी ॥
काळवंडे रात्र माझ्याच हास्याने।
स्तब्ध ही स्मशानें - शांतीनें त्या ॥
वेताळ नाचती विचार जे माझे।
चितेचे जाळ ते - अंतरींचे ॥५३॥
जडावले डोके याच अंकावरी।
ठेवुनी क्षणभरी झोपुं दे ना ॥५४॥
नको दूर जाऊ आणावया पाणी।
टाक नेत्रांतुनीं मुखी अश्रु ॥
मृगजळा मागुनी धांवता जो सये।
माझ्या दु:खेंच ये - तुझ्या नेत्रीं ॥५५॥
एक एक क्षण - हात निटिलावरी।
केंस जो सांवरी तुझा ना तो ॥
मुखा वरती माझ्या वारा जो हालला ।
श्वास तो सांडला तुझाची ना ॥५६॥
बोबड्या बोलांनी तलाच बाहिले।
कां न येणें केले - तरी तेव्हा ॥
यौवनी वाहिले प्रेम तुझ्या पायी।
वार्धक्यात देई तुला भक्ति ॥
जन्मा जन्मी असे कितीकदां केले।
करुणा न येतसे - कशी तुजला ॥५७॥
ओठांत हे हांसू डोळयांत हे आसूं।
नका कोणी हंसू विरोधास या ॥
डोक्यांत वादळ विचारांचे चाले।
पर्जन्य आणिले नेत्रिं त्यानें ॥
परी या हृदयांत माझे प्रेम फुलें।
सुगंध दरवळे हास्य रुपें ॥५८॥
कळवळे हे मन असे करुणोद्गार ।
काढुनी अखेर स्तब्ध होई ॥
फत्तराला कधी दया नये मुळी ।
वनीं कीं राउळी असूं द्या तो ॥
कसला दगडी देव बसलात घेउनी ।
द्या तया फेंकुनी समुद्रांत ॥५९॥
दिव्य तेजाच्या त्या तरळल्या तिरिपेनें ।
सर्व माझी कवनें दूर नेली ॥
प्रतिभा, वाणी तशी तत्त्व वचनें सारी।
वायुनें दिशांना फेंकिली ती चारी ॥
आत्म्यात सौरभ शुद्धभक्तीचा या।
लागला नाचाया - भाग्य योगे ॥६०॥
प्रकार प्रेमाचे पाहुनी भोंवती।
अंतरींची खंती सदा वाढे ॥
द्रव्य वा शरीर, प्रेम ते ह्यावरी।
सर्व जनता करी भ्रांति योगे ॥
दोन आत्म्यांचे जें दिव्य एकीकरण।
प्रेम ते चुंबन अतींद्रिय ॥६१॥
चक्र ने क्रम, विराट कालाचा।
असा चालायाचा निरंतर ॥
जन्म मृत्यूच्या या पावलांनी दोन।
विश्वाचे हें वन फिरु कैसें ॥६२॥ (फिरे आत्मा) दुसरीकडे असें आहे
विरोधी भावांनी विनटलेला जीव।
सांडितो न शीव संशायांची ॥
हंसे तोंडावरी - फांकलेलें दिसे।
अंतरी कांहिसे परी दु:ख ॥
समजल्या सत्यांचा कांही एक प्रांत।
वाटतो अज्ञात बुद्धिला या ॥
दोन जीवां मध्ये फुलेल्या प्रेमाला ।
वास केव्हा आला पूर्णतेचा ॥६३॥
हार जीत होई प्रसंगोपात्त जी।
असें चित्त राजी सदा तिला ॥
अभागी आशेचे किती करुणारव।
सुखें ऐकें जीव - जन्म जन्मीं ॥
केव्हा कां येईना - माझा भाग्य क्षण।
जरी गीत - गान चालतें हें ॥६४॥
आलें आस्ते आस्ते चक्र स्थिरावत।
एक एक पात दिसूं लागे ॥
विजेचा हा पंखा फिरे ना शेजारी।
तसेच अंतरी एक चक्र ॥
फिरकती थरथरा मनांत या वृत्ति।
परी त्यांची गति - क्षीणली आता ॥
स्तब्ध होतां वृत्ति संशयाचे वारे।
दूर गेले सारे - अचानक ॥६५॥
भावनांच्या तारा करुणारव फेंकिती।
चित्तास स्पर्शती - तुझ्या तेच ॥
आणि तेथे त्यांचा पडसाद जो उठे।
तयांना तूं कुठें लपवितेस ॥६६॥
लहानग्या मुळाला शक्ति जी जगवीते।
वृक्ष वाढवीते - थोर त्याचा ॥
फुलांनी फळांनी दि लादलेला।
ये त्यावरी घाला मृत्यूचा कीं ॥
मृत्यूचे कारण असे जीव शक्ति।
वर्धनांत होती दृश्य जी ती ॥
वृक्ष वाढला नी जरी मेला येथे।
फळांनी बीजांतें - सांडियेलें ॥
मेलेल्या वृक्षाच्या भोवतीं तें बीज।
नवे वृक्ष राज - करी सिद्ध ॥
मृत्यूनें न होतो जीवनाचा अंत।
परी शत गुणीत - होइ तेंच॥६७॥
निर्दोष जीवाला प्रेम कैंसे द्यावें।
गीत कैसे गावें पूर्णतेला ॥
सतेज दोष जे तयासाठी प्रेम।
मनी घेई जन्म - मानवांच्या ॥
गुणांनी आदर दोष योगे प्रेम।
वाढतो हा नियम सदासत्य ॥६८॥
विरोधा भासांच्या अलंकारी नटें।
तरी आम्हां परे - सत्य तत्व ॥
निर्भेळ सत्याची होणें न ओळख।
निखाऱ्यास राख पाहिजेच ॥
धर्मामध्ये दंभ - ढोंग तें नीतींत।
वासना प्रीतींत - सदा सिद्ध ॥६९॥
३०-१०-५८