अभंग

सर्व माझ्या नाड्या - तुटल्या याचक्षणी। विचारांची मनीं - मढीं झाली।

क्षणिकाच्या मागें धावताती सारे।

वादळांत वारे स्वैर जैसे ॥

दिशाना ठाउकी जेथ जाण्याची तीं।

ध्येय तैसें चित्ती नसे एक ॥१८॥

 

जेथ तेथें माझी गाणीच नाचती।

चित्तांत सांचती - लक्षावधि ॥

काय त्यांचे करू - काही तुझ्या पायी।

वाहतांच येई मना शांति ॥

तुझ्या नेत्रीं जावो तयांचा हा जाळ।

आत्म्याची (अन्तरीची) खळबळ - नुरी माझ्या ॥

जळो गाणी देवा - तयांचा कापूर।

जाळुनी हा धूर काढियेला ॥१९॥

 

सर्व माझ्या नाड्या - तुटल्या याचक्षणी।

विचारांची मनीं - मढीं झाली ॥

हृदयाची धडधड - थांबली एकदां।

‘राम बोलो’ वदा - मित्र सारे ॥

एकदां नाकास सूत लावा परी।

श्वास हा अंतरी रेंगाळतो ॥

सखी अनंतता आली का चुंबिण्या।

देउनी तो टाका तिचा तिजला ॥२०॥

 

धूर कोंदाटतो अंतरी दु:खांचा।

आणि माझी वाचा - गुदमरे ही ॥

बाहेर ओठांच्या होतांच मोकळे।

रुप तिजला मिळे अभंगांचे ॥

आंत ह्या वेदना - बाहेर ना कांही।

नभीं वाणी जाई - म्हणूनी ही ॥२१॥

 

इच्छा बळावते अंतरी या जरी।

हाता मध्ये सुरी धरुं कैशी ॥

इलाज आरकुंड - सर्व होती माझे।

शरीराचे ओझें - साहवेना ॥

जीविताला आली - अवकळा ही सारी।

आंत विंचू मारी सदा नांगी ॥२२॥

 

अधिर्‍या चित्ताला विरंगुळा व्हावा।

सदा कदा जीवा नको वेड ॥

तुला विनवितां निराशा ती पुन्हा।

कशाला त्या त्वच्च्रणां आठवावें (?) ॥

चित्त हे रंगावे कसेंही कोठेंही।

तुझ्या मात्र पायी न यावेंच ॥२३॥

 

कसा झाला वेडा असा माझा जीव।

स्वत:ची न कींव तसा येई ॥

खुळी नी बावळी - तीच झाली श्रेष्ठ।

परीक्षेत कष्ट करुनीया ॥

अनंतते तुझे वेड नसते मला।

तरी हा कशाला नाश होता ॥२४॥

२२-१०-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search