बोलल्या बोलाला जागली नाहींस ।
वाढवूनी आस फसविलेंसी ॥
पूर्वा उजळली ही - उगवला ना रवी।
ना आला देहांस - राजा जीव (प्राण) ॥
दिलेल्या शब्दाला राख आचारांत ।
वचना विसंगत नको कृति ॥१॥
भरे पुरेपूर - प्याला हा भक्तीचा ।
शराब प्राणांचा काढियेला ॥
जाताच ओठांशी असाच माझा प्याला।
दिव्य धुंदी तुला प्राप्त् व्हावी ॥
भान नुरल्यावरी - तुलाही देहाचे।
झोपशील ह्याच हृदयावरी ॥२॥
उगाच फिरुनीया किती दमले माझे पाय।
बनीं फिरते गाय - एकली मी ॥
हंबरडा फोडितें - कुणासाठी सांगा।
नि:श्वास सोडिते सारखे हे ॥३॥
जीवानें जोडिली मायिकांची माया।
संभ्रमांत जन्म गेला वाया ॥
शब्दांनी ऐकिले अर्थ तो अज्ञात।
तैसेच जीवित - कंठियेले ॥४॥
सौंदर्य - मोहाला नेत्र झाले अंध।
वासनांचा गंध - नुरे चित्तीं ॥
आत्मतत्वासाठी जीव हा भुकेला।
बाह्यतेशीं त्याला नुरे कार्य ॥
या क्षणींच देवी अनंत-ता येवो।
सर्वस्व हें घेवो - हिरावून ॥५॥
जलाल (अंजन) तेज हं डोळयांत घातलें।
मनांत ओतिले ज्ञान नीर ॥
दृष्टि आली दिव्य चित्त उंचावले।
चैतन्य लोपले अनंतेंत ॥६॥ (व्यष्टित्व)
चित्त तीर्थीं माझ्या आले पापाचार।
तयांचा उद्धार - क्षणीं झाला ॥
जुना होतो जों मीं - नव्यांत त्याचेंच।
रुपांतर साच - सिद्ध झालें ॥
भक्तिच्या योगानें - नरकाचा हो स्वर्ग।
मुक्याची या वाचा - गाई गीतें ॥७॥
हांकाटी लाटांची किनार्याला चाले।
परी तो न हाले इंच एक जरा सुद्धा ॥
तयांची ओरड - अनंत काल ही ।
चालते कशी ही (प्रतिध्वनींने) (निष्फल) ॥
किनाऱ्यानें जावे लाटांकडे कैसे।
मला कां न पुसें - कुणी हीच ॥८॥
तुफानी फेस हा समुद्राच्या ओठी।
वेदना ही पोटी चिरंतन ॥
कसें येणे स्वास्थ - जाउनीं आजार।
मींच सांगणार तुम्हाला हें ॥
कोणत्या स्वप्नाचा भंग झाला म्हणुनी।
निराशा ही मनीं प्राप्त झालीं ॥९॥
हात होता हातीं क्षणापूर्वी एका।
आणि हा आतां का - एकलाच ॥
हृदय ही होतें हें हृदयाशी सांगत।
लाडकें गुपीत क्षणापूर्वी ॥
जागृती कां झाली तशा स्वप्नांतुनी।
श्वास हा थांबुनी - कां न गेला ॥१०॥
बोटीचे हे धक्के - गाडीची स्टेशने।
ओझ्या बोचक्यांची सभा येथे ॥
(मुख्य ओझे परी) (येथ आले नाही) ।
नवरदेवा शिरीं - असे जे तें ॥
बाशिंगांचें ओझे पेलता पेलतां ।
जीवांना ह्या व्यथा किती होती ॥
परा देशामध्ये राही अनंतता ।
सहज तेथे जाता सडा जीव ॥११॥
प्रतिभेच्या मैनेचे मोडले ते पाख ।
आणि फुटला आंख - बुद्धिचाही ॥
गळाही दाबला गीत कोकिळेचा ।
स्तब्ध झाली वाचा तिची आतां ॥
सर्वस्व सांडले आत्मतत्वानें या।
तुला पूजावया देवदेवा ॥१२॥
रंगात हा आला समुद्राचा खेळ।
कल्लोळी कल्लोळ - लोपतात ॥
तसा माझा खेळ - अंतरंगीं चाले।
संशय लोपले - संशयात ॥
किनाऱ्यावरी हे नाचताती नाद।
मुखांतूनी वाद - तसे माझ्या ॥१३॥
फाटत्या लाटेच्या जबड्यामध्ये जावे।
घेऊनीयां यावे तिचे शब्द ॥
आणावी धडाडी ज्वलामुखीची त्या।
विजेची नाचत्या - तेजस्विता ॥
स्वातंत्र संदेश - बांधवा सांगणे।
याच सामुग्रीनें देवि - वाचे! ॥१४॥
जा गडे एकदां माझ्या चित्तांतूनी ।
कां बरे अजूनी - येथ तूंच ॥
होऊ दे एकदां - दुपारची वेळ ।
सुखाची सकाळ - दूर जावी ॥
लोपू दे पौर्णिमा - कायमची एकदां ।
भाग्याची संपदा - नष्ट होवो ॥
ज्योत्स्नेची संपदा - नष्ट होवो ।
अनंतते - तुझे पुरे झाले स्मरण ॥
भंगु दे हे स्वप्न - एकदांचे।
(मला यावे मरण - या क्षणींच) ॥१५॥
सहज पाहिलेस कसे केव्हा मला ।
जीव माझा झाला तुझा दास ॥
उषेच्या हास्यांत - तुझे हास्य भासे।
तुझाच गळतसे दवाश्रू हा ॥
देवि - अनंतते - हर्ष वा अश्रु वा।
मला आठवावा इथे रोज ॥
तुझ्याच प्रेमाचे -दूत ते जाणून। (तयांनाच गान - गाईवाणी)
रंगेन गाऊनी शून्यगीते (जन्मजन्मीं) ॥१६॥
जगाच्या पेठेंत प्रेमाचा त्या नग।
ठेवला न सांग - येथ कां तू ॥
एकही जीवात्मा - मला कां मोहीना।
निष्प्रेम जीवना - कसा कंठू ॥
सत्तत्वाचा असे अभाव सर्वत्र।
दिव्यता ती अत्र असंभाव्य ॥१७॥
२०-१०-५८