व्यक्तित्व पेहराव माझ्याच साठीं ना ।
करुनीया देव अवतरे हा ॥
क्षुद्र या मर्यादा सुखाने सोसून।
भक्ति ओळखून येथ आला ॥
जेजे अपेक्षित तयांचे वास्तव्य।
सहज सिद्ध होय अचानक ॥१५७॥
आत्म-विरोधाचे एकलें हें पाप ।
जीवास संताप - सदा देते ॥
तोचि एक आत्मा अनीतीचा वाटे ।
बोचतात काटे मनीं त्याचे ॥१५८॥
ध्येय आणि कृति यांचा उभयान्वय ।
कसा सिद्ध होय मला सांगा ॥
मूर्ति आणि ध्यान विचार, वर्तन ।
एक हे तन - मन - असो माझें ॥१५९॥
प्रमादांची शय्या नीति बालेसाठी ।
तसे धर्मापोटी - रक्तपात ॥
उषेच्या पूर्वी हा काळोख साहणे ।
भक्तिला भोगणे - विरह दु:ख ॥
जेथ तेथें बोचे अशी अपूर्णता।
कशी अनंतता - प्राप्त व्हावी ॥१६०॥
स्वत:हूनी होणे स्वत: सदा श्रेष्ठ।
ध्येय हेच इष्ट - मला वाटे ॥
इतर धर्मवेत्ते तत्वज्ञ नीतिज्ञ।
असोत सर्वज्ञ - सर्व पूज्य ॥
मला त्याचे काय - माझा असे मींच।
उच्च् किंवा नीच थोर-सान ॥
आंतल्या वृत्तींचा गुलाम माझ्या मीं।
देव सुद्धा स्वामी - नसे माझा ॥
सैतान मानव - कसाही मी असो।
देव वा गंधर्व त्याज्य पूज्य ॥१६१॥
लगत जें भासलें - तेच झालें दूर ।
अवषर्णी पूर - पावसाचा ॥
काळिमाच झाली - दीप्ति एकाएकीं ।
अदृश्यें विलोकी - नेत्र माझा ॥
विश्व झाले इवलें जणूं गळला आसू।
असे येतां हंसू - आनंदाचे ॥१६२॥
मला आज
विशेषणांचे हे वागवूनी ओझे।
गीत दमले माझे - अनंतते ॥
तुझ्या अंगावरी घालिता एकेक।
गळे तें सत्वरी - पुन्हा खाली ॥
पुन्हा तें उचलोनी वरी नेला कर।
तूंच नि:शरीर भासलीस ॥१६३॥
उघडल्या खिडकीला - प्रकाश येऊं दे।
नेत्राला होउं दे समाधान ॥
सख्या चित्ता! ज्ञान, येथे खेळो स्वैर।
आत्म देव! मिळो - शांति सौख्य ॥
असेल जोवरी भोवती काळोख।
तोवरी न शांति - अंतरात ॥१६४॥
धूप जळतांक्षणीं - सुवास बागडे।
तुझ्या भवती गडे कशासाठी ॥
ज्ञानाग्नि तेज जें तुझ्या त्या अंतरी।
लोभला त्यावरी - तो, नि मी ही ॥
किंवा अग्नींत त्या - अनुभवाचा धूप।
निघे हा अपाप - तसा दुसरा ॥१६५॥ (दिव्य) (पेटतो)
अनिर्वार्य इच्छा जीजी येते मनी ।
तियेला वर्तनीं - बिंबवावी ॥
अज्ञेय सत्याचा अदृष्ट जो किरण।
तोच इच्छा जनन करी आंत ॥
इच्छा आणि ज्ञान - वंद्य तीं दोन्हीन्ही।
सिद्ध त्यांत होई - व्यष्टितत्व ॥१६६॥
भूतकाल मात्र सत्य असे पूर्ण।
भावि, वर्तमान - भ्रांतिरुप ॥
भूतमातेचीं तीं मायीक लेकरें।
स्वत्व त्यांना खरे - लाध तें न ॥
कालाचा उगम जो, निमिष भूतोत्तम।
तया मात्र जन्म - आणि आयु ॥१६७॥
फिरे कोणासाठी नजर ही नाचरी।
नेत्रांत भिंगरी थरकते कां ॥
भाल विस्तारलें - अंतरी वादळ।
ओठ ते बोलले एक शब्द ॥
हात तो हालला कळी कुस्करुनी।
द्यावया फेंकुनी दूर कोठें ॥
कळी कसली! माझे हृदय जें मेलेलें।
पहा तेंच गळले! अनंत-ते! ॥१६८॥
१३-१०-५८