बाह्य - अंत:सृष्टि अनुभवीं बिंबते।
वाक्य सिद्धि व्हावी अर्थ-शब्दें ॥
गेय गाता कंठ यांनी गीत घेई जन्म।
सांत नी अनंत - विश्व ऐसें ॥१४२॥
विचार करतांना सत्यता भंगते।
सांगाडा पाहते ज्ञान दृष्टि ॥
सहेतुक ऐसें अस्तित्व जें कांही।
तें न केव्हा होई - तर्क विषय ॥
आत्म दृष्टिनें त्या ओळखावे लागे।
बुद्धि योगे भंगे सत्यतत्व ॥१४३॥
अविर्भावे होतें प्रेम अस्तंगत।
शब्दांनीं लोपत - मूळ हेतुं ॥
कार्य हे अंतिम असावे ना सदा।
फलेच्छा हेतुदा परी होते ॥
असें हें चालतें - अनुषंग मुख्य हो।
मुखाहुनी रंग ठरे श्रेष्ठ ॥१४४॥
साम्यता विषमता जुळया लेकी।
तयांत तत्वत: नसे भेद ॥
अधिष्ठान त्यांना असे एकत्वाचें।
एकल्या दृश्याचे रंग दोन्ही ॥
दृष्टिकोन जैसा प्रेक्षकाचा असणे।
तसें त्यास दिसणें अनुक्रमें ॥१४५॥
सारी ही अस्तित्वे असतांत बापुडी।
कुणासाठी खडी कोण जाणें ॥
एकमेकांचा त्या लागतो आधार।
असा हा विस्तार - किती भव्य ॥ (व्हावयाचे काय शेवटी आपुले)
शेवटी आपुले व्हावयाचे काय।
ही न शंका पोटी - कुणाच्याही ॥१४६॥
निर्देह आत्म्याचें अस्तित्व मननीय।
कधीं काळीं होय - मला सुद्धा ॥
परमोच्च् हेतु जो तयाला बंधन ।
शरीराचें हीन - लागणार ॥
सत्य कैसे व्हावें मला पुरतें ज्ञात।
आत्मा ह्या देहात असूनी ही ॥१४७॥
शब्द हे सत्याला - सौंदर्य प्रेमाला।
व्यक्तित्व देवाला - नसेना कां ॥
हेतुसिद्धी साठी जयांचि अस्तित्व ।
तयांनीं न तत्त्व - बद्ध होई ॥
सांततेच्या साठी व्यक्तित्व बंधन।
करितसे धारण - अनंतता ॥१४८॥
विचाराचे ध्येय कैसे असे विलक्षण।
स्वत:चेच हनन - करायाचे ॥
विचाराचा होता विकास संपूर्ण।
विचार राही न स्वयंसिद्ध ॥
विचारातीत जें तयांत वर्धन।
आणि परिमार्जन विचाराचें ॥१४९॥
विचार वस्तुत्व यांमध्ये हा भेद।
वस्तुत्व संसिद्ध - स्वयंधृत ॥
विचाराचा जन्म वस्तुच्या संयोगे।
मनाच्या संसर्गे असा होई ॥
ज्ञाता हा दर्पण अस्तुत्व मूर्तीला।
प्रतिबिंब शोभला विचार ही ॥१५०॥
कुठें ही सुरुवात पाकळया मोजाया।
करावया येत कमलिनीच्या ॥
वर्तुळास प्रारंभ कोठलाही बिंदु ।
करुनीया देई परिघ रेषा॥
आदि अंत होई वर्तुलाचा ।
कोठलेंही दृश्य आकळूनी घेतां ।
कळले अनंत-ता - पूर्णतेनें ॥१५१॥
द्वंद्व सिद्धि होई विचार करितांना।
हेतु अस्तित्वांना भेद येई ॥
इंद्रिये जाणावे अस्तित्व दे बाह्य।
हेतु हाच ध्येय विचाराला ॥
हेतूला हुडकित विचारे धावणें।
स्वये हेतु होणे - आत्मनाशें ॥१५२॥
स्वत्वाचें स्वरुप हेंच आहे (असावे कां) असले।
जयांत राहिलें विरोधीत्व ॥
स्वत्वाचें पूजन - करूं जाता - युद्ध।
अंतरांत सिद्ध । सदा होते ॥
एक स्वत्व सांगे स्वार्थाची श्रेष्ठता।
दुजे नि:स्वार्थता धरी वंद्य ॥
कुणाचे ऐकावे हेंच मजला गूढ।
कुणा आदरावें - अशा वेळी ॥१५३॥
माझ्या स्वत्वावरी प्रतिबिंबले जेंजें।
तें मला वाटतें पूर्ण सत्य ॥
मर्यादा माझिया स्वत्वा भवंती किती।
तयाची मीं गणती करू कैशी ॥
अनंतांशे होई - माझे सत्य।
तयानेच तृप्त् - ज्ञात असावे मी? ॥१५४॥
हेतुहीन जेजें दिसेल अस्तित्व।
ओळखा जडत्व - तया मध्ये ॥
जेथे जेथें होई - हेतु तत्व ज्ञात।
चेतना नाचत तेथ तेथें ॥
हेतूची व्हावया सिद्धता सर्वदा ।
चेतनेची क्षणदा आवश्यक ॥१५५॥
वीज
चांगले वाईट कसे ओळखावे।
सर्व हे जाणावे एकरुप ॥
आचार असे हा सर्व कच्चा माल।
विचार ठेवील त्याचे नांव ॥१५६॥
तुलनात्मक दृष्टि सदाची ठेवावी कधी
११-१०-५८