अभंग

अनंतता भेटो याच याच, क्षणीं नातरी ही फुटो अशी छाती

मनीं माझ्या पाप - तयाची ही छाया।

लागते दिसाया स्पष्ट मुखीं ॥

किती केला यत्न झांकिण्या अंतर।(कुणा न शेजार इष्ट माझा)

नावडे शेजार कुणा माझा ॥

नीचत्व मानसी वसे जें माझिया ।

लागते सांडाया - सदा तेंच ॥११६॥

 

घाव टाकीचे या, लागोत चित्तास।

अग्निचा कीं झोत, शिरी यावा ॥

धडधडा आपटाव्या, शिला मानेवरी।

वेदना ही उरीं, साहवेना! ॥

अनंतता भेटो, याच याच क्षणीं ।

ना तरी ही फुटो, अशी छाती ॥

शिलाच घेतली, एकदांची हातीं।

जगाची न नाती, मला ठावी ॥११७॥

 

समाज निंदा ही सदा ऐशी चालो।

तिला मीं भाळलो - जन्मतांच ॥

तिच्या त्या शब्दांत वाहते जी गंगा।

त्यांत हें सुस्नात आत्मतत्त्व ॥११८॥

 

माझ्या चित्ति धीर - तुझ्या हृदयीं (मनी) भीती।

विपरीत ही रीति - तुझी माझी ॥

तुला मी विसरलो कित्येक जन्मांत।

तुझ्या चित्तांत - विसर माझा ॥

तुझी हांक होती - नभांना घुमवीत।

मलाच अज्ञात - जिचा अर्थ ॥११९॥

 

उघडतांच नेत्र, स्मितें दिसली सगळीं।

तुझी अंतराळी, विखुरलेलीं ॥

श्वास होतां चालू, तुझीच चेतना।

घेउनी जीवना, सुरू केलें ॥

जागृती होतांच, विचारांची चित्तीं।

तुझी रम्य मूर्ति, चिंतियेली ॥१२०॥

 

अणूरेणूंमध्ये, संचरे चेतना।

तुझ्या ह्या दर्शना, अशा घेतां ॥

जडाला ओळखूं, कसे आता सांग।

सजीव सर्वांग, सृष्टिचें ह्या ॥

गारेंत तारका, दगडांत देवही।

दृष्टि माझी पाही, आज कैशी ॥१२१॥

 

सुत्रांची पावले टाकुनीया संथ।

काल राज जात - कुठे सांगा ॥

माझ्या वेशींतूनी, निघाला ना तो ही।

स्वशिर माझ्या चरणी ठेवुनीया ॥

तसा आशीर्वाद त्याला दिला मींच।

चालुं दे तो नाच - तुझा स्वैर ॥

मानवांचीं कुळे चिरड पायाखाली ।

सृष्टिला ही घाली तुझे फांस ॥

माझ्याच आशीनें सारे चराचर।

होऊनी हें अमर सदा नांदे॥

तूं हि नांद तैसा त्यांच्या सवे काला।

गूढ माझी लीला - अशी चाले ॥१२२॥

 

ताडपत्र काळे, निशेचें घेउनी।

लेख हा वाचुनी, कोण पाहीं ॥

तारकांचा अर्थ, कुठें कुठें लागे।

परी हा अज्ञात, किती भाग ॥१२३॥

 

जगी इच्छा मोड अशी माझी व्हावी।

कधींही न यावी मना शांति ॥

प्रतिकारें वाढवीं सामर्थ्य आत्म्याचे। (आत्म्याचे सामर्थ्य वाढते जन्मते प्रतिकारे)

मृत्यूनें वाढते अमर्त्यता ॥१२४॥

 

अत्युच्च वृत्तींचे बीज जें अंतरी।

तें न कलमांतरीं नष्ट होणें ॥

सुखांच्या दु:खांच्या हालत्या लाटांत ।

फेंस तो नाचत - स्थिरत्वानें ॥

जीवन मृत्यूंच्या अनंत द्वंद्वांत ।

वृत्ति ह्या अमृत - खेळतील ॥१२५॥

२९-९-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search