भोवताली लाटा फेर जो हा धरिती।
माझ्या मनी भीति अशी वाटे ॥
कधी काळी तुला गिळूनी अंतरी।
माझिया स्वप्नाला भंगितील ॥ (जगाचा इतरांचा नसो तुजला त्रास)
अनंतते तुला नको इथला त्रास ।
जला मध्ये वास दिला (तुजला) म्हणुनी ॥५४॥
फेंस जिकडे तिकडें समुद्रीं नाचतो ।
तुझा तो वाटतो शुभ्र हास ॥
लाटांचे लास्य जें इथें हें भासते ।
मनीं तें चालतें तुझ्या मनन ॥५५॥
कुठेही केव्हाही मनाचे पाउल ।
पडतांच ही येई अशी शंका ॥
मननीय वर खाली तुझें रुप ।
लागतें अपाय (प?) जेथे तेथे ॥५६॥
प्रस्तुताचे बंध कसे पाळू सांग।
तुझा तो सुगंध असा घेतां ॥
जगींच्या गोष्टींना वर्णावया लागे।
तोंच जीव मागें तुझे रुप ॥
सदाचा कदाचा लोभवी सुखद ।
तुझ्या कसा येऊ ॥५७॥
विचार करतांना वस्तुचे बाह्यांग।
मान - रुप - रंग आकळी मीं ॥
तयामध्ये होते तुझे रुप स्पष्ट।
हीन का तयांतें म्हणावे मीं ॥५८॥
अशा सायंकाळी, एकली का येथें।
काय चित्तीं येते, तुझ्या सांग ॥
समोर दर्या हा, नेत्रि त्या वादळ।
अंतरीचा छळ, दिसे ज्यांत ॥
भीति वाटे मजला, करणार तू काय।
पुढे झुकला पाय, तुझा का तो ॥
थांब एक क्षण, समुद्र मी होतो।
‘तुझे’ तें जीवन, मिळो मज ॥५९॥
धप् दिशी वाजलें येथे कांही तरी।
नाद कोणी करी गुदमरोनी ॥
जलाखाली चाले मंद एक श्वास।
तया चुंबिण्यास उडी घेतो ॥६०॥
वनांत या दाट फिरकसी कां सांग।
करी शिरी थाट फुलांचा हा ॥
जाऊं चल ना घरी भीति वाटे चित्ता ।
होऊनी तू लता - राहशील ॥६१॥
नदीचे कल्लोळ शेजारी हालती ।
तयांची संगती नको घेऊं ॥
चंचलता तुझी - तशी तितुकीं ती आहे।
नदी कांठ आहे तसा स्थिर मी ॥६२॥
निशब्द गीतांनी भोवती गोंगाट।
करूनी सारखा दिला त्रास ॥
बरें त्यांच्याहूनी वागबद्ध संगीत।
जया मध्ये अर्थ असे सुप्त ॥
जीव वेडावतो अर्थावरी सदां।
राहते आपदा तयें दूर ॥
शब्द ना अर्थ ना अशी काही गीते।
जाळिती जीवातें प्रतिक्षणी ॥६३॥
मोकळे ते केश पाठीवरी कांही।
तरी त्यांत राही तेज पुष्प ॥
केसांची वर्तुळे झाली जी मोहक।
तयांत अडथळे गीत माझें ॥६४॥
जिवाला सांगुनी - पाहिले किति कदां।
व्यर्थ घेणें मनीं तुझा नाद ॥
ज्ञानें सफलतेच्या जरी जन्मीं प्रेम।
कां तया जीवाने आदरावें ॥
प्रेमास ठाऊक प्रेयाविणे कांही।
नसतें हें कौतुक - असे रम्य ॥
आढळेल येथें जेजे असंभाव्य।
प्रेम माझे दिव्य तेंच मागे ॥६५॥
सखी झुकली मुर्ती पुढे - निसरडी ही वाट।
जलाचा (ओहळाचा) त्या पाट दिसे खाली ॥
दगड कीं होऊनी - पडावें मी आड।
मला कवटाळुनी (अडखळेला) धरील ती ॥
धरावें तूं ॥६६॥
१५-९-१९५८