खरेंच आले ना असें त्या चित्तांत।
आता माझा घात - पुरा झाला ॥२३॥
एवढासा किंतु - जरी राही हृदयीं।
प्रेम सौख्या येई - तरी बाध ॥२४॥
थोडकासा अंश पोटात जहराचा।
जातांच देहाचा - होई अंत ॥२५॥
चालतांना यावे, अधांतरी ऐसें।
मनीं का येतसे, सदा सांग ॥
पायांनी चालतां, खालची ही भूमी ।
कधी ही सर्वथा, न संपेल ॥
पृथ्वी ही हिंडलो, जरी मी ना सारी ।
येणें तुझ्या घरी, नसे शक्य ॥
स्थलातीत वास, तुझा ना तो आई ।
कसा जवळी येई, स्थलांतरे ॥२६॥
एकमेकींची ना अलिंगने घ्याया।
नाचती लाटा या - अशा येथें ॥
कां न होती शांत आश्लेष - आनंदे।
घुमविती कां नादें आकाशास ॥
दर्शनेच झाला इतुका तया मोद।
भेटण्याची दाद नुरे त्यांना ॥
स्वैर नाचायांस लागली एके एक।
जाणूंन ठाउक दुजे काहीं ॥२७॥
तुझ्या माझ्यासाठी विश्वाचें नाटक।
अनंताच्या पीठी असें चालू ॥
स्पृश्य, श्राव्य, दृष्य लेह्य चिंत्य ध्येय।
विश्वनाट्य भव्य असे चालू ॥२८॥
(पूर्व) जन्मोजन्मींच्या त्या, नात्यांचा आठव ।
होताच हा जीव, आनंदतो ॥
तुझा माझा आहे, शेजार जो आज।
आणि हे निर्व्याज, तुझे प्रेम ॥
तयांची कारणें, अनंततेला ठावीं।
तू नि मीं रहाणें, सदा ऐसे ॥२९॥
रखरखीत ऊन, सावली ना कोठें ।
लागते पावलीं, जणू आग ॥
मनाचा संताप, होउनी निर्दये।
जीव पोळे सये, अनंतते ॥
सोसतो हा त्रास, नव्हे प्रेमासाठी।
जीव माझा हट्टी, जन्मतांच ॥
आचरावें व्रत, जें जें अंगीकृत।
म्हणूनी भोगित, कष्ट सारे ॥३०॥
मनांत येता तूं सौख्य जें वाटलें।
अश्रू जे लोटले आनंदाचे ॥
त्याच सौख्यामुळे आणि अश्रूमुळें।
जीवाचे जाहले समाधान ॥
नको तूं येऊस कधीही येथेंच।
विरह हा असाच असो चालूं ॥३१॥
आंतल्या वृत्तींची अनुसरावी आज्ञा।
उच्च आचाराची -- ॥
धर्मशास्त्रांची ती - शिकवणूक निष्फळ ॥
धर्म शास्त्र नीति - आत्म - निष्ठ।
आत्मनिष्ठनीति सफल होई ॥३२॥
ओठ ओठी येतां विरह बाधा वाढे।
मनाची शांतता नष्ट होय ॥ चित्तीं अधीरता ।
अधिक मात्र ॥
देह होई सारा कंटकांनी युक्त ।
आणि अश्रु सिक्त असे नेत्र ॥
उरीं ऊर राही जरी निरंतर ।
जीव कां हे दूर वाटतात अनंत- ते ॥३३॥
हृदय शून्य झालें माझे वक्षस्थल।
नेत्र गर्भीं सलिल नुरे आतां ।
गळया भोवती न्याया, नुरे माझा हात।
ओठ या गालास कसा लावूं ॥
निर्देह होउनी - तुझी घेता भेट ।
तुला कवटाळितो।
ऐक्य (सौख्य) ते या गानीं कसें वर्णू ॥३४॥
तुझ्या ही चित्तांत हीच होती आस।
हाच होता ध्यास मनीं चालू ॥
झोप ही असतांना डोळयामध्ये दाट।
हात अलिंगना कसें वरी झाले ॥
ऒठही होते ते थरथरां कांपत।
रहस्य सांगत कुणालासें ॥३५॥
भयाण शांतता निशेचें हे दृश्य।
पाहुनी अवश्य घेऊ ये ना ॥
हाती दे हातास गाल हा गालास।
देहही देहास लागू (स्पर्शू) दे ना ॥३६॥
भीतीप्रदा निशी राहू दे ही ऐशी।
मला तूं बिलगसी अशा वेळीं ॥३७॥
नदीच्या काठाला, रांग ही पक्ष्यांची।
घडी पापणींची, तुझ्या नेत्रीं ॥
नदीचे आटेल, उन्हाळयात पात्र।
अश्रू न सरतील, तुझ्या नेत्रीं ॥
अखंड हा पूर, सये कां चालतो।
जरा जाता दूर, एक जन्मीं ॥३८॥
ढोलक्याचा नाद, दूर कोठे तरी।
येऊनी अंतरी, दुणावे तो ॥
गंभीर (अज्ञात) अर्थ जे, सवे त्यांच्या येती।
तयांनाच निशा, ठेवि चित्तीं ॥
जवळ तूं नसतां ते, उसने मी घेउनीं।
संतोषतों मनीं, तशा वेळीं ॥३९॥ (चितितों ते मनी पुन्हां पुन्हा।)
भाबड्या हृदयाचे इमान पारखी।
जन्म जन्मीं सखी - अनंतता ॥
सहज - दत्त जीवा - छळवणूक ही अशी।
सहन व्हावी कशी - मला सांग ॥
दुज्या न कोणाचा अंतरी या वास।
शक्य नाही वास (ध्यास) मनीं दुसरा ॥४०॥
निळया त्या ओच्यांत खूपसूनिया तोंड हे।
धाय मोकलुनी रडू देना ॥
अंतरींची दु:खे - द्रवू देत अश्रूं।
होऊ दे हें शांत भग्न चित्त ॥
कितींदा मी रडलों एकला तप्त अंधारी।
वेदना ही उरी - तरी राहे ॥
तिच्या ह्या अग्नीला विझवूं का आतांच ।
रडू कां असाच जन्म जन्मीं ॥४१॥
विपरीत बुद्धी ही विनास कालात।
होई वृद्धिंगत - विशेषत: ॥
विनाशकालाची मनोवस्था दिव्य।
तीच वाहे सेव्य सदा मजला ॥४२॥
अशी जवळी नदी ।
तृषितात्म नी हा ॥
(तृषाक्रांत) भोंवती ही गर्दी - एकला मी ।
सखी ही शेजारी भेटतां कां नये ॥
जीव का न राहे शरीरी या ।
कां न तर्क पाहे - सत्यदेवी ॥४३॥
वेळ अवेळ ना अंतरी येउनी।
कां अशी हसूनी - दूर जाशी ॥
जन्मोजन्मी व्यथा सदा मी भोगितो।
तयांनी हर्षतो तुझा जीव ॥
निर्घृण - शोभते तुला कां हे सांग।
असे आशा भंग किती सोसू ॥४४॥
एकदा दोनदा, अनेकदा सदां।
गायिली आपदा, तुझ्या पुढे ॥
अशा गोष्टी देशी, नीतिमत्ता प्रतिभा।
तयाने जीवाशीं, नसे शांति ॥
व्हावी एकात्मता, तुझी माझी पूर्ण।
सदा माझे मन, हेंच चिंती ॥४५॥
निराशा होतांच बळावे हें चित्त।
गाऊ लागे गीत - तुला पुन्हा ॥
पुन्हा वाणि गात ।
नवनवी तत्वें ॥
सारखी तू महा निर्दये मजकडे ।
चित्त हें धडपडे तुझ्यासाठीं ॥
निष्प्रेम नजरेने - प्रेम माझे वाढे ।
मोद नैराश्यानें - दुणावतो ॥४६॥
व्हावी एकात्मता तुझी माझी पूर्ण ।
सदा माझे मन हेच चिंती ॥४७॥
१२-९-५८