विचाराचे पाय ठेंचाळती सदां।
चित्ताच्या आपदा कशा वारूं ॥
सत्याचे तेज जें - दूर कोठे झळके ।
कधी तें ठाउकें - मला होई ॥
हीच चिंता जीवा - सारखी लागुनी ।
शांति ना जीवनी मुळी वाटे॥५॥
पुजार्याला देव सजवितां येइना ।
गवयाच्या गायना - नसे तान ॥
झालें हे फिक्कट चांदणे पुनवेचें ।
कंटकांनी वाट आच्छादिली ॥६॥
लागले समजाया ज्या क्षणा पासुनी ।
दुजी इच्छा मनीं - आली नाहीं ॥
जीविताचें व्हावे - लहानसे फूल ।
तुझे ते पाऊल - खुलविण्यास सजविण्यास ॥७॥
पूर्णतेनें केव्हा दिसूं नये सृष्टि ।
निश्चला न दृष्टि म्हणूनीच ॥
पसरावाया भूल कोण जाळे टाकी ।
हाताची चलाखी - करी कोण ॥
उघड आणि झांक पापण्यांची चाले ।
त्यामुळें जाहलें विश्व गूढ ॥
नजर बंदी होई तितुक्यांत हें जग ।
सर्व खोटे रंग - पुन्हा घेई ॥
पापण्यांचा पडदा नेत्रावरतीं पडे ।
कधी न उलगडे भुलावणी ॥८॥
दोन लाटां मध्ये आडके ही होडी।
तिला कोण ओढी अशी आज ॥
दोन ऒठां मध्ये लवंगेची विडी।
घेऊनीयां खडी सलिलवंती ॥
अंतकालाचा हा नवा नवरदेव।
लवंगेला पहा - कसा ओढी ॥९॥
क्षुद्र बुद्धि शोधी जेथे तेथे अर्थ।
तयानें अनर्थ - मात्र होई ॥
गीतांत भाषेत - पेठेत व्यवहारीं ।
अर्थ राजा करी सुखे राज्य ॥१०॥
मीं एक भाग्याचा असल्या जगामध्यें।
जया न अर्थाचा मुळीं लोभ ॥
दरिद्रता देवी माझ्या घरी राही ।
गीत माझे नाही - अर्थयुक्त ॥११॥
माझी न वाणीही
लहान रोपटी किनार्याच्या कांठी।
चार दिवसांसाठीं सुखे डुलती ॥
क्षणात नष्टतो समुद्राचा फेंस।
तरी हा उल्हास तया वाटे ॥
तुला मात्र जीवा - वेड अमरत्वाचे।
लागुनी सदाचें - मिळे दु:ख ॥१२॥
किती वेळ गेला असा हा मी उभा।
चित्तिंचा न खेळ - तुझ्या संपे ॥
मिटेल्या नेत्रांच्या पुढे मनोमूर्ती।
तशी ही मागुती ।
खडी माझी आहे ॥
तुझी सुद्धा मूर्ती मनीं आणावया।
नेत्र हे मिटूनी घेऊं का मी? ॥
छे - न होई धीर - करायास तैसें।
दृश्य हें न ऎसे - दिसे पुन्हा ॥१३॥
निरनिराळया क्षणां एकाच रंगाने ।
चित्तिले देवाने अनिच्छया ॥
माझेच जीवन - म्हणूं त्याला कैसे ।
कोण ‘मी’ हा असे कोण जाणे ॥
जीवनाचा भव्य प्रवाह हा वाहे ।
काय तेथे राहे मी - त्व, तूं - त्व ॥१४॥
धावताना थांबा बोलताना ऐका।
नाचतांना टाका संथ पाय॥
भेटतांना विरह जरासा अनुभवा ।
वृद्धि मोद - भावा तयामुळे ॥१५॥
भाल देशीं हात तुझा हा फिरतांना ।
शीत संवेदना सूक्ष्म होई ॥
अंगुली ही लागे - ओली थोडकीशी ।
आसवांच्या जलीं भिजविली कां ॥
एक एक क्षण विलंब होतांच।
कां अश्रु गाळून कष्टलीस ॥१६॥
चमत्कारांचे हें भव्य प्रदर्शन।
जया विषयी ज्ञान नको होणें ॥
पावलां गणीक स्तिमित व्हावा जीव।
रम्य हे इंगित नको सांगू, विश्व हे अज्ञात सदा राहो ॥१७॥
पुसलेस अश्रू ते - पुन्हा येती मात्र।
अलिंगनें गात्र - थरारतें ॥
शब्द ते ऐकुनी कळवळयाचे सये।
शोक सरितेस ये पुन्हा पूर ॥
सहानुकंपेने - पाहता तूं मला।
वेदनेची ज्वाला पहा वाढे ॥१८॥
स्थितींत या अशा कसा बोलू शब्द।
सर्व देह रन्ध्रे खुली झाली ॥
त्यातुनी हो गळे मनीचा आशय।
कां न तुजला कळे अलिंगने ॥१९॥
चिमण्यांची चिवचिव दाण्यापाण्यासाठीं।
तशी तुझ्यासाठी भावनांची ॥
वृत्तीची या भुरू भुरू हिंडती येथ ना ह्या अशा।
तशा माझ्या अशा मना मध्यें ॥
उडोत त्या कोठेंही घरट्यांकडे चित्त। (असे जैसा गडे सदा - त्यांचा जीव।)
तयांचे लागत - सदा काळीं ॥
तशी माझी दृष्टी तुझ्या स्थानाकडे।
स्वैर कोठें हिंडे - जरी जीव ॥२०॥ (जन्मजन्मीं हिंडे - जीव स्वैर।)
समाज सेवकां छळक आवडे ।
राष्ट्राच्या भाविका - बंदिवास ॥
उच्च आचारांचा हवि स्वर्गस्थांस ।
आनंद द्यायास सिद्ध होय ॥
बलीसाठीं त्याच भुकावले लोक।
काव, काव काक - जणूं करिती ॥
कधी ही न त्यांना प्राप्त तो व्हायाचा।
घांस तो देवांचा यज्ञभाग ॥२१॥
मूर्च्छना जातांच - बघे वरती खालीं।
तुझ्या वक्षस्थलीं - मान माझी ॥
प्राण माझे होते - गेले खरोखरीं।
पुन्हा कां ही उरीं - संजीवता ॥
ओष्ठ तो लागतां - निश्चिष्ट या।
तुझा श्वास आतां - देहीं माझ्या ॥२२॥
०६-०९-५८