पुन्हा अन्तरांत, येऊनी संशय।
पहा येई पाय, असा मागे।।
क्षणीं होई धीर, क्षणीं वाटे भीति।
अशी चित्तवृत्ति, जन्मजन्मीं।।
पाऊल टाकावे, नेत्र जो उघडावे।
तो शून्य देखावे, उभे पुढे ॥१॥
ज्ञानाने वाढली, भूक ही बुद्धिची।
दिक्षा दृष्टीची, दृश्ययोगें।।
श्रुतीने ऐकिले, संगीताचे स्वर।
जाहली आतुर, अधिकतेनें।।
जन्ममृत्यूंच्या, या केल्या प्रदक्षिणा।
वेड लागे चरणां, फिरायाचें ॥२॥
चिरनिद्रा लागो, एकदाची मला।
जीव भांबावला, मायिकानें।।
जीवित हे नांव, श्वासयुक्ततेला।
जीव कंटाळला, द्यावयातें।।
मनीं माझ्या सांगा, देवा केव्हां येणें।
आणि हें थांबणे, भ्रान्तिस्वप्न ॥३॥
सत्य तेही मला, नकोसे जाहले।
असत्य सोडिले, अगोदर।।
आला होता पूर्वी, वीट विश्वाचा या।
आता देवराया, तुझा सुद्धा।।
देहाची मृत्तिका, कधीच फेकिली।
हिरकणी टाकिली, आत्म्याची ही ॥४॥
संशय-संगत, चित्ताला या सदा।
त्यामुळे आपदां, प्राप्त झाली।।
विचारांनी माझा, कायमचा नाश।
केला सावकाश, अजाणतां।।
कमविलें ज्ञान, त्याने केला घात।
मढे हें मनांत, देवाजीचें ॥५॥
१/२/१९२९ लोकशिक्षण