अभंग

पूज्यत्व माझेंच, ईश्वरा निर्मून। करी जें पूजन, पुन्हा माझें।।

क्षणोक्षणी मला, घोट या विषाचा ।

मिळूनी चेष्टेचा, नाश व्हावा ॥

अस्तित्व निश्चेष्ट, जीव शून्य सुप्त ।

विश्व नास्तिमात्र, असो सारे ॥१॥

 

निराशेचे मला, मिळो हलाहल।

घोट तो जहाल, घेऊ द्या ना ॥

ऊर माझा फुटो, जळू द्या हा गळा ।

देहास अवकळा, येऊ द्या ना ॥

देव तो अज्ञेय, मला मी अज्ञान ।

कसा राहूं शान्त, स्थितींत या ॥२॥

 

अशी डोळेझांक, किती वेळां करू ।

पुन्हां तें आचरूं, कसे पाव ॥

ज्ञानदृष्ट्या देव, शोधावया गेलो ॥

पस्ताव पावलो, तयामुळें ॥३॥

 

हट्ट त्या देवाचा, कशाला हा असा ।

घेतला कां वसा, गूढतेचा ॥

शोधिलया विना तो, कां न येई हातीं ।

ज्ञान-कर्म-भक्ति, कशाला ही ॥४॥

 

माझेच हेतु हे, सांडले सृष्टींत ।

माझ्यात दृष्टींत, विश्व जन्मे ॥

पूज्यत्व माझेंच, ईश्वरा निर्मून ।

करी जें पूजन, पुन्हा माझें ॥५॥

 

पुन्हा पुन्हा होई, असा बुद्धिभेद ।

किती वाटे खेद, अंतरात ॥

गतायुष्य सारें, जणूं व्यर्थ गेलें ।

असे चित्ती आले, किती वेळा ॥६॥

 

काल केली पूजा, आज त्याला लात ।

स्वैरला चित्तांत, किती माझ्या ॥

फेकिलेले फूल, पुन्हा चुंबावया ।

कसा ओठांस या, मोद वाटे ॥७॥

 

अंध होता नेत्र, कोठले सौदर्य ।

श्रुतीविना गेय, नास्तिरुप ॥

ज्ञानाविना विश्व, मनाविना प्रेम ।

अहंविना ब्रह्म, नास्तिरुप ॥८॥

 

रंगलो मी जरी, केवल स्थितींत ।

राहिला जागृत, अहंभाव ॥

लोपणार कैशी, शब्दविशिष्टता ।

वाक्यसिद्धि होतां, अर्थपूर्ण ॥९॥

 

दया मला आली, बापुड्या देवाची ।

आस्तिक भावाची, सिद्धी झाली ॥

होतो मी तत्पूर्वी, करंटा की नास्तिक ।

आर्त जीव, एक वंद्य होता ॥१०॥

 

अस्तित्व भोक्तृत्व, ज्ञातृत्व, मुक्तत्व ।

सर्वांआधी स्वत्व, मूलभूत ॥

तयाचाच नाश, गमे अश्रद्धेय ।

अप्रेय अश्रेय, असंभाव्य ॥११॥

 

अहं ही ना वृत्ति, अहं ही ना स्थिति ।

अहं ही परिपूर्ती, सत्यतेची ॥

विश्वाचें आदिम, ज्ञेयाचें अन्तिम ।

माझें हें मध्यम, अहंतत्त्व ॥

अहमस्मि, याच अनुभवामुळे ।

परब्रह्म मिळे, परात्पर ॥१२॥

 

अहं ब्रह्मास्मित, अहं आणि ब्रह्म ।

दोहोंचा संगम, साम्यतेनें ॥

अहं ब्रह्म-निष्ठ, ब्रह्म अहं-निष्ठ ।

नसे एक श्रेष्ठ, दुज्याहून ॥१३॥

 

होता क्षणीं माझ्या, अहंतेचा लोप ।

येई काळझोप, जीवात्म्याला ॥

सद्चिदानन्दत्व, कोठले तें मग ।

अनुभूति संग, नुरे जरी ॥१४॥

 

जून

विविधज्ञान विस्तार

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search