अभंग

प्रेत माझें माझ्या फिरे खांद्यावरी।

मला माझी भेट, पुन्हा होणे नाहीं।

ऊर भरूनि येई, म्हणूनी हा ॥

माझीच मी तशी, आत्महत्या केली।

तिरडीही वाहिली, मींच माझी ॥

प्रेत माझें माझ्या, फिरे खांद्यावरी।

पादुका या शिरीं, पुन्हां माझ्या ॥१॥

 

ध्येय शोधूं जातां, लागलें जें हातीं।

वासनेची माती, ठरे तीच ॥

देव पुजूं जातां, प्रीति जी वाटली।

शेवटी ती ठरली, स्व-वंचना ॥

जणुं सत्य द्याया, शब्द जें पातले।

नादमात्र झाले, सर्व तेही ॥२॥

 

ज्ञान इतुके झालें, विश्व हें अज्ञेय।

सत्य अ-प्रमेय, बुद्धिला या ॥

मोद वाटे जीवा, कळतांच एवढें।

आयुष्य बापुडे, मोद-हीन ॥

पिशाच प्रतिभेचे, अंतरीं जें एक।

मागते तें भीक, प्रतिक्षणी ॥३॥

 

देह, वाणी, चित्त, घेऊनि जावया।

पडे माझ्या पायां, पुन्हा पुन्हा ॥

अनंत-ते तुझ्या, पुण्यचरणाजवळी।

पिशाचाचा, बळी दिला त्याच ॥४॥

 

सखा सायंतारा, हांसतो ना ते यें।

तरी अशुभ येतें, मनीं माझ्या ॥

मेघ काळे बघतां, मोद वाटे जीवा।

स्मशानीं विसावा, मिळे मजला ॥

विपरीत झाले हे, अनुभवाचे मेळ।

चेटुकाचे खेळ, चिंतनाच्या ॥

नको हा अनुभव, ज्ञान सुद्धा त्याचें ।

भान चेतनेचें, नुरो देहा ॥५॥

 

वर्तमान केव्हां, कसा हा संपेल।

उत्क्रांति होईल, कधी पूर्ण ॥

भावी कालामध्ये, आतांच जाऊन।

पूर्णत: पाहून, सत्य घ्यावें ॥

धीर आतां नुरे, संभ्रमीं वागाया।

स्वप्नांत खेळाया, अज्ञेतेनें ॥६॥

 

तुझे माझें स्वप्न, एकाच तेजाने।

सिंचिले जीवानें, तुझ्या माझ्या ॥

तेंच तेज सांडे, स्मितागीतांतून।

हर्षखेदांतून, तुझ्या माझ्या ॥

खेदगीते माझी, तुझी हर्षस्मितें।

विश्व हे झेलिते, अनंतते ॥७॥

 

कसा दूर जाऊं माझ्या स्वत्वांतुनी।

राहिलो बंधनी चिरंतन ॥

जेथ जावें तेथें, असें मी मजपाशी।

प्राप्त व्हावी कैशी, मला मुक्ति ॥८॥

 

पाऊल टाकिले, पायवाट झाली।

पाहतांच सजली, दृष्टसृष्टि ॥

तर्क चालवितांच, विचार जन्मला।

जीव देहीं आला, श्वास घेता ॥

ज्ञान होताक्षणीं, अवतरे ज्ञातृत्व।

कृतींत कर्तृत्व, सिद्ध होई ॥९॥

 

विश्व सत्यामध्ये, विरावें जीवित।

नको अमृतत्व, मला देवा ॥

संगीत सिद्धिला, गायिलेला स्वर।

एकला न अमर, कधी व्हावा ॥१०॥

 

अर्थवत्ता तया, गीत पूरकतेंत।

विलगतेंत होत, नाश त्याचा ॥

मृत्यु माझा तोच, मला जे अमरत्व।

व्यक्तिभावे प्राप्त, व्हावयाचें ॥११॥

 

विविधज्ञानविस्तार - १-११-१९२६

नोव्हेंबर १९२६

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search