अभंग

तुझ्या पायाकडे मनानें उडावें

विरोधाभासाच्या, अलंकारी नटे।

आणि आम्हा भेटे, सत्य देवी ॥

निर्भेळ सत्याची, होणें ना ओळख।

निखार्‍यास राख, पाहिजेच॥

धर्मामध्ये दंभ, स्वार्थ तो नीतींत।

वासना प्रीतींत, सदा सिद्ध ॥१॥

 

शब्दांत ओज ना, मनांत ना भक्ति।

आशेत ना शक्ति, असे माझ्या ॥

आचार सैतानी, विचार हे खुनी।

जीवन-स्मशानी, नाचतात ॥

अभाव बुद्धिचा, स्वभाव दुष्टाचा।

प्रभाव पापाचा अंतरांत ॥२॥

 

दुखविणे दुसर्‍यास, आवडे हे चित्ता।

असे मी क्षुद्रता, मूर्तिमंत ॥

आत्मश्लाघा सदा, मनानें वाचेनें।

चिंतणे गुंगणे, असे चालू ॥

भाग्याची एकदा, मिळो मूठमाती।

नको ही संगति, जीविताची ॥३॥

 

औत्सुक्य-अर्भक, चित्ती धावे पळे।

चिरमुडे कळवळे, निराशेने ॥

गीताच्या गच्चींत, पाही येऊनिया।

अनंतता सया, आली की न ॥४॥

 

असे काढिले मी, किती आर्तरव ।

सदा हळवा जीव, रडे माझा ॥

तुझ्या पायापुढे, दु:ख मी आणिलें ।

गीतारूप झाले, तेंच देवा ॥५॥

 

तुझ्या पायाकडे, मनानें उडावें ।

गीत हें बुडावें, तुझ्या चित्तीं ॥

देवा तुझे ध्यान, नेत्री या ठसावे ।

तूं नि मी असावे, एकरूप ॥६॥

 

ऑक्टोबर

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search