प्रीति खेदाची माऊली, आज जीवाखातर झाली।
आतां तुला नमस्कार, नको प्रीतीचा विचार॥
झाली तेवढी फसगत, जिवाला जाळित पोळीत।
प्रीति करावी मानवी, देवा अद्दल घडावी॥१॥
मानवांना वाटे लाज, परत-प्रेम लाघे सहज।
फत्तरांच्या फसव्या देवा, तुझी व्यर्थ केली सेवा॥
एका स्वप्नातुनीं, दुज्यांत जागृति।
होतसे जीविती, क्षणो क्षणी॥२॥
चर्मचक्षू जेव्हा, सदाचे झांकीन।
तेव्हांच पाहीन, सत्यसृष्टी॥
किलबिलाट करिती, शांततेचे ध्वनि।
असे अंत:करणी, सदा माझ्या॥३॥
विस्मृत वृत्तींचा, होत पुनरुच्चार।
जीवास बेजार, करावया॥
आजच्या कालच्या, मागील जन्मांच्या।
स्मृतींचीच वाचा, बोलूं लागे॥४॥/
देह, चित्त, जीव होतात श्रुतिमय।
ऐकण्या वाङ्मय, स्मृतींचे त्या॥
मागल्या क्षणांचे, घेऊनीया ओझें।
नवा कीं विराजे, आतांचा हा॥५॥/
स्मृतींचे स्थंडिली, जीविता अस्तित्व।
नसे अभिनवत्व, अनुभवाला॥
जन्म-कालचा जो, तोची सत्य क्षण।
आभास जीवन, उर्वरीत॥६॥
काल सरितेमध्ये, क्षण तोचि हळूवार।
करी स्थानांतर, एकमात्र॥
वाहुनी तो जाई, वाटते आपणां।
भोगिले मीं क्षणां, लक्षावधी॥७॥/
शास्त्र पद्धतींचे, लागुनीया वेड।
बुद्धि ही बोजड, मात्र झाली ॥
नीतीचे ऐकुनी, व्यामिश्र ते बोल।
आचार हा शिथिल, असा झाला ॥८॥
तत्त्व-गीते गांतां, गुंगतो बेभान।
तरी एक तहान, अंतरांत ॥
अनंतते असा, जेथ तेथे जाच।
पडूं दे असाच, तुझ्या पायीं ॥९॥
उद्यांस सत्यत्व, आशेमुळे येई।
`काल' सिद्ध होई, स्मृतीमुळें॥
प्रवाह कालाचा, एकरुप आहे।
मी तयास पाहे, बहुविध॥१०॥/
सजीवतेचेंच ओझें, हे अवघड।
होई डोईजड, देह देवा॥
मृत्यूची सुखशय्या, असो अंगाखाली।
आता न राहिली, दुजी इच्छा॥११॥/
पांच हे हजार, अभंगांचे तुला।
वाहिले तो झाला, सदाचार ॥
श्वास हा शेवटचा, जगा आशीर्वाद।
देऊनीया साद, तुला घाली ॥१२॥
चिंधड्या चिंधड्या, मनाच्या ह्या झाल्या।
अपेक्षाही गेल्या, दूर कोठें॥
जाहला इष्टाचा, अभाव नंतरीं।
इच्छांना अंतरीं, कसे ठेऊ?॥१३॥/
संपले जीवित, दिवस कैसे मोजू?।
आयु बीज नुरता रुजूं, काय लागे॥
मेलें पाहिले भोवतीं, कोठे न आधार।
चौफेर अंधार, दाटला हा॥१४॥
मागेपुढे खाली, जेथे तेथे रात्र।
ठेचाळते चित्त, सर्व जागीं॥
सख्या देहा ये ना, स्वस्थ येथे बसूं।
एकमेकां पुसूं, खेद मोद॥१५॥
तीहि आतां नको, नको तो, नको मी।
मला शून्य धामीं जाऊ द्या ना॥
फिरावयास सहज, विश्वदेवी आली।
क्षणैक टेकली, घरी माझ्या॥१६॥
सांज झाली म्हणूनी, इतुक्यांत गेली ती।
कुणी न सांगाती, तिच्या आहे॥
नि:संग, निर्नेत्र, निर्देह, निष्काम।
शून्य मी निरात्म, वसे येथे॥१७॥
सप्टेंबर