अभंग

सर्वस्व सांडले, आत्मतत्त्वानें या। तुला पूजावया, देव देवा।।

केतकीच्या पोटीं, विषारी नागिण।

कमलिनीकर्तन, करी भृंग ॥

किडा उंबरांत, प्रेमांत वासना।

सदा असावी ना, मृत्यू लोकीं ॥१॥

 

हृदयांत ती इच्छा, बळावते जरी।

हातामध्ये सुरी, धरूं कैशी ॥

इलाज आखूड, सर्व होती माझे।

शरीराचे ओझे, साहवेना ॥२॥

 

जीविताला आली, अवकळा ही सारी।

आंत विंचू मारी, सदा नांगी ॥

करूं शकलो पाप, याविना शासन।

दुजे असणार न, मला कांही ॥३॥

 

इच्छा दुष्टाळली, विटाळले चित्त।

झालो मी शासिंत, तत्क्षणींच ॥

अनाचार घडला, झाला अध:पात।

शिक्षा न लागत, तया अन्य ॥४॥

 

आशिर्वाद शाप, अन्नाचा कोळसा

सहज झाला असा, घात माझा ॥

दुधामध्ये खडा, दुपारी अपरात्र ।

वैधव्य की येत, विवाहींच ॥५॥

 

जवळी अनंत-ता, आलीशी वाटली

तोंच नष्ट झाली, क्षणामध्यें ॥

सर्व माझ्या नाड्या, तुटल्या याचक्षणी।

विचारांची मनी, गढी झाली ॥६॥

 

हृदयाची धडधड, थांबली एकदा।

`रामबोलो' वदा, मित्र सारे ॥

एकदा नाकास, सूत लावा परी।

श्वास हा अंतरी, रेंगाळतो ॥७॥

 

सखी अनंत-ता, चुंबण्या आली कां।

देऊनी तो टाका, तीचा तिजला ॥

दुसरी शकुंतला, वृत्ती माझी झाली।

भृंग एक गुंजी, करी भंवतीं ॥८॥

 

वारितां तिज न ये, भृंग पार्थिवतेचा।

आत्मदुष्यंताचा, ठाव नाहीं ॥

तया आक्रंदाया, वृत्तिला सर्वदा।

सांगे प्रियंवदा, काव्य-देवी ॥९॥

 

फाटल्या लाटेच्या, मुखामध्ये जावें।

घेऊनीया यावे, तिचे शब्द ॥

धडाडी आणावी, ज्वालामुखीची त्या।

विजेची नाचत्या, तेजस्विता ॥१०॥

 

स्वातंत्र्य संदेश, बांधवा सांगणे।

अशा सामुग्रीने, वाचे देवि ॥

प्रतिभेच्या मैनेचे, मोडले ते पांख।

आणि फुटला आंख, बुद्धिचाहि ॥११॥

 

गळाही दाबला, गीतकोकिलेचा।

स्तब्ध झाली वाचा, तिची आतां ॥

सर्वस्व सांडले, आत्मतत्त्वानें या।

तुला पूजावया, देव देवा ॥१२॥

 

जुलै

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search