खडकामाजी रोप उगवले, जीवन त्या कुठले?।
हतभागी तें परमेशानें, कठीण हृदय केले॥
जिवलग नाही, नाही आप्त ही, कोणि न सहवासी।
सदासर्वदा कठोर, पवने झोडावें त्यासी ॥१॥
जातां येतां, क्रूर पशूंनी, पायी तुडवावें।
महाप्रतापी रविकिरणांनी, भाजूनी टाकावें॥
मान, टाकुनी पडत बापुडें, बघुनि नभीं प्रलया।
सायंसंध्या मृदुलकरांनी, उठवित नित्य तया ॥२॥
प्रभातकाळी अश्रु ढाळिते, निशीथिनी देवी।
तें जल सेवुनि, या रोपानें तृष्णा शमवावी॥
अशा प्रकारे जीव धरोनी, मोठे होईल का?।
इतर तरूंपरि, त्याच्या आशा सफलित होतिल का?॥३॥
परमात्म्यानें त्यजिता, सर्वहि सोडुनियां जाती।
म्हणुनि जीव असहाय्य, निराश्रित, असंख्य जागें दिसती॥४॥
जून