मनाला मारिलें, हृदयाला जाळिलें
अश्रूंनी न्हाणीले, नेत्र-युग्म।
इच्छांना आणिले, वैधव्य सदाचें
आता भवितव्य, नुरे मज॥१॥
प्रवृत्तीचा मार्ग, संपला एकदां
निवृत्ती संपदा, प्राप्त झाली असे।
निवृत्तीची नाणी, नसत्या बाजारांत
खणखणा वाजत, नादहीन।
सर्वस्वीचें झाले, शून्यांत वर्धन
ते शून्य निर्वाण, माझे असें॥२॥
जन्म घेता लागे, मृत्यूचेच ध्यान
शोभवी जीवन, जन्ममृत्यू।
देव मानव सेव्य, सारखेंच
ऐक्य त्यांचे भव्य, शून्यतेंत॥३॥
१९२६ फेब्रुवारी