अभंग

ऑक्टोबर १९५८

सान्ततेच्या ज्या ज्या, अपेक्षा भासती ।

तयांची परिपूर्ती, व्हावयाची ॥

त्याच इच्छा माझ्या, मनांत स्फुरणार (फुलणार)।

जयांना येणार, फलावस्था ॥

असंभाव्य जें जें, असेल, सर्वस्वी।

तें तें न मन्तव्य, मला होणें ॥१२६॥

 

मला कांहींतरी, हवेंसें वाटतें।

जया ही न गीते, स्पर्शतात ॥(कधी गाती)

उगम केंद्र नाहीं, दीप्तीला या ठावे ।

सदा कां नाचावें, तिने मात्र ॥

भोवती हा उजळा, कसा केव्हा होतो ।

जीव हा नाहतो, आनंदांत ॥१२७॥

 

प्रकाशाच्या मागे, उभी ही सावली ।

निशा कां धावली, दिव्यामागे ॥

आनंदा भोवतीं, आपत्ति असणार।

पुरुषास शेजार, प्रकृतीचा ॥१२८॥

 

गूढ तें वाटते? माझिया जीवाला।

सहज जें न कळते, पाहतांची ॥

दृश्यता चिन्त्यता, ज्ञेयता ध्येयता ।

वरी अनंतता, आम्हांसाठी ॥१२९॥

 

गर्भ सत्यांशाचा, प्रत्येक वस्तूंत।

असे अंतर्हित, जाहलेला ॥

ज्ञान दृष्ट्या तया, आत्मा हा दे खुनी।

द्वंद्व ओलांडुनी, पुढें जाई ॥१३०॥

 

सांत दृष्यें सारी, पसरिली सर्वत्र।

भव्य देह गात्र, अनंततेचें ॥

तिच्याच एकत्वीं, सत्यता सर्वास।

सिद्ध हो आभास, विविधतेनें ॥

विविधत्व जन्मतें, सांततेच्या साठीं।

जिचा वास पोटीं, अनंततेच्या ॥१३१॥

 

प्रतिभेची (चे?) अस्वल, नाचवाया जगतीं।

चालते भ्रमन्ती, अशी माझी ॥

असा मीं दरवेशी, कशाला जन्मलों।

ध्येय कां विसरलो, दिव्य माझें॥

दीड दमडीच्या त्या, स्तुतीच्या बोलांस।

कसें वाहिलेस, आत्मतत्व ॥

अनंत-ते पायी, विरुनीयां जावें।

व्यर्थ कां नाचावें, काव्यतोषे ॥१३२॥

मी गावें, क्षुद्र काव्य

निर्देह आत्म्यांनी, केली भुलावणी।

आता न राहिली, दुजी इच्छा ॥

शरीरे आपुलीं, कुठेंही हिंडोत।

जीव ना सोडोत, एकमेकां ॥

द्वंद्व शंका ऐशी, नको येणें चित्तीं।

प्रकाश नी ज्योती, एकात्म का? ॥१३३॥

 

एकमात्र

शरीर प्रेमाचा, स्पर्श झाला नाही।

कृष्ण-कृत्य काहीं, न केलें मी ॥

महत्पाप एक, सदां हेचि झालें।

तुलाच गायिले, अनंत-तेत ॥

तयाची ही शिक्षा, सदा जाशी दूर।

ऐकतांच सूर, असे माझे ॥

जाइनास कोठे, मला त्याचे काय।

पुन्हा धाय धाय, रडेन मीं ॥१३४॥

 

पुन्हा पुन्हां यावे - तुझ्या घरट्याकडे ।

परी न सापडे - जीव माझा ॥

कुठेसा तेथेच ठेविला आहे मीं।

मागल्याच जन्मीं असे वाटे ॥१३५॥

 

निर्जीव देहाची, अवस्था रम्य ही ।

जयाला जगताची, नसे संज्ञा ॥

फिरावे लोकांत, तिरडीवर अशा।

ही आस चित्तांत, सदा वाटे॥

अनुभवाच्या जाळ, नको तो लागणें।

देहमात्र असणें, सुखाचे हें ॥

दहन ते अनवरय, माझिया देहाचें ।

जीवनांत साचे, तेच झालें ॥१३६॥

 

राखुंडी हुंगितांचा, माझिया गात्रांची।

घाण ही यायाची, तिला सुद्धा ॥

यायेच जाळिली, सुवास त्या कुठल्या।

दुर्गंधची सांडला, सहाजिक ॥

अनंततेसाठीं, गान केलें कांही ।

त्यामुळें हा येई, वास थोडा ॥

तयाला हुंगूनीं, चाललो मीं पुढें ।

दुज्या जन्माकडे, पहा पुन्हा ॥१३७॥

 

भावनांनी असल्या, हृदय हें फुलेलें।

चित्त हें झुलेले, तत्त्वरंगी ॥

प्रतिभासखी अशी, जिच्या कटाक्षांनीं ।

विश्व हे मोहुनी, सर्व जावें ॥

ध्यान गान मनन, सदा ऐसे चाले ।

आनंदात डोले, असा जीव ॥

खरे पाहता सारीं, खोटीं ही बोलणी ।

परी अनंतते, तुझ्या पायावरी ॥१३८॥

 

आत्म्याची बासरी, फेकिली ना?

मावळे रोज ती, तारका देखावया।

मावळती तारे का, तया देखावया ॥

कोण नेत्रास या, कधी सांगे।

तुटू द्या आताच, अशी तेजस्विनी॥

नभाच्या रंगणी, एक तारा ।

नेत्र माझा तिला, बघे उत्सुकतेनें ।

अशाच मरणाने, मरावे मीं ॥१३९॥

 

झुळूक वार्‍याची, नजर त्या तार्‍याची ।

मला जाचायाची, अशीच का? ॥

सृष्टिच्या दृश्यांनीं, असे हें दुखवावें ।

अनंततेनें रहावें, तसे दूर ॥

अभाग्याला नाही, प्रेम तेही ठावे ।

कसें मी कंठावें, आयु सांगा। / जीविताला ॥१४०॥

 

विश्वगूढ तुम्हां, उलगडेल केव्हा।

विचारें विसांवा, मिळे कैसा ॥

भक्तिच्या नेत्रांनी, विश्वस्त हें पाहून ।

रहस्य जाणून, चला घेऊ ॥

दिव्य माझें प्रेम, जाणितें अज्ञेयें ।

ज्ञान दृष्टि जयां, ओळखीन ॥१४१॥

 

१-१०-५८

 

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search