गर्द झाडीमध्यें चालतां चालतां।
तुला मीं न कळतां-अलिंगिले ॥
आले अचानक तुझें ही कां हात।
मला कवटाळीत-कोण जाणें ॥
आता मात्र दूरी नको केव्हा होणें ।
चिर काल रहाणें हें असेच ॥
युगें, विश्वे, देव ही सर्व आपणां।
पाहताच, नयनां-फिरवितील॥६२॥
दुराचार सर्व दुर्दशेचीं पोरें।
तयांना कां बरें-दूर टाकूं॥
दुर्दशेला द्यावा दोष सारा सदा।
जन्मवी आपदा-अनीतीस ॥
जन्मताच कोणी भला बुरा नसे।
तया त्या करितसे-परिस्थिति ॥६३॥
कल्पनांचें जाळे विणूनीयां एक।
चेतनेचा सेक-वरी केला ॥
थेंब जे उडाले जेथ तेथें तेव्हां।
सान वा थोर वा-जाल पृष्ठीं ॥
अधिक-थोडे पडलें या मुळें चैतन्य।
जडता ती आढळे-कुठें ही न ॥
विश्व हें देवाचे कल्पनेचें चित्र।
न अणुमात्र-अचेतन ॥६४॥
जेथ तेथें अशी विभक्ति वावरे ।
ऐकयता (एकता) ती ठरे कुठें ही न ॥
अपूर्तेपणाच्या-कंटकांनीं, (स्फोटकांनी) व्याप्त।
विश्व हें भासत सर्व ठायी ॥६५॥
सलंग वाण तें आढळे ना येथें।
सत्य हे जाळिते-सदा जीवा ॥
अनंतांत जावें एकदांचे विरुनी।
अंश-ता ती मनीं-न बोंचावी ॥६६॥
शुन्यामध्यें संख्या न कारी होकार।
निर्गुणीं आकार असें सुप्त ॥
अभावी अस्तित्व घनत्व अवकाशीं।
उदय तो विनाशी असे गुप्त ॥
आभासीं सत्यता आनंद खेदांत।
ब्रम्ह विश्वांत-असे लुप्त ॥६७॥
अपूर्णाने येई विश्वदृष्टी शोभा।
पूर्णतेचा गाभा - न्यूनता, ही ॥
फुलेलें सौंदर्य विरुपता जलें।
सत्य हें सजेले - असत्यानें ॥
जीवनें नाचावे मृत्यूच्या तालांत।
अनंततेला साथ - सांततेची ॥६८॥
भावनेचे ज्ञान होताच ती नुरे।
आनंद ओसरे - काज कळतां ॥
प्रेम हे मोहक अज्ञात जोवरी।
बेभान वैखरी - प्रसादिक ॥
अज्ञेय देव जो वाटे तो ची वंद्य।
ज्ञेयता ती जाची पूज्य भावा ॥६९॥
अभाव नी भाव सापेक्ष भासतो।
प्रत्येक बिंबतो दुज्यामध्ये ॥
अभाव अत्यंत - कुठे ही नाढळे।
भाव - ता मिळे सर्व ठायी ॥
हेतु योगे होते - अभाव - भावता।
द्वंद्व ते तत्वत: हेतु मूल ॥
हेतु दृष्ट ऐसें वस्तुत्व, तो भाव।
अदृष्ट - तो अभाव - वस्तुचा त्या ॥७०॥
सांत दृश्ये सारी गुंफिली दोर्यांत।
शोभली गजर्यांत अनंते-च्या ॥
चिर - वास तेथे तयांचा असणार।
स्खलित ना होणार एक सुद्धा ॥
लहान - मोठे भेंद होउनी एकत्र।
नांदतील तत्र - चिरंतन ॥७१॥
स्वयंसिद्धता हे सत्याचें जीवन।
असत्य लक्षण पराश्रय ॥
स्वकीय बीजानें सत्य होई सिद्ध।
असत्य अनुबद्ध - तदितरी ॥
निज-प्रभावानें सत्य होते ज्ञात।
असत्य संस्थित - बुद्धि योगे ॥
बुद्धि होई स्थिर - अचल-जल-वत जेव्हां।
सत्य तेथे तेव्हां - बिंबणार ॥
बुद्धिच्या संसर्गे सत्य होते भ्रष्ट।
ज्ञान ते कनिष्ठ - बुद्धि-ज्ञ जें ॥७२॥
सांत दृश्यांच्या जी अंतरी विषमता।
भासते सर्वथा - विखुरलेली ॥
अनंतीं होणार तियेचे मज्जन।
वैषम्य तेथ न - असे शक्य ॥
स्वयं साम्य हेंची अनंततेचे लेणें।
कधीही लाधणें - जें न इतरां ॥७३॥
फिरवतांना तोंड चोरटी ती दृष्टी।
पुन्हा कोणासाठी बघे मागे ॥
बोलण्या सुरवात केलीस क्रोधाने।
मृदूल कां स्वराने असे व्हावे ॥
निरोप देताना आेंठ कां अडखळे।
चित्त कां खळबळे तुझे सांग ॥
चाललो पहा मी पुन्हा बोलावितो।
कटाक्ष तसला तो, तुझाच नेत्र तो अनंतते ॥७४॥
प्रेम सलिल तुवा आनंदाने रहावे।
मी मात्र कंठावे असें आयु ॥
नभांत तारका, कासारी कमलिनी।
बैस तूं होउनी अनंतते ॥
पडें मी या वनीं खडा किंवा कांटा।
दृष्टि ही रोखुनी तुझ्याकडे ॥७५॥
आठवते का तुला गेल्याच जन्मांत।
होतीस हिंडत वनीं एका ॥
सृष्टि सौंदर्याची पाहताना मौज।
तुझा पाय सहज - पडे तैसा ॥
एक होता तेथे पडलेला कंटक।
तुला तो ठाउक कसा असणे ॥
हाय - गेला परी तुझ्या तो पायांत ।
आणि त्या नभांत - तुझा ध्वनि ॥
काढुनी टाकिला - मी तया त्या क्षणीं।
आणि माझ्या मनीं ठेविला तो ॥
तेव्हां जें पाहिलें तुझें तेथें चित्र।
सर्वदा सर्वत्र - शोधितो तें ॥
कधी माझी होणे सांग इच्छापूर्ति।
पुन्हा तीच मूर्ती - दिसेल का? ॥७६॥
हिरवळीत तसल्या अंग ते टाकुनी।
नेत्रही लावुनी - नभाकडे ॥
कुणासाठी काय - मागसी तें सांग।
होई आशा भंग - तुझाची बा ॥
तूंच केलास ना असा माझा घात।
तुला दैवें हात कसा द्यावा? ॥
नभास - भूमीस, नगास सरितेस।
विलोकीत बैस (सर्वकाळ) अनंतते ॥
परी मजला जेव्हा बघशील प्रेमानें।
तेव्हांच ती नयने तोषतील ॥७७॥
“तुझ्या डोळयावरी हात हे ठेवुनी।
पाहिले पुसूनी - नांव माझे ॥
लाजलीस नांव घेउनी झटकन।
सोडिलेहि नयन - तत्क्षणीं मी ॥
कित्येक दिवसांचा तुझा होता हट्ट।
असा गेला फुकट - क्षणामध्ये ॥
“कध्धि'ही घेणार नांव तुमचें नाही ।
असा हट्ट बाई - कुठे गेला तुमचा?”॥
“समजते कां तुम्हा विनावदल्या कांही।
बघ होते बाई - मी हितेंच ॥
हस्तांनी तुमच्याच नेत्र हे झांकुनी।
घ्यावयाचे मनी चिंतियेलें ॥
प्रणय - गूढ साधे - तुम्हां कळले नाहीं।
घडले हें ही - नकळतां कां? ॥
मला वाटलें कीं - कळूनीयां गूढ।
नेत्र हाता आड - तुम्ही केले ॥
परी कसले पुरुष तयांस शब्दांत।
सुचवाया लागते सर्व काही!!” ॥७८॥
पावलांचा कल पुढें जावयाचा।
रोख त्या नयनांचा - परी मागे ॥
जावयाचे जेथे स्थान तें, ओठांत।
ठाव त्या हृदयांत - स्थलांचा ह्या ॥
येथ झाली आपुली क्षणापूर्वी भेट।
जीव का न धीट - पुणे जाण्या पुढे? ॥
तुझ्या हृदयी माझे - माझ्या हृदयी तुझें।
प्रेम कां हें सजे - सये सांग। अनंतते” ॥७९॥
“दूर कोठे तरी वाजली ती पाने।
माझी नील नयने - तिथे गेली ॥
तेथेंच त्या क्षणी तुम्हांला देखिले।
विचार हा मनीं असा आला ॥
सिंह किंवा व्याघ्र जरी येथे येता।
देह मात्र घेता - हिंस्त्रतेनें ॥
हिंस्त्रता राजसा परी तुमची न्यारी।
जीव जो शरीरीं - घेतला तो ॥
मनाला मार्दव कधी नव्हते ठावे।
जिवाने असावें अल्पतुष्ट ॥
तुझ्याच दर्शने उगम जी पावली।
कशी ती आटली प्रेम गंगा ॥८०॥
हृदय हे दगडाचे ।
जाहले उद्विग्न ॥
निर्घृण ऐकून तुझे शब्द ।
शब्द तो ऐकून अनंत ते ॥८१॥
परिसास एका दुजा तो लागता ।
कशी सुवर्णता सिद्ध व्हावी ॥
अग्निला आग्नीने जाळणे शक्य न।
जीवने जीवन भिजे कैसे॥
प्रेमाने वाढणें कधीही न प्रेम।
सष्टिचा हा नेम - अनंत-ते ॥
दिलें तुजला प्रेम - ही माझी चूक।
आत्ता ती न कधी शमणे भूक ॥८२॥
चढतांना चढण ही, तुला थकवा आला।
श्वास हा लागला पहा दीर्घ ॥
निटिलाने गाळिले घर्म बिंदू खाली।
अश्रु-शंका आली - मला सुद्धा ॥
पाहता तुजकडे परीं ओठीं हांसे।
खेळतांना दिसे तसे तेथें ॥
हातांत हात हा घेतला होतास।
ओढीत बसलीस - अशी खाली ॥
पुनर्जन्माचे हें शैल तूं मीं असे।
गांठिले कां कसें - अनंत-ते ॥८३॥
जरा जाऊं पुढे -असे सांगुनीयां।
निर्जन स्थलीं या -आणिलीत ॥
असा तुमचा हेतु मला नव्हता ठावा।
साधलात कावा-तुम्ही मात्र ॥
कुठें हीं कां न्या ना मिळेल ना प्रीति।
जरी मीं सांगती - जन्मजन्मीं ॥
मीं ही अनंत-ता तुमचें तें जीवित।
सदा मर्यादित-असायाचें ॥८४॥
मनांत जें आलें तेंच वदली वाणी।
शिकविले न कोणी-असे बोल ॥
हीच इच्छा वागे सदा ह्या अंतरी।
तुझ्या पायावरी - जीव वहावा ॥
आईबाप मित्र वेड्यांत काढिती।
तयाची न खंती - कधी वाटे ॥
सफल व्हाव्या इच्छा - हेंच सर्वां वाटे।
मनीं माझ्या दाटे - हेंच वेड ॥
तयाला आदरीं खुशीने माझ्या मीं।
जगाची वैखरी - वदो कांही ॥८५॥
(आता) कशाला तूं आलीस नेत्र ध्यानी।
कसे दृष्टिबंध तुला बांधू ॥
माझ्याच गीतांनी बधिर झाले कर्ण।
तुझे प्रीति वचन - कसे ऐकूं ॥
नुरले तें आतां देहाचे स्थंडिल।
कुठें बैसशील अनंत-ते ॥८६॥
उचलली वरती निजांगुली।
मला घाई केली - पाहिजेच ॥
हा याच पावली चाललो मी।
गीत - अर्भकांचे होउ द्या काहीही ॥
मला प्रेम नाहीं - तयां विषयी।
आले जे जे येथें अंतरी अनुभव ॥
लक्षांश संभव गीति त्यांचा।
पूर्णांश घेउनी जाउं द्या आत्म्याला॥८७॥का गर्भवासाला - भिणे व्यर्थ
विरोधी भावांचे उलगडेना गूढ।
जीवराया तोड अशी काढू ॥
जीर्णतेच्या अंगी नाविन्य पहाणे।
दु:खात चाखणे मोदभाव ॥
मृत्यूंत पाहणे जीवनाची कला।
विनाशांत सजला - विकास तो ॥
असत्यांत लपल्या सत्यास देखणे।
शून्यांत रेखणें विश्व चित्र ॥८८॥
७-११-५८